मंत्रिमंडळ

चांद्रयान-3 मोहिमेचे ऐतिहासिक यश साजरे करण्याचा मंत्रिमंडळाचा ठराव

Posted On: 29 AUG 2023 5:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 ऑगस्ट 2023

 

चांद्रयान-3 मोहिमेचे ऐतिहासिक यश साजरे करण्यात  राष्ट्रासोबत केंद्रीय मंत्रिमंडळ देखील सहभागी होत आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आपल्या वैज्ञानिकांच्या उल्लेखनीय कामगिरीची प्रशंसा  करण्यात आली. हे  केवळ आपल्या अंतराळ संस्थेचे यश नाही तर जागतिक मंचावर भारताच्या प्रगतीचे आणि उन्नतीचे उज्ज्वल प्रतीक आहे. 23 ऑगस्ट हा "राष्ट्रीय अंतराळ दिन" म्हणून साजरा करण्याच्या निर्णयाचे मंत्रिमंडळ स्वागत  करते.

केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था इसरोचे त्यांच्या प्रयत्नांबद्दल अभिनंदन केले. आपल्या वैज्ञानिकांचे आभार, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. चंद्रावर  अचूक अंदाजासह उतरणे हीच एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. कठीण परिस्थितीवर मात करून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणे हा  आपल्या वैज्ञानिकांच्या गुणवत्तेचा दाखला आहे, ज्यांनी शतकानुशतके मानवी ज्ञानाच्या सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला आहे. चंद्रावरून ‘प्रज्ञान’ रोव्हरद्वारे पाठवल्या जाणार्‍या माहितीचा खजिना ज्ञानात भर घालेल आणि चंद्राचे आणि त्याच्यापलीकडील  गूढ शोधण्याचा मार्ग सुकर  करेल.

तंत्रज्ञानविषयक प्रगती आणि नावीन्यपूर्ण शोधांचा प्रयत्न होत असलेल्या या युगात भारताचे वैज्ञानिक  ज्ञान, समर्पण आणि कौशल्याचा तेजस्वी प्रकाशस्तंभ आहे यावर मंत्रिमंडळाचा ठाम विश्वास आहे . त्यांचे  विश्लेषणात्मक कौशल्य , नव्याचा शोध घेण्याची चौकस वृत्ती आणि ध्यास प्रति उत्कट वचनबद्धतेने देशाला  जागतिक  स्तरावरील वैज्ञानिक कामगिरीमध्ये आघाडीवर नेले आहे. उत्कृष्टतेचा त्यांचा अथक ध्यास, जिज्ञासा आणि आव्हानांवर मात करण्याची अदम्य इच्छाशक्तीने  आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची प्रतिष्ठा तर वाढवलीच शिवाय  इतर असंख्य लोकांना मोठी स्वप्ने पाहण्यास आणि जागतिक ज्ञानाच्या विशाल भांडारात योगदान देण्यासाठी प्रेरित केले.

चांद्रयान-3 आणि एकूणच भारताच्या अंतराळ कार्यक्रमाच्या यशामध्ये महिला वैज्ञानिकांनी मोठ्या संख्येने  योगदान दिले आहे हे पाहून मंत्रिमंडळाला अभिमान वाटतो. आगामी काळात अनेक महत्वाकांक्षी महिला वैज्ञानिक यामुळे प्रेरित होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूरदर्शी आणि अनुकरणीय नेतृत्व आणि मानव कल्याण तसेच  वैज्ञानिक प्रगतीसाठी  भारताच्या अंतराळ कार्यक्रमाप्रति  त्यांच्या अतूट  वचनबद्धतेचे मंत्रिमंडळ  अभिनंदन करते. आपल्या वैज्ञानिकांच्या  क्षमतेवरचा त्यांचा विश्वास आणि त्यांनी सातत्याने दिलेले  प्रोत्साहन यामुळे त्यांचे मनोबल नेहमीच उंचावले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी प्रथम गुजरात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर देशाचे पंतप्रधान म्हणून, एकूण 22 वर्षांचा दीर्घ कालावधी सरकारमधील प्रमुखपदावरील व्यक्ती म्हणून व्यतीत केला आहे आणि त्यामुळे सर्व चांद्रयान मोहिमांमध्ये त्यांची एक भावनिक जवळिकता आहे. जेव्हा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अशा मोहिमेची संकल्पना मांडली तेव्हा मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी कार्यरत होते. वर्ष 2008 मध्ये जेव्हा चांद्रयान-1 चे यशस्वी प्रक्षेपण झाले तेव्हा मोदी इस्रोमध्ये गेले आणि त्यांनी व्यक्तीशः वैज्ञानिकांचे अभिनंदन केले. चांद्रयान-2 या मोहिमेच्या वेळी, अवकाशाच्या संदर्भात पाहता, भारत चंद्रापासून नजीक होता, तेव्हा पंतप्रधानांचे समजूतदार नेतृत्व आणि मानवी स्पर्शाने वैज्ञानिकांचा उत्साह वाढवला, त्यांच्या निर्धाराला पोलादी मजबूती दिली आणि अधिक उत्तम हेतूसह या मोहीमेचा पाठपुरावा करण्याची प्रेरणा पंतप्रधानांनी त्यांना दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञान आणि नवोन्मेष यांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. गेल्या 9 वर्षांत घडवून आणलेल्या सुधारणांच्या साखळीमुळे संशोधन आणि नवोन्मेष यांच्याकरिता अधिक वातावरण निर्माण झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासगी क्षेत्र आणि आपले स्टार्ट अप उद्योग यांना अवकाश संशोधन क्षेत्रासाठी भारतात अधिक संधी मिळतील अशी खात्री दिली आहे. अवकाश क्षेत्रातील उद्योग,शिक्षण क्षेत्र आणि स्टार्ट अप यांची परिसंस्था निर्माण करण्यासाठी आणि अवकाशविषयक जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये मोठा वाटा मिळवण्यासाठी जून 2020 मध्ये केंद्रीय अवकाश मंत्रालयाच्या अखत्यारीत, स्वायत्त संस्था म्हणून आयएन-एसपीएसीईची स्थापना करण्यात आली. ही संस्था, अवकाश संशोधनाच्या विश्वात, भारताची झेप आणखी वाढवण्यासाठीचे साधन झाली आहे. हॅकेथॉन्सच्या आयोजनावर भर दिल्यामुळे देशातील तरुण भारतीयांसाठी अनेकानेक संधी खुल्या झाल्या आहेत.

चंद्रावर जेथे चांद्रयान-2 ची पाऊलखुणा उमटल्या आहेत त्या जागेला ‘तिरंगा’ आणि चांद्रयान-3 जेथे उतरले त्या जागेला ‘शिवशक्ती’ अशी नावे देण्याच्या निर्णयाचे केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वागत केले आहे. ही नावे आपल्या भूतकाळाचे सार अत्यंत सुंदररित्या व्यक्त करण्यासोबतच आधुनिकतेच्या प्रेरणेचा स्वीकार दर्शवतात. हे नावे म्हणजे केवळ शीर्षके नाहीत. ही नावे म्हणजे आपल्या लाखो वर्षे जुन्या वारशाला आपल्या वैज्ञानिक महात्त्वाकांक्षांशी अत्यंत कुशलतेने जोडणारा धागा आहेत.

चांद्रयान-3 चे यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “जय विज्ञान, जय अनुसंधान ” या घोषणेची  सर्वात मोठी साक्ष आहे.अंतराळ क्षेत्रात आता भारतीय देशांतर्गत स्टार्ट-अप आणि एमएसएमईसाठी आणखी वाव  निर्माण  होईल आणि लाखो रोजगाराची निर्मिती आणि आणि नवीन संशोधनांना  वाव मिळेल.हे भारतातील तरुणांसाठी संधींचे  जग खुले करेल.

चांद्रयान -3 मोहिमेच्या यशातून मिळणारे ज्ञान विशेषतः ग्लोबल साऊथमधील देशांच्या  मानवतेच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी उपयोगात आणले जाईल, असे निःसंदिग्धपणे सांगत पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी वसुधैव कुटुंबकमवरची आपल्या कालातीत विश्वासाची भावना पुन्हा एकदा व्यक्त  केली आहे. भारतातील प्रगतीची ज्योत कायमच  इतरत्र लोकांचे जीवन उजळेल.

मंत्रिमंडळाचा असा विश्वास आहे की,  अंतराळ क्षेत्रातील भारताची प्रगती ही केवळ ऐतिहासिक वैज्ञानिक कामगिरीपेक्षा अधिक असून ही  प्रगती, आत्मनिर्भरता आणि जागतिक नेतृत्वाचा दृष्टीकोन दर्शविते. हे उगवत्या नव्या भारताचेही प्रतीक आहे. उपग्रह दळणवळण आणि हवामानशास्त्रापासून ते कृषी आणि आपत्ती व्यवस्थापनापर्यंत सर्व उद्योगांमध्ये अधिक संधी निर्माण करण्यासाठी या प्रगतीचा पुरेपूर लाभ  घेण्याचे आवाहन  आम्ही आमच्या देशवासियांना करतो. आपल्या  नवोन्मेषाचा  थेट उपयोग लोकांना व्हावा, आपल्या  पायाभूत सुविधांमध्ये वाढ व्हावी, आपल्या डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना मिळावी  आणि विविध क्षेत्रांना महत्त्वपूर्ण डेटा उपलब्ध व्हावा याच्या सुनिश्चितीसाठी आपण  काम केले पाहिजे.

विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या या युगात, अधिकाधिक तरुणांना विज्ञानाकडे प्रेरित करण्याच्या दृष्टीने, शिक्षण जगताशी संबंधित असलेल्यांना मंत्रिमंडळ विशेष आवाहन करते.चांद्रयान-3 च्या यशामुळे या क्षेत्रांमध्ये रुची जागृत करण्याची संस्मरणीय संधी मिळाली आहे यातूनच देशाच्या प्रगतीच्या नव्या  संधीं निर्माण होतील.  

उत्साहाने , चिकाटीने आणि अढळ निष्ठेने  भारत काय  साध्य करू शकतो त्याची  चांद्रयान-3 ही  एक तेजस्वी साक्ष आहे हे अधोरेखित  करून या ऐतिहासिक मोहिमेत योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची  मंत्रिमंडळाने  प्रशंसा  केली आहे.देशातील लोक, त्यांची मने  आनंदाने आणि अभिमानाने भरलेली आहेत, ते 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी स्वतःला नव्याने समर्पित करतील, असा विश्वासही मंत्रिमंडळाने व्यक्त केला आहे.

 

* * *

JPS/Thakur/Chitale/Sushma/Sanjana/Sonal C/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1953257) Visitor Counter : 224