राष्ट्रपती कार्यालय
केंद्रीय जल अभियांत्रिकी सेवेतील अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
पाण्याचे कार्यक्षम व्यवस्थापन ही जल सुरक्षा आणि आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ली आहे : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Posted On:
21 AUG 2023 2:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑगस्ट 2023
केंद्रीय जल अभियांत्रिकी सेवेतील अधिकाऱ्यांनी आज (21 ऑगस्ट 2023) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.
पाणी ही जीवनातील मूलभूत गरज असून जलव्यवस्थापन ही प्रत्येक पिढीसमोरील अत्यंत महत्वाची आणि आव्हानात्मक बाब ठरली आहे असे सांगून पाण्याशी संबंधित पायाभूत सेवा सुविधांचा विकास करण्यात केंद्रीय जल अभियांत्रिकी सेवेतील अधिकारी देत असलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख राष्ट्रपतींनी यावेळी केला. तसेच या अधिकाऱ्यांनी केलेल्या जल अभियांत्रिकी क्षेत्रातील उपाययोजनांमुळे, राष्ट्र मानवनिर्मित आणि नैसर्गिक रीत्या होणाऱ्या पाण्याच्या टंचाईचा सामना करायला अधिक सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जलस्रोतांचा शाश्वत विकास आणि पाण्याचे कार्यक्षम व्यवस्थापन ही जल सुरक्षा आणि आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ली आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले. अधिकाधिक आर्थिक वृद्धी, वाढते शहरीकरण आणि विकासामुळे, येणाऱ्या काळात उपलब्ध स्रोतांचा पुरेपूर वापर करणे ही काळाची गरज असेल, असे त्या म्हणाल्या. हवामानाच्या बदलत्या स्वरूपामुळे आधीच जल क्षेत्रावर मोठा परिणाम होत असून आपल्या देशात तर वेगवेगळ्या भागातील स्वाभाविक प्रादेशिक रचना आणि हवामानाचे स्वरूप भिन्न आहे. सध्याच्या आणि येणाऱ्या काळातील आव्हानांना तोंड देण्यासाठी जल अभियांत्रिकी सेवेतील अधिकाऱ्यांनी एक समग्र दृष्टिकोन अंगिकारण्याच्या बाबतीत महत्वाची भूमिका बजावणे अपेक्षित आहे, असे त्या म्हणाल्या. जलस्रोतांचा शाश्वत पद्धतीने विकास आणि व्यवस्थापन करण्यावर त्यांनी भर द्यावा असा सल्ला राष्ट्रपतींनी दिला.
राष्ट्रपतींच्या भाषणासाठी येथे क्लिक करा
* * *
Jaydevi PS/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1950760)
Visitor Counter : 117