आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

“वन अर्थ वन हेल्थ-अॅडव्हांटेज हेल्थकेअर इंडिया” पोर्टलच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीया यांचे बीजभाषण


डॉ. मनसुख मांडवीया यांच्या हस्ते ‘अॅडव्हांटेज हेल्थकेअर इंडिया वन स्टॉप डिजिटल पोर्टल फॉर पेशंट्स आणि वर्कफोर्स मोबिलिटी या पोर्टल्सचे उद्घाटन

या दोन पोर्टल्सची सुरुवात केवळ भारतासाठी मैलाचा दगड नाही, तर आपल्या जागतिक जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल, भारत कायमच आरोग्यविषयक नवोन्मेष क्षेत्रात आघाडीवर : डॉ. मनसुख मांडवीया

Posted On: 17 AUG 2023 4:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑगस्ट 2023

 

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीया यांनी आज गांधीनगर इथे, वन अर्थ वन हेल्थ अॅडव्हांटेज हेल्थकेअर इंडिया कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात बीजभाषण केले. केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल, आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यावेळी उपस्थित होते. त्याशिवाय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, प्रा. एस.पी. सिंह बाघेल, आयुष राज्यमंत्री, डॉ. महेंद्रभाई मुंजपारा, नीती आयोगाचे सदस्य, डॉ. व्ही.के. पॉल, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस आणि गुजरातचे आरोग्य मंत्री हृषीकेश पटेल यावेळी उपस्थित होते.

मालदीवचे आरोग्य राज्यमंत्री शाह महीर, उपमंत्री सफिया मोहम्मद सईद, सोमालियाचे डॉ. मोहम्मद मोहम्मद, आरोग्य उपमंत्री मोहन बहादूर बस्नेत, नेपाळचे आरोग्य आणि लोकसंख्या मंत्री, डॉ. केहेलिया रामबुकवेला आणि श्रीलंका सरकारचे आरोग्य मंत्री उपस्थित होते.

सर्वोदय आणि अंत्योदयाच्या संकल्पना प्रत्यक्षात अस्तित्वात आणून सार्वजनिक आरोग्य व्याप्ती मोठ्या प्रमाणात व्यापक करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचे कौतुक करून आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की, भारताने आरोग्य सेवा क्षेत्रात जागतिक स्तरावर तसेच स्वतःच्या देशात प्राथमिक आणि डिजिटल क्षेत्रात आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते, 'द अॅडव्हांटेज हेल्थ केअर इंडिया - वन स्टॉप डिजिटल पोर्टल फॉर पेशंट' आणि 'वर्कफोर्स मोबिलिटी' अशा दोन पोर्टल्सचे उद्घाटन केले. केले, "या दोन पोर्टल्सची सुरुवात केवळ भारतासाठी एक मैलाचा दगड नाही, तर आमच्या जागतिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आरोग्य सेवा नवोन्मेष क्षेत्रात, भारत नेहमीच आघाडीवर राहिला आहे.” असे डॉ. मांडवीया पुढे म्हणाले, " या पोर्टल्सच्या माध्यमातून आजच्या आरोग्य सेवेतील काही महत्त्वाच्या आव्हानांवर काही ठोस उपाययोजना आम्ही सांगत आहोत” असे मांडवीया म्हणाले.

