रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
पूल आणि इतर बांधकामांची रचना आणि बांधणी यांचा आढावा घेण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्थापन केला रचना विभाग
Posted On:
16 AUG 2023 5:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2023
पूल, बोगदे आणि इतर वैशिष्ट्यपूर्ण बांधकामांची रचना आणि बांधणी यांचा परिणामकारक आढावा घेण्यासाठी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) रचना विभाग स्थापन केला आहे. देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील,पूल, बोगदे, इतर बांधकामे, आरई अर्थात रस्त्यांच्या बाजूला बांधल्या जाणाऱ्या मातीची धूप आणि भूस्खलन प्रतिबंधक भिंती (RE- री इनफोर्समेंट अर्थ किंवा रिटेनिंग वॉल्स), यांची एकंदर रचना, नियोजन, बांधणी आणि देखभाल करण्यासाठी, धोरण आणि मार्गदर्शक तत्वे आखण्याचे काम, हा रचना विभाग करणार आहे.
प्रकल्पाची तयारी, नवीन पुलांचे बांधकाम, सध्याच्या जुन्या / मोडकळीला आलेल्या पुलांच्या स्थितीचे सर्वेक्षण आणि पुनर्वसन, तसेच जुने मोडकळीला आलेले पूल, बांधकामे, बोगदे आणि आर ई भिंतींचा टिकाऊपणा तपासण्यासाठी आवश्यक उपकरणे, यांचा आढावा हा विभाग घेईल. स्टँडअलोन पूल म्हणजे झूलते पूल आणि जून 2023 नंतर सुरू झालेल्या डीपीआर म्हणजे सविस्तर प्रकल्प अहवालाच्या टप्प्यावर असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण बांधकामांचे देखील, हा विभाग पुनरावलोकन करेल.
याशिवाय, हा विभाग, बांधकाम पद्धती, तात्पुरती बांधकामे, 200 मीटरपेक्षा जास्त अंतरावर पूलाच्या बांधकामांचे सुटे भाग उचलण्याच्या आणि योग्य त्या ठिकाणी बसवण्याच्या पद्धती, आणि इतर वैशिष्ट्यपूर्ण बांधकामे, यांचा धावता आढावाही हा विभाग घेईल.
याशिवाय, सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये 200 मीटरपेक्षा जास्त उंची असलेल्या सर्व पूल/बांधकामांच्या रचनांचा आढावा घेतला जाईल. तसेच, 60 मीटरपेक्षा जास्त लांबीचे इतर पूल, 200 मीटरपेक्षा जास्त लांबीची बांधकामे आणि बोगदे, 10 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या आर ई भिंती आणि इतर वैशिष्ट्यपूर्ण बांधकामे, यांचाही धावता आढावा घेण्यात येईल.
रचना पुनरावलोकनाचे काम हाती घेