आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

जी20 भारतीय अध्यक्षता


गुजरातमधील गांधीनगर येथे जी20 आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीचा एक भाग म्हणून पारंपारिक औषधांवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या पहिल्या जागतिक शिखर परिषदेचे झाले उद्घाटन

प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञानाचा अंगीकार करून, 'एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य' या तत्वाला चालना देत आरोग्य-संबंधित शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपण एकत्रितपणे कार्य करू शकतो: डॉ. मनसुख मांडविया

"आधुनिक काळात, नैसर्गिक आणि वनौषधी-आधारित औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांची मागणी पारंपारिक उपचार पद्धतींचे शाश्वत महत्त्व अधोरेखित करते"

"जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक पारंपारिक औषध केंद्राचे मुख्यालय गुजरातमधील जामनगर येथे असून, ते जागतिक स्तरावर पारंपारिक औषधांच्या प्रगतीला चालना देते"

सांस्कृतिक विविधतेचा सन्मान, समुदायांचे सशक्तीकरण आणि आपला सामायिक वारसा साजरा करण्यात पारंपारिक औषधे मोठी भूमिका बजावू शकतात: सर्बानंद सोनोवाल

गुजरात डिक्लेरेशनमुळे, राष्ट्रीय आरोग्य प्रणालींमध्ये पारंपारिक औषधांच्या वापराचे संयुक्तीकरण होईल आणि विज्ञानाद्वारे पारंपारिक औषधांची शक्ती खुली करण्यात मदत होईल अशी मला आशा आहे: डॉ. टेड्रोस अदनोम घेब्रेयसस, महासंचालक, जागतिक आरोग्य संघटना

Posted On: 17 AUG 2023 4:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑगस्ट 2023

 

"पारंपारिक औषधांसाठीची जागतिक परिषद, आरोग्य आणि कल्याणासाठी सर्वांगीण दृष्टिकोनाला चालना देत आशेचा किरण म्हणून काम करत आहे. प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञानाचा अंगीकार करून, 'एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य' या तत्वाला चालना देत आरोग्य-संबंधित शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपण एकत्रितपणे कार्य करू शकतो असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे. पारंपारिक औषधांवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या पहिल्या जागतिक शिखर परिषदेचे उद्घाटन त्यांनी आज केले, त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अदनोम घेब्रेयसस यावेळी उपस्थित होते. आयुष मंत्रालय परिषदेचे सह-यजमानपद भूषवत आहे. गुजरातमधील गांधीनगर येथे 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान सुरू असलेल्या जी20 आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीचा ही परिषद एक भाग आहे. आयुष राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई कालूभाई, गुजरातचे आरोग्य मंत्री ऋषिकेश पटेल, भूतानच्या आरोग्य मंत्री लोन्पो दाशो देचेन वांगमो आणि बोलिव्हियाच्या पारंपारिक औषध विभागाच्या राष्ट्रीय संचालक विवियन टी. कॅमाचो हिनोजोसा हे देखील उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. 

"सर्वांसाठी आरोग्य आणि कल्याणाच्या दिशेने" या संकल्पनेवर आधारित ही परिषद 17 ते 18 ऑगस्ट असे दोन दिवस असणार आहे. गंभीर आरोग्य आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि जागतिक आरोग्य तसेच शाश्वत विकासामध्ये प्रगती करण्यासाठी पारंपारिक पूरक आणि एकात्मिक औषधाच्या भूमिकेचा परिषदेत शोध घेतला जाईल. 

“ही जागतिक शिखर परिषद पारंपारिक आणि पूरक औषधांच्या क्षेत्रात संवाद, कल्पनांची देवाणघेवाण, सहयोग आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीसाठी एक अद्वितीय व्यासपीठ सादर करते. शतकानुशतके, पारंपारिक आणि पूरक औषधांनी वैयक्तिक आणि सामुदायिक आरोग्याला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आधुनिक काळातही, नैसर्गिक आणि वनौषधी-आधारित औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांची मागणी पारंपारिक उपचार पद्धतींचे शाश्वत महत्त्व अधोरेखित करते असे या पारंपारिक औषधांवरील पहिल्या जागतिक शिखर परिषदेच्या निमित्ताने डॉ. मांडविया म्हणाले.

गुजरातमध्ये प्रतिनिधी आणि मंत्र्यांचे डॉ. मांडविया यांनी स्वागत केले. “गांधीनगर, हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाने वसलेले शहर असून या प्रतिष्ठित शिखर परिषदेसाठी अगदी योग्य ठिकाण आहे असे ते म्हणाले. इतिहास आणि संस्कृतीने समृद्ध असलेली गुजरातची भूमी, भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखल्या जाणार्‍या सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या दिग्गजांचे जन्मस्थान आहे. त्यांची अदम्य ध्येयासक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची बांधिलकी यांनी आपल्या देशावर अमिट छाप सोडली आहे असे मांडविया म्हणाले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक पारंपारिक औषध केंद्राचे मुख्यालय गुजरातमधील जामनगर येथे आहे याचा उल्लेख डॉ. मांडविया यांनी केला. “हे केंद्र एक ज्ञान केंद्र म्हणून काम करते. लोकांच्या आणि वसुंधरेच्या भल्यासाठी आधुनिक विज्ञानाशी प्राचीन ज्ञानाचा समन्वय साधते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य कार्यांना पूरक काम करत, जागतिक स्तरावर पारंपारिक औषधांच्या प्रगतीला हे केंद्र  गती देते असे ते म्हणाले.”

सर्बानंद सोनोवाल यांनीही उद्घाटन कार्यक्रमाला संबोधित केले. "पारंपारिक औषधांसाठीच्या पहिल्या जागतिक शिखर परिषदेला खूप महत्त्व आहे. कारण ही परिषद सीमांच्या कक्षांपलीकडे जाते, आरोग्यसेवेच्या भविष्यासाठी मनांना एकत्र आणते आणि जागतिक स्तरावर आरोग्यसेवेतील एका नवीन युगाच्या पहाटेचे दर्शन घडवते असे सोनोवाल म्हणाले." या शिखर परिषदेमुळे पारंपारिक औषधांमध्ये सहकार्यासाठी संभाव्य क्षेत्रे ओळखण्यात आणि नवीन शोधण्यात मदत होईल आणि वैश्विक आरोग्य उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पारंपारिक औषधांचा वापर करण्यात मदत होईल यावर त्यांनी भर दिला.

पारंपारिक औषधांचा स्थानिक समुदायांशी असलेला संबंध सोनोवाल यांनी विशद केला. "सांस्कृतिक विविधतेचा सन्मान, समुदायांचे सशक्तीकरण आणि आपला सामायिक वारसा साजरा करण्यात पारंपारिक औषधे मोठी भूमिका बजावू शकतात" असे ते म्हणाले.

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सार्वत्रिक आरोग्याची व्याप्ती वाढवण्याच्या भारताच्या प्रयत्नांची डॉ. टेड्रोस अदनोम घेब्रेयसस यांनी उद्घाटन सोहळ्यात प्रशंसा केली. एका दिवसापूर्वी त्यांनी आरोग्य आणि कल्याण केंद्राला त्यांनी भेट दिली होती. त्यामुळे त्यांना देशातील प्राथमिक आरोग्य सेवांचा विस्तार पाहता आला. भारताने टेलीमेडिसिनचा अवलंब केल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. टेलीमेडिसिन केवळ आरोग्य सेवा वितरणाचा विस्तार करत नाही तर रुग्णांसाठी वेळ आणि पैसा वाचवण्यास मदत करते असे ते म्हणाले.

पारंपारिक औषधे आणि पर्यावरण यांच्यातील दुव्यावर डॉ. घेब्रेयसस यांनी भर दिला. "पारंपारिक औषधे मानवी संस्कृती इतकेच जुने आहे, सर्व राष्ट्रांतील लोकांनी त्यांच्या जीवनात कधी ना कधी पारंपारिक उपचार पद्धतींचा वापर केला आहे" असे ते म्हणाले. पारंपारिक औषध पद्धतींचा वापर करून अनेक आधुनिक औषधांचे स्त्रोत कसे शोधले जाऊ शकतात यासाठी विलो बार्क, पेरीविंकल यांसारख्या समुदायांच्या शोधकार्यावर त्यांनी प्रकाश टाकला. हेच शोध अ‍ॅस्पिरिन आणि कर्करोगाच्या औषधांचा आधार ठरल्याचे त्यांनी सांगितले.

गुजरात करारामुळे, राष्ट्रीय आरोग्य प्रणालींमध्ये पारंपारिक औषधांच्या वापराचे एकीकरण होईल आणि विज्ञानाद्वारे पारंपारिक औषधांची शक्ती खुली करण्यात मदत होईल अशी आशा आहे असे  डॉ. टेड्रोस अदनोम घेब्रेयसस म्हणाले.

जागतिक व्यापार संघटनेच्या महासंचालक डॉ. न्गोझी ओकोन्जो-इवेला यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे परिषदेत भाग घेतला. पारंपारिक औषध असंगत नसून ते आधुनिक औषधांना पूरक आहेत असे त्यांनी अधोरेखित केले. पारंपारिक औषधांबद्दलची समज वाढवण्यास ही शिखर परिषद मदत करेल आणि येथे उपस्थित मुद्द्यांसाठी एकत्रित आणि सर्वसमावेशक व्यासपीठ म्हणून काम करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांनीही कार्यक्रमाला संबोधित केले. पारंपारिक औषधांवरील पहिल्या जागतिक शिखर परिषदेचे आयोजन करणे ही गुजरात आणि भारतासाठी अभिमानाची बाब आहे असे ते म्हणाले. प्राचीन भारतीय तत्वज्ञानाचा दाखला देत ते म्हणाले, “सर्वे भवन्तु सुखिनः; सर्वे संतु निरामय:, "सर्व सुखी होवोत, सर्व रोगमुक्त होवोत, हीच भारताची सदैव सद्भावना आहे, वसुधैव कुटुंबकम या तत्त्वज्ञानानुसार जग हे एक कुटुंब आहे" असे त्यांनी सांगितले.

भूतानच्या आरोग्य मंत्री लोन्पो दाशो देचेन वांगमो यांनी भूतानमधील सोवा रिग्पा याकडे लक्ष वेधले. “आमची पारंपारिक औषधे ही केवळ उपचार पद्धती नाहीत, तर आमच्या आरोग्य सेवा प्रणालीचा महत्त्वाचा घटक आहेत” असे त्या म्हणाल्या.

पारंपारिक औषधांच्या गरजा, परिणाम, नवोन्मेष आणि पारंपारिक औषध पद्धतींच्या वापरावरील माहिती यापासून जगातील पारंपारिक औषधांच्या विविध पैलूंवर या शिखर परिषदेत दोन दिवस तपशीलवार विचार विनिमय आणि ज्ञानाची देवाणघेवाण होणार आहे. जगभरातील पारंपारिक औषधांचे मूल्य आणि विविधता दर्शविणाऱ्या पारंपारिक औषधांसाठी समर्पित प्रदर्शनाचे देखील आज शिखर परिषदेचा भाग म्हणून उद्घाटन केले जाईल.

सुधांश पंत, सचिव, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय,  राजेश कोटेचा, सचिव, आयुष मंत्रालय, डॉ. हंस क्लुगे डब्ल्यूएचओचे प्रादेशिक संचालक युरोप, आणि डॉ. पूनम खेत्रपाल सिंग, डब्ल्यूएचओचे प्रादेशिक संचालक, दक्षिण पूर्व आशिया प्रदेश, हे देखील उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झाले होते. येत्या दोन दिवसांत जगभरातील शास्त्रज्ञ, पारंपारिक औषधांचे अभ्यासक, आरोग्य कर्मचारी आणि नागरी समाज संघटनांचे सदस्य या कार्यक्रमात सहभागी होतील.

 

* * *

S.Thakur/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1949802) Visitor Counter : 160