आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताचे जी 20 अध्यक्षपद
गुजरातमध्ये गांधीनगर येथे 17 ऑगस्ट पासून जी 20 आरोग्य मंत्र्यांची बैठक सुरु होणार
Posted On:
16 AUG 2023 7:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2023
भारताच्या जी 20 अध्यक्षतेखाली जी 20 आरोग्य मंत्र्यांची बैठक 17 ते 19 ऑगस्ट 2023 दरम्यान गुजरातमध्ये गांधीनगर येथे होणार आहे.
आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थितीचा प्रतिबंध, सूक्ष्मजीव-विरोधी प्रतिरोध आणि 'एक आरोग्य' आराखडा यावर लक्ष केंद्रित करत, सज्जता आणि प्रतिसाद या तीन जी 20 आरोग्य विषयक प्रमुख प्रधान्यांवर जी 20 आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीमध्ये भर दिला जाईल. सुरक्षित, प्रभावी, दर्जेदार, आणि किफायतशीर वैद्यकीय प्रतिकार (लसी, उपचार पद्धती आणि रोग चिकित्सा) उपायांसह औषध निर्माण क्षेत्रातील सहकार्य मजबूत करणे, आणि सर्वांसाठी आरोग्य सुरक्षा आणि आरोग्य सेवा वितरण सुधारण्यासाठी डिजिटल आरोग्य नावोन्मेष आणि उपाय यावर या बैठकीत विचारमंथन होईल.
17 ऑगस्ट, 2023 रोजी होणारी जी 20 प्रतिनिधींची बैठक आणि 18-19 ऑगस्ट, 2023 रोजी होणारी जी 20 आरोग्य मंत्र्यांची बैठक, या पार्श्वभूमीवर, चार कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये वन अर्थ वन हेल्थ अडव्हान्टेज हेल्थ केअर – इंडिया 2023, जागतिक आरोग्य संघटना (WHO) पारंपरिक वैद्यकशास्त्र जागतिक परिषद, इंडिया मेड-टेक एक्स्पो 2023 आणि दक्षिण-पूर्व आशिया प्रदेशामध्ये क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी शाश्वतता, वेग आणि नवोन्मेष परिषद याचा समावेश आहे. जी 20 आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीचा प्रमुख कार्यक्रम म्हणून 19 ऑगस्ट 2023 रोजी वित्त- आरोग्य मंत्र्यांची संयुक्त बैठक देखील आयोजित केली जाईल. जी 20 आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान जी 20 आणि इतर कार्यक्रमांची एकत्रित सत्रे देखील आयोजित केली जातील.
गांधीनगर येथे उद्यापासून सुरु होत असलेल्या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लव अग्रवाल यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली.
इंडिया मेड-टेक एक्स्पो 2023 चे आयोजन भारत सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या औषध निर्माण विभागाने केले आहे. भारताला मेड-टेकचे (वैद्यक-तंत्रज्ञान) जागतिक केंद्र बनवण्यासाठी, वैद्यकीय उपकरणे क्षेत्राच्या भरीव क्षमतेचा उपयोग करणे आणि पुढील वाटचालीवर विचारमंथन करणे, हे याचे उद्दिष्ट आहे.
* * *
S.Kakade/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1949672)
Visitor Counter : 191