अंतराळ विभाग

चांद्रयान-3 मोहिमेमुळे भारताकडे अधिकाधिक आंतरराष्ट्रीय सहयोगी आकर्षित - डॉ.जितेंद्र सिंह

Posted On: 22 AUG 2023 9:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2023

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार),पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री तसेच कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन आणि अणुउर्जा तसेच अवकाश विभागाचे राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले की चांद्रयान-3 मोहिमेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरुन भारताकडे अधिकाधिक प्रमाणात सहयोगी आकर्षित होत आहेत.

भारत- मॉरीशस संयुक्त उपग्रहाच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी मॉरीशसचे माहिती तंत्रज्ञान, दळणवळण आणि नवोन्मेष (एमआयटीसीआय) मंत्री दर्शानंद दीपक बाल्गोबीन यांच्या नेतृत्वाखालील उच्च-स्तरीय प्रतिनिधीमंडळाने आज नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांची भेट घेतली त्यावेळी डॉ.जितेंद्र सिंह  बोलत होते.

त्रयस्थ मोहिमांना पाठबळ देण्यासाठी मॉरीशसमध्ये उभारलेल्या इस्रोच्या भौगोलिक केंद्राचा वापर करू देण्याबाबत देखील भारत आणि मॉरीशस यांनी संमती दर्शवली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उल्लेखनीय अमेरिका भेटीदरम्यान आर्टमिस अॅकॉर्डसवर स्वाक्षऱ्या करून भारताने जगातील इतर देशांशी अवकाश क्षेत्रात सहयोगी संबंध प्रस्थापित करण्यासाठी तुल्यबळ भागीदार म्हणून स्वतःची क्षमता दाखवून दिली आहे असे केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह  यांनी यावेळी सांगितले.

मॉरीशसचे मंत्री बाल्गोबीन यांनी याआधी म्हणजे  17 ऑगस्ट 2023 रोजी बेंगळूरू येथील इस्रोच्या केंद्राला भेट दिली. या भेटीदरम्यान इस्रोच्या अधिकाऱ्यांनी भारत- मॉरीशस संयुक्त उपग्रहासंदर्भातील तांत्रिक तपशील तसेच या उपग्रहाच्या उपयुक्ततेच्या क्षमता यांची माहिती बाल्गोबीन यांना दिली.

आजच्या भेटीदरम्यान दोन्ही मंत्र्यांनी मॉरीशसमध्ये उभारलेल्या इस्रोच्या ग्राउंड स्टेशनच्या  व्याप्तीचा विस्तार करून त्यात युरोपियन अवकाश संस्थेसह इतर त्रयस्थ मोहिमांचा समावेश करण्याबाबत संमती दर्शवली. तसेच, अशा प्रकारच्या सहयोगी संबंधांच्या सुरळीत स्थापनेसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या सामंजस्य करारातील सुधारणेवर स्वाक्षऱ्या करण्याला देखील त्यांनी मान्यता दिली.

उपग्रहांचा तसेच प्रक्षेपकांचा मागोवा घेण्यासाठी गेल्या 3 दशकांहून अधिक काळ मॉरीशस येथे इस्रोचे हे  केंद्र कार्यरत आहे. सध्या या केंद्रामध्ये दोन अँटेना (11 मीटर व्यास असलेल्या) सतत कार्यरत असून त्यांचे संचालन मॉरीशसमधून केले जाते.

केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह  म्हणाले की भारताने 1999 मध्ये दूरस्थ संवेदन केंद्राची उभारणी करून आणि उपग्रहाकडून मिळालेली मॉरीशसच्या भूभागाशी संबंधित माहिती पुरवून मॉरीशसला मदत केली आहे. तसेच अवकाश तंत्रज्ञानाच्या वापराबाबत भारतीय संस्थांनी दिलेल्या प्रशिक्षण अभ्यासक्रमांचा लाभ मॉरीशसच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली.

केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह आणि बाल्गोबीन यांनी अवकाश क्षेत्रातील सहकार्यासारख्या मुद्द्यांवर देखील चर्चा केली, त्यासाठी त्यांनी (i) उपग्रहाकडून मिळालेली पृथ्वीच्या निरीक्षणाशी संबंधित माहिती; (ii) उपग्रहाने पुरवलेली माहिती, भूअवकाशीय स्तर तसेच मॉरीशसशी संबंधित मूल्यवर्धित सेवा यांच्यासह ‘भारत- मॉरीशस अवकाश पोर्टल’चे विकसन;(iii)अवकाश क्षेत्रातील उद्योगांच्या पातळीवर सहयोगी संबंध स्थापन करण्यासाठी चर्चांना सुरुवात करणे यावर विचारविनिमय केला.

 

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1951237) Visitor Counter : 139