अंतराळ विभाग
azadi ka amrit mahotsav

पीएसएलव्ही-एक्सएलद्वारे भारताच्या पहिल्या सौर मोहिमेला प्रारंभ झाल्यानंतर केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले, “भारतासाठी सुवर्णमयी क्षण.”


ताऱ्यांपर्यंत पोहोचण्याच्या आणि ब्रह्मांडाचे गूढ उलगडण्याच्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी आपल्यामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचे आभार : डॉ.जितेंद्र सिंह

“चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर, आदित्य एल1चे यशस्वी प्रक्षेपण आपल्या ‘संपूर्णतः वैज्ञानिक आणि संपूर्णतः देशकेंद्री दृष्टीकोना’ची साक्ष देत आहे”

जागतिक पटलावर गौरवस्थानी पोहोचून तेथे पाय रोवण्यासाठी भारतमाता तिच्या 140 कोटी बालकांच्या सामूहिक इच्छेने आणि सामुहिक प्रयत्नांनी येत्या 25 वर्षांच्या अमृतकाळाच्या मार्गावर वाटचाल करत असताना, आजचा दिवस त्या सगळ्या प्रयत्नांची गणना करण्याचा आहे : डॉ.जितेंद्र सिंह

Posted On: 02 SEP 2023 3:04PM by PIB Mumbai

 

इस्रोच्या सर्वाधिक विश्वासार्ह  ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक वाहनाच्या (पीएसएलव्ही-एक्सएल) सहाय्याने  भारताच्या पहिल्या सौर मोहिमेतील आदित्य एल1चे आज श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपण करण्यात आले. भारतासाठी हा सोनेरी क्षण आहे असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन, अवकाश आणि अणुउर्जा विभागाचे तसेच पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.

आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास, पीएसएलव्ही-सी 57 च्या सहाय्याने आदित्य एल-1 चे प्रक्षेपण झाल्यानंतर, मोहिमेच्या नियंत्रण कक्षामध्ये उपस्थित वैज्ञानिक आणि अभियंते यांना उद्देशून केलेल्या भाषणात केंद्रीय मंत्री म्हणाले,संपूर्ण जग ही घटना श्वास रोखून पहात असताना, भारतासाठी मात्र हा क्षण खरोखरच सोनेरी ठरला आहे.

भारतीय शास्त्रज्ञ गेली कित्येक वर्षे, दिवस आणि रात्री या मोहिमेवर एकत्रितपणे काम करत आहेत. पण आता देशासाठी केलेला संकल्प पूर्ण करण्याची आणि आपली पात्रता सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे, केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले.

भारताच्या अवकाश क्षेत्रासाठी नवे आयाम खुले करून दिल्याबद्दल आणि अवकाश क्षेत्रात अमर्याद संधी उपलब्ध असल्याची आपल्याला जाणीव करून दिल्याबद्दल डॉ.जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

ताऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्याहीपलीकडे असलेल्या ब्रह्मांडाचे गूढ उलगडण्यासाठी आपल्याला आत्मविश्वास, धैर्य आणि विश्वास दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार. आणि आपल्या अवकाश क्षेत्रात असलेल्या अमर्याद क्षमतांची जाणीव करून दिल्याबद्दल देखील त्यांचे आभार, केंद्रीय मंत्री म्हणाले. चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर, आदित्य L1 उपग्रहाचे हे यशस्वी प्रक्षेपण देखील 'संपूर्ण विज्ञान आणि संपूर्ण राष्ट्र' या दृष्टिकोनाची साक्ष देते, ज्याचा आपण आपल्या जागतिक संस्कृतीत अवलंब करण्याचा प्रयत्न केला आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.

इस्रोला या दृष्टिकोनाविषयी अंमलबजावणी करण्याचे श्रेय दिले जात असताना, देशभरातील इतर विज्ञान संस्थाही हा दृष्टिकोन घेऊन कोणत्याही स्वरूपात लहान किंवा मोठ्या रूपाने योगदान देण्यासाठी पुढे आल्या आहेत. यातली काही नावे सांगायची झालीच तर -बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स, नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज, मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, एनजीआरआय नागपूर, आयआयटी खरगपूर, आयआयटी मद्रास, आयआयटी दिल्ली, आयआयटी मुंबई, आणि, ही यादी खूप मोठी आहे असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

हा एक सांघिक प्रयत्न आहे असे सांगत डॉ. जितेंद्र सिंह यांनी आदित्य L1 प्रक्षेपणाला " गणनेचा दिवस" असे संबोधले.

हा दिवस, 2 सप्टेंबर 2023 हा दिवस " गणनेचा दिवस"आहे, जेव्हा आपण अमृतकाळाच्या आणि भारत मातेच्या स्वप्नांच्या पुढील 25 वर्षात वाटचाल करत आहोत, जेव्हा आपल्या 140 कोटी बालकांच्या सामूहिक इच्छाशक्तीने आणि सामूहिक प्रयत्नांनी, आपण भारत मातेला जागतिक पटलावर अभिमानाने ते स्थान मिळवून द्यायचे आहे आणि स्वतःला प्रस्थापित करायचे आहे.

यापूर्वी, इस्रोने पुष्टी केली आहे की पीएसएलव्ही सी 57  या अवकाश प्रक्षेपकाच्या मदतीने आदित्य एल-1 चे प्रक्षेपण यशस्वीपणे पूर्ण झाले आहे आणि आदित्य एल-1 उपग्रह त्याच्या अभिप्रेत कक्षेत "अचूक" सोडण्यात आला आहे. त्याचबरोबर भारताच्या पहिल्या सौर वेधशाळेने सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधल्या L1 बिंदूच्या गंतव्यस्थानाकडे आपला प्रवास सुरू केला आहे. या उपग्रहावर सौर पॅनेल लावण्यात आले असल्याने, आदित्य एल-1उपग्रहाने उर्जा निर्माण करण्यास सुरुवात केली, अशी माहिती इस्रोने दिली आहे. आदित्य L1 ही सूर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळ- भारतीय मोहीम आहे.अंतराळातील सूर्याच्या विविध कक्षांचा अभ्यास आणि अंतराळ प्रवास करत पुढील चार महिन्यांत, हे अंतराळयान सूर्य-पृथ्वी प्रणालीच्या लॅग्रेंज पॉइंट 1 (L1) च्या भोवतालच्या अंतराळकक्षेत सोडले जाईल, जो बिंदू पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किमी अंतरावर आहे.

L1 बिंदूच्या भोवतालच्या अंतराळकक्षेत ठेवलेल्या उपग्रहाद्वारे सूर्याला कोणत्याही स्वरुपाच्या छायेव्यतिरीक्त /ग्रहणांशिवाय सतत पहायला मिळण्याचा मोठा लाभ यात होणार आहे.  त्यामुळे सौरक्षेत्रातील निरीक्षणे करणे आणि रिअल टाइममध्ये अवकाशातील हवामानावर त्याचा होणारा परिणाम पाहणे सहज साध्य होईल.

इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि पार्टिकल आणि मॅग्नेटिक फील्ड डिटेक्टर वापरून फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सूर्याच्या (कोरोना) सर्वात बाहेरील थरांचे निरीक्षण करण्यासाठी अंतराळयानामध्ये सात पेलोड असतात.

विशेष व्हॅंटेज पॉइंट L1 चा वापर करून, त्यातील चार पेलोड्स थेट सूर्याकडे तोंड करून रहातात तर उर्वरित तीन पेलोड्स लॅग्रेंज पॉइंट L1 वर कण आणि त्या क्षेत्राचा प्रत्यक्षपणे अभ्यास करतात, अशा प्रकारे आंतरग्रहीय माध्यमात सूर्याच्या गतिच्या प्रभावाचा महत्त्वपूर्ण वैज्ञानिक अभ्यासकरून माहिती प्रदान करतात.

कोरोनल हीटिंग, कॉरोनल मास इजेक्शन, प्री-फ्लेअर आणि फ्लेअर क्रियाकलाप आणि त्यांची वैशिष्ट्ये, अवकाशातील हवामानाची गतिशीलता, कण आणि क्षेत्रांचा प्रसार इत्यादी समस्या समजून घेण्यासाठी आदित्य L1 मोहिमेद्वारे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे.

***

S.Patil/S.Chitnis/V.Yadav/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1954403) Visitor Counter : 139