युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने डिझाइन केलेला अधिकृत पोशाख तसेच खेळाडूंच्या किटचे केले अनावरण
एशियाड स्पर्धेतील 38 क्रीडा प्रकारांमध्ये 634 खेळाडूंचा समावेश असलेल्या भारताच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पथकासाठी आयओएने आयोजित केलेल्या भव्य निरोप समारंभाला केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर, आयओए अध्यक्ष पीटी उषा यांची उपस्थिती
हा केवळ एक गणवेश नाही; आपल्या खेळाडूंसाठी अभिमान आणि ओळख यांचे प्रतीक आहे: अनुराग सिंह ठाकूर
Posted On:
06 SEP 2023 3:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 सप्टेंबर 2023
चीनमधील हांगझोऊ येथे 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान होणार्या आगामी 2022 आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारताच्या पथकासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) मंगळवारी (5 सप्टेंबर) अधिकृत पोशाख आणि क्रीडा साहित्याच्या किटचे अनावरण केले.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने खेळाडूंसाठी आयोजित केलेल्या निरोप समारंभाला केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर, आयओएच्या अध्यक्ष आणि महान धावपटू पीटी उषा तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भारतीय पथकाचे प्रतिनिधी म्हणून भारतीय हॉकी संघाचे गोलकीपर पीआर श्रीजेश (पुरुष), सविता पुनिया (महिला), नेमबाज मनू भाकेर आणि 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील गोळाफेक मधील सुवर्णपदक विजेता तजिंदरपाल सिंग तूर आणि अन्य क्रीडा प्रकारातील खेळाडू उपस्थित होते.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीची संकल्पना आणि अनोख्या पद्धतीने डिझाईन केलेल्या या औपचारिक पोशाखात महिलांसाठी खाकी पोत असलेली साडी आणि पुरुष खेळाडूंसाठी खाकी कुर्ताचा समावेश आहे.
यावेळी बोलताना अनुराग सिंह ठाकूर म्हणाले, “हा केवळ एक गणवेश नाही; आपल्या खेळाडूंसाठी अभिमान आणि ओळख यांचे प्रतीक आहे. हा गणवेश अभिमानाने भारताच्या आत्मनिर्भरतेचे प्रतिनिधित्व करतो आणि देशाचा वैविध्यपूर्ण वारसा आणि डिझाइन नेतृत्व प्रदर्शित करतो. मला विश्वास आहे की संघ जेवढा तरुण आणि नव्या भारताचे प्रतिनिधित्व करेल; आपण ऐतिहासिक कामगिरी सुनिश्चित करू आणि सर्वोत्तम पदक संख्येसह परत येऊ. मी देशाला आवाहन करतो की त्यांनी आपल्या खेळाडूंच्या पाठीशी उभे राहून त्यांचा उत्साह वाढवावा. ”
आयओएच्या अध्यक्ष डॉ. पीटी उषा म्हणाल्या की, या पथकातील प्रत्येक सदस्याने भारताला अभिमान वाटेल असे सर्वोत्कृष्ट प्रयत्न करावेत अशी आपली अपेक्षा आहे. “ 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी आपण मोठी प्रतीक्षा केली आहे आणि भारत 634 खेळाडूंचे सर्वात मोठे पथक पाठवत आहे याचा आपल्याला आनंद आहे. आम्हाला विश्वास आहे की या खेळाडूंमध्ये भारतासाठी सर्वाधिक पदके पटकावण्याची क्षमता आहे,” असे त्या म्हणाल्या.
"आयओए मध्ये, आम्ही खेळाडूंना क्रीडा विश्वाच्या केंद्रस्थानी ठेवण्यासाठी आणि त्यांची उत्तम प्रकारे काळजी घेतली जाईल हे सुनिश्चित करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत."
हांगझोऊ येथे जाणाऱ्या खेळाडूंमध्ये रोईंग क्रीडा प्रकारातील 33 सदस्यांचा सर्वात मोठा संघ पदकाच्या शर्यतीत आहे. दरम्यान, 15 सदस्यांचा ई स्पोर्ट्स चमू देखील आशियाई क्रीडा स्पर्धेत अधिकृत पदार्पण करणार आहे.
2018 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने 16 सुवर्णांसह 70 पदके पटकावली होती.
भारतीय ऑलिम्पिक संघटना (आयओए ) ही प्रशासकीय संस्था असून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती, राष्ट्रकुल क्रीडा महासंघ, ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशिया आणि असोसिएशन ऑफ नॅशनल ऑलिम्पिक कमिटीची संलग्न सदस्य आहे. आयओएने क्रीडा विषयक शिक्षण आणि ऑलिम्पिक अभ्यासाच्या विकासासाठी विविध हितधारकांसह अनेक उपक्रम राबवले आहेत.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1955124)
Visitor Counter : 161