पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

चंद्रावर चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधानांनी देशाला केले संबोधित

Posted On: 23 AUG 2023 7:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2023

माझ्या प्रिय कुटुंबियांनो,

जेव्हा आपण आपल्या डोळ्यांसमोर असा इतिहास घडताना पाहतो, तेव्हा जीवन धन्य होते. अशा ऐतिहासिक घटना राष्ट्रजीवनाच्या चिरंजीव चेतना बनतात. हा अविस्मरणीय क्षण आहे. हा अभूतपूर्व क्षण आहे. हा विकसित भारताचा शंखनादाचा क्षण आहे. हा नवीन भारताच्या जयघोषाचा क्षण आहे. अडचणींचा महासागर पार करण्याचा हा क्षण आहे. विजयाच्या चंद्रपथावर मार्गक्रमण करण्याचा हा क्षण आहे. हा क्षण 140 कोटी हृदयांच्या ठोक्याच्या सामर्थ्याचा क्षण आहे. हा भारतातील नव्या ऊर्जेचा, नव्या विश्वासाचा, नव्या चेतनेचा क्षण आहे. भारताच्या उगवत्या भाग्याला आवाहन करण्याचा हा क्षण आहे. अमृतकाळातील पहिल्या यशाचा हा अमृतवर्षाव आहे. आम्ही पृथ्वीवर संकल्प केला आणि तो चंद्रावर साकार केला. आणि आपले वैज्ञानिक सहकारी देखील म्हणाले की भारत आता चंद्रावर पोहचला आहे. आज आपण अवकाशात नवभारताच्या नव्या उड्डाणाचे साक्षीदार झालो आहोत.

मित्रांनो,

ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मी सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे. पण, प्रत्येक देशवासियांप्रमाणे माझेही मन चांद्रयान महाअभियानावर केंद्रित होते. नवा इतिहास घडताच प्रत्येक भारतीय जल्लोष करत आहे, प्रत्येक घरात उत्सव सुरू झाला आहे. मी मनापासून   माझ्या देशवासीयांच्या, माझ्या कुटुंबियांच्या आनंदामध्ये सहभागी आहे. ज्यांनी या क्षणासाठी वर्षानुवर्षे कठोर परिश्रम केले आहेत ती टीम चांद्रयान, इस्रो आणि देशातील सर्व शास्त्रज्ञांचे मी मनापासून अभिनंदन करतो. उत्साह, जल्लोष, आनंद आणि भावनेने भरलेल्या या अद्भुत क्षणासाठी मी 140 कोटी देशवासियांचे खूप खूप अभिनंदन करतो!

माझ्या कुटुंबियांनो,

आपल्या शास्त्रज्ञांच्या कठोर परिश्रमाने आणि प्रतिभेने भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचला आहे, जिथे आजपर्यंत जगातील कोणताही देश पोहोचू शकलेला नाही. आजपासून आता चंद्राशी संबंधित मिथके  बदलतील, कथाही बदलतील आणि नव्या पिढीसाठी म्हणीही बदलतील. भारतात आपण सगळे पृथ्वीला माता आणि चंद्राला मामा म्हणतो.

कधी म्हटले जात असे, चंदा मामा बहुत ‘दूर’ के हैं पण आता हा दिवसही येईल, जेव्हा भारतातली मुलं म्हणतील, - ‘चंदा मामा बस एक ‘टूर’ के हैं’

मित्रांनो,

आजच्या ह्या आनंदाच्या प्रसंगी, मला जगभरातील लोकांना, प्रत्येक देशातील, प्रत्येक प्रदेशातील लोकांनाही काही सांगायचे आहे. भारताचे हे यशस्वी चांद्रयान अभियान केवळ भारताचे एकट्याचे नाही. ह्या वर्षात आपण सगळे भारताच्या जी-20 अध्यक्षपदाचे साक्षीदार आहोत. आमचा दृष्टिकोन, एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य हा असून जगभरात आता त्याचा नाद घुमतो आहे. आम्ही ज्याचे प्रतिनिधित्व करतो आहोत, अशा या मानवकेंद्री दृष्टिकोनाचे जगभर स्वागत होत आहे. आमचे चांद्रयान अभियान देखील, याच मानवकेंद्री दृष्टिकोनावर आधारलेले आहे. म्हणूनच, हे यश, संपूर्ण मानवतेचे यश आहे. आणि हे यश भविष्यात इतर देशांनाही त्यांच्या चांद्र मोहिमा यशस्वी करण्यात मदत करेल. मला विश्वास आहे, की जगातील सर्व देश, ज्यात ग्लोबल साऊथ मधील देशांचाही समावेश आहे, त्यांच्यातही असे यश मिळवण्याची क्षमता आहे. आपण सगळेच चंद्राची आणि त्याच्या पलिकडची इच्छा बाळगू शकतो.

माझ्या कुटुंबियांनो,

चांद्रयान महाअभियानाचे हे यश, भारताच्या उड्डाणाला चंद्राच्या कक्षेच्याही पलीकडे घेऊन जाईल. आम्ही आपल्या सौरमालिकेच्या सीमांचे सामर्थ्यही आजमावणार आहोत, आणि मानवासाठी ब्रह्मांडाच्या असीम संधी प्रत्यक्षात साकार करण्यासाठी देखील आम्ही काम करणार आहोत. 

आम्ही भविष्यासाठी अनेक मोठी आणि महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे ठेवली आहेत. सूर्याचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी इस्रो लवकरच 'आदित्य एल-1' मोहीम सुरू करणार आहे. यानंतर शुक्र हे देखील इस्रोच्या उद्दिष्टांपैकी एक आहे. गगनयानद्वारे, देश आपल्या पहिल्या मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेसाठी पूर्णपणे तयार आहे. भारत पुन्हा पुन्हा हेच सिद्ध करत आहे, की ' 'स्काय इज नॉट द लिमिट'

मित्रहो,

विज्ञान आणि तंत्रज्ञान हा देशाच्या उज्ज्वल भविष्याचा आधार आहे. त्यामुळेच आजचा दिवस देशाच्या कायम स्मरणात राहील. हा दिवस आपल्या सर्वांना उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा देईल. हा दिवस आपल्याला आपले संकल्प साध्य करण्याचा मार्ग दाखवेल. पराभवातून बोध घेऊन विजय कसा मिळवला जातो, याचे प्रतीक म्हणजे हा दिवस. देशाच्या सर्व शास्त्रज्ञांचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन, आणि भविष्यातील अभियानांसाठी अनेक शुभेच्छा! मनःपूर्वक धन्यवाद!

S.Tupe/Sushama/Sonal C/Radhika/Rajashree/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1951508) Visitor Counter : 195