भारतातील आरोग्य सेवेविषयी सविस्तर माहिती देत, डॉ. मांडवीया म्हणाले की, आज देशात आधुनिक वैद्यकीय शास्त्रात 1.3 दशलक्ष अॅलोपॅथिक डॉक्टर्स, 80 हजार आयुष डॉक्टर्स आणि 3.4 दशलक्ष परिचारिका तसेच दायी आणि सहायक परिचारिका कार्यरत आहेत. आरोग्यसेवेत आज भारताचे आरोग्य व्यावसायिक जगाच्या विविध भागात प्रवास करुन, आपल्या सेवा जागतिक समुदायापर्यंत पोहोचवतात. भारतात आरोग्याचे कार्य ही एक सेवा मानली जाते, याचा पुनरुच्चार करत, डॉ. मांडवीया म्हणाले की आज जेव्हा देश, एक लोककेंद्री, मूल्याधारित आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे, अशावेळी वैद्यकीय सेवांसाठी जगभर प्रवास केल्यामुळे परस्परांच्या ज्ञानाची देवाणघेवाण, शाश्वत भागीदारी आणि एकत्रित ऊर्जेचा वापर करणे शक्य झाले आहे, ज्यातून जागतिक आरोग्यविषयक व्यवस्था उभी राहात आहे, असे ते म्हणाले.

“आम्ही एक अधिक समावेशक आणि न्याय्य जग निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहोत, जिथे आरोग्यसेवेला कोणतीही सीमा नसेल आणि जिथे कुशल आरोग्यसेवा देणारे व्यावसायिक आवश्यक ते बदल घडवू शकतील. प्रत्येक राष्ट्राचा, प्रत्येक नागरिकाचा आणि प्रत्येक सजीवाचा आवाज ऐकणारी, त्यांना सेवा देणारी एक आरोग्य व्यवस्था तयार करण्याच्या दिशेने आमचे सामूहिक प्रयत्न असतील.” असे मांडवीया म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाची प्रशंसा करत केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितले की लवचिक जागतिक आरोग्यसेवा यंत्रणा उभारण्यासाठी भारताने जी-20 अध्यक्षतेत मांडलेल्या ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या संकल्पनेमध्ये वैद्यकीय मूल्य प्रवास म्हणजेच वैद्यकीय कारणाने केला जाणारा प्रवास आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील मनुष्यबळाचे दळणवळण या अत्यंत महत्त्वाच्या पैलूची पूर्तता करण्याचा समावेश आहे. ते पुढे म्हणाले, “आपल्या पारंपरिक आरोग्यसेवा प्रणालीतील प्रतिबंधात्मक तसेच प्रवर्तक दृष्टीकोनाने आजच्या आधुनिक युगामध्ये, विशेषतः नजीकच्या भूतकाळात जागतिक आरोग्य धोक्यात आलेले असताना, अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. केंद्रीय आयुष मंत्र्यांनी यावेळी बोलताना आंतरराष्ट्रीय, क्षेत्रीय तसेच राष्ट्रीय पातळ्यांवरील परिणामकारक प्रशासनाच्या माध्यमातून पारंपरिक चिकित्सेतील सुसंवादी तसेच समन्वयीत धोरणांच्या अंमलबजावणीचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “वैद्यकीय उपचारांच्या पारंपरिक प्रणालीतील सुप्त सामर्थ्य बाळगणारा भारत आरोग्य सेवा क्षेत्राच्या परिस्थितीतील चिंताजनक बदलांचे परिणाम कमी करण्यात अत्यंत निर्णायक भूमिका बजावू शकतो.”

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार म्हणाल्या, “सध्याच्या काळात, आरोग्य या संकल्पनेसाठी समग्र दृष्टीकोन स्वीकारण्याची गरज आहे आणि जगभरातील वैद्यकीय कारणांसाठी प्रवास करणाऱ्यांच्या स्वास्थ्यासाठी पारंपरिक आरोग्यसेवा उपचारपद्धती किंवा आयुष उपचार देऊ करण्याची अद्वितीय क्षमता भारताकडे आहे. “पारंपरिक औषधयोजना आणि आधुनिक उपचारपद्धती यांचे एकत्रीकरण हा सर्वांसाठी, विशेषतः दुर्गम भागातील रुग्णांसाठी परवडण्याजोग्या दरात आणि सुलभतेने उपलब्ध होऊ शकणाऱ्या आरोग्यसुविधेचा अत्यावश्यक पैलू आहे,” यावर त्यांनी अधिक भर दिला.

वैद्यकीय कारणांसाठी केल्या जाणाऱ्या प्रवासाच्या चौकटीच्या मदतीने देण्यात येणाऱ्या मूल्याधारित आरोग्य सेवेचे महत्त्व अधोरेखित करत केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत म्हणाले, “आपले आरोग्यविषयक विविध प्राधान्यक्रम साध्य करण्यासाठी आपण रुग्ण-केंद्री आरोग्यसेवेवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. जेव्हा रुग्ण भौगोलिक मर्यादांच्या पलीकडे जाऊन वैद्यकीय निदान, उपचार, शस्त्रक्रिया-पश्चात उपचार आणि त्यानंतरचे उपचार यांच्यासह आरोग्य सुविधांच्या व्यापक श्रेणीतून निवड करण्यास सक्षम होतील तेव्हाच समावेशक आरोग्य सेवा साध्य झाली असे म्हणता येईल.”

याप्रसंगी बोलताना जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधनोम घेब्रेयेसस म्हणाले की वैद्यकीय कारणांसाठी केल्या जाणाऱ्या प्रवासामुळे अनेक देशांना त्यांच्या राष्ट्रीय क्षमतांची उभारणी करणे शक्य होईल. वैद्यकीय मूल्य प्रवासाचा उपयोग करून घेऊन अनेक देश जगाच्या इतर भागात उपलब्ध न होऊ शकणाऱ्या, न परवडणाऱ्या किंवा सुलभरीत्या न मिळणाऱ्या विशेष स्त्रोत आणि सेवा यांचा पुरवठा करू शकतील. ते पुढे म्हणाले की, डिजिटल आरोग्य सेवा हे फार महान कौशल्य असून ही सेवा आयुष्मान भारत आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्रांसारख्या मंचामध्ये टेलीमेडिसिनसारख्या सेवांच्या माध्यमातून रुग्णांना वैद्यकीय यंत्रणेपर्यंत पोहोचण्यास सक्षम करते. डिजिटल आरोग्य सुविधा दुर्गम भागांमध्ये परवडणारी आरोग्यसेवा मिळण्यातील आणि अशा सुविधा मिळवणे ज्यांना परवडणारे नाही असे रुग्ण, यांच्यातील दरी सांधते असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी आज युरोपियन महासंघ, जर्मनी आणि सौदी अरेबिया यांच्या प्रतिनिधींसमवेत द्विपक्षीय बैठका घेतल्या. अधिक आरोग्यदायी भविष्यकाळासाठी सहकारी संबंध आणि सामायिक प्राधान्यक्रम या क्षेत्रांबाबत विचारविनिमय करण्याची संधी या द्विपक्षीय बैठकांच्या माध्यमातून या देशांना मिळाली.

युरोपियन महासंघाच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीमध्ये आरोग्यसेवा प्रणाली सशक्त करण्यावर अधिक भर देण्यात आला. त्याबरोबरच, युरोपियन महासंघातील औषधनिर्मिती कंपन्या, वैद्यकीय मूल्य प्रवास तसेच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन यामध्ये संयुक्त सहयोगी प्रकल्पांच्या शक्यतांची चाचपणी करण्यासाठी भारतातील आयुर्वेद टेलीमेडिसिन क्षेत्र; वैद्यकीय चाचण्या आणि संशोधन यावर विशेषत्वाने लक्ष केंद्रित करून रोगविषयक निरीक्षण आणि क्षमता निर्मिती करण्यासाठीच्या क्षमता वाढविण्यावर देखील या बैठकीत चर्चा झाली. यापुढील काळात, किमान टिकाऊ उत्पादन, डिजिटल आरोग्यविषयक जागतिक उपक्रम आणि वैद्यकीय प्रतिबंधात्मक उपाययोजना यांच्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

सौदी अरेबियासोबत झालेल्या  बैठकीत नियामक आवश्यकता, संयुक्त उपक्रम, विशेषतः ए पी आय  मध्ये तंत्रज्ञान हस्तांतरण, जोखीम कमी करण्यासाठी आणि पुरवठा साखळी टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यातील लवचिकता वाढवण्याबाबत अनुभवांची देवाणघेवाण आणि सर्वोत्तम पद्धतींचा समावेश करण्यात आला. याशिवाय औषधनिर्माण क्षेत्रातील औषध नियामक आणि औषधकोष यांच्यात समन्वय आणि सहकार्य वाढवण्यासह वैद्यकीय मूल्य असलेल्या  पर्यटनाला चालना देणे , डिजिटल सार्वजनिक वस्तुंना प्रोत्साहन देणे आणि डिजिटल आरोग्य तसेच पारंपरिक औषधे आणि योगाभ्यास यामध्ये त्यांनी  स्वारस्य दाखवले. भारतीय वैद्यकीय उपकरणं उद्योगामध्ये असलेल्या  अपार क्षमतांची जाणीव करून देण्यासह त्याचे लाभ मिळवण्यासाठी गुंतवणूक वाढवणे, संशोधन आणि विकास आणि संयुक्त उपक्रमांच्या स्वरूपात सहकार्य या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात आले. भविष्यातील आशाआकांक्षा लक्षात घेऊन आरोग्य क्षेत्रातील सहकार्य याविषयावरील सामंजस्य करारावर स्वाक्षरी, पारंपारिक औषधांसह इंडियन फार्माकोपियाला मान्यता आणि स्वीकृती तसेच वैद्यकीय मूल्य प्रवासाच्या क्षेत्रात प्रस्तावित इरादा पत्राचा समावेश आहे.

जर्मनी आणि भारताच्या बैठकीत औषधनिर्माण क्षेत्रातील/औषध नियामकांमध्ये आणि फार्माकोपियामधील सहकार्य केंद्रस्थानी ठेवून, भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (आय सी एम आर) आणि फेडरल मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च यांच्यातील सहकार्य, वैद्यकीय मूल्य प्रवासाद्वारे मूल्य-आधारित आरोग्यसेवा मजबूत करणे, पारंपारिक औषधांमध्ये सहकार्य, डिजिटल सार्वजनिक वस्तूंचा प्रचार आणि डिजिटल आरोग्य सहकार्य यावर लक्ष केंद्रित केले गेले.

भविष्यातील उपक्रमांअंतर्गत  आय सी एम आर  आणि जर्मन रिसर्च फाऊंडेशन यांच्यातील सामंजस्य कराराअंतर्गत सहकार्य, आय सी एम आर  आणि फेडरल मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च (बी एम बी एफ) यांच्यातील विशेष व्यवस्थेअंतर्गत सहकार्य, इंडो-जर्मन S&T करारांतर्गत जर्मनी दिल्ली, किमान व्यवहार्य उत्पादनात सुधारणा, सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन म्हणजेच केंद्रीय औषध प्राधिकरण (सीडीएससीओ) आणि फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी (बीएफआरएम) द पॉल-एहरलिच-इन्स्टिट्यूट ऑफ द फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी (पीई) च्या फेडरल इन्स्टिट्यूट फॉर ड्रग अँड मेडिकल डिव्हायसेस यांच्यात वैद्यकीय उत्पादनांचे नियमन या क्षेत्रात संयुक्त घोषणापत्र (जेडीआय) वर स्वाक्षरी यांचा समावेश असेल.

या कार्यक्रमाला भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफ एस एस ए आय ) चे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. कमला वर्धन राव, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव विशाल चौहान, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सहसचिव आराधना पटनायक, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव अभिषेक सिंग, सरकारी अधिकारी, सीआयएस, आसियान, सार्क, आफ्रिका आणि मध्य पूर्व प्रदेशांसह ७० हून अधिक देशांचे प्रतिनिधी आणि उद्योग क्षेत्रातील अधिकारीही उपस्थित होते.

 

* * *

S.Patil/Radhika/Sanjana/Bhakti/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1949879) Visitor Counter : 180