अंतराळ विभाग

पहिल्या सूर्य मोहिमेसाठी इस्रो सज्ज

Posted On: 29 AUG 2023 8:06PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 ऑगस्ट 2023

 

यशस्वी चांद्रयान मोहिमेनंतर, भारत पहिल्या सूर्य मोहिमेसाठी सज्ज आहे. या मोहिमे अंतर्गत “आदित्य-एल 1”, हे यान इस्रो 2 सप्टेंबर रोजी प्रक्षेपित करण्याची  शक्यता असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती  केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज दिली.

संपूर्ण जग भारताच्या चांद्रयान मोहिमेचा उत्सव साजरा करत असताना, सूर्य मोहिमेबद्दल लोकांचे स्वारस्यही अनेक पटींनी वाढले आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी मैनपुरी येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले.

भारताच्या अंतराळ क्षेत्राला भूतकाळातील बंधनातून मुक्त करण्याचा धाडसी  निर्णय पंतप्रधानांनी घेतला नसता तर हे सर्व शक्य झाले नसते, यासाठी  मागील सरकारने पुढाकार घेतला नव्हता, असे सांगत मंत्र्यांनी याचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. परिणामी, चार वर्षांच्या अल्प कालावधीत, इस्रोच्या आर्थिक स्त्रोतांमध्ये वाढ झाली आहे, या क्षेत्रातील स्टार्टअपची संख्या 4 वरून 150 वर गेली आहे आणि भारताच्या उपग्रह प्रक्षेपण सुविधेची विश्वासार्हता अचानक इतकी वाढली आहे की, युरोपियन उपग्रहांच्या प्रक्षेपणातून आतापर्यंत भारताने 260 दशलक्ष  युरोपेक्षा अधिक  आणि अमेरिकन उपग्रह प्रक्षेपणातून  भारताने 150 दशलक्ष अमेरिकी  डॉलर्सपेक्षा अधिक कमाई केली आहे, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  वैज्ञानिक जगताचा सन्मान वाढवल्यामुळेच आज आपल्याला सूर्याच्या दिशेने पहिले अंतराळ यान  प्रक्षेपित करण्याचा आत्मविश्वास आणि खात्री आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.

सूर्याचा अभ्यास करण्यासाठीच्या  आदित्य-एल 1 या अंतराळ मोहिमेमध्ये,  सात पेलोडसह (यानांमधील  उपकरणे) ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनाचा  (पीएसएलव्ही) वापर करण्यात येणार आहे, असे  डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले. हे अंतराळयान पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर असणाऱ्या  सूर्य-पृथ्वी प्रणालीच्या लॅग्रेंज पॉइंट-1(एल 1) भोवती प्रभामंडल कक्षेत स्थापित केले जाईल. प्रभामंडल कक्षेत ठेवलेल्या उपग्रहाला सूर्याला कोणत्याही  ग्रहणाशिवाय सतत पाहण्याचा मोठा फायदा मिळणार आहे.असेही ते म्हणाले.

मंगळ आणि चंद्र मोहिमेनंतर आदित्य एल-1 ही तिसरी मोहीम आहे. या मोहीमेच्या माध्यमातून सूर्यापासून मिळणार्‍या ऊर्जास्रोतांचा अभ्यास केला जाईल.

 

* * *

N.Chitale/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1953350) Visitor Counter : 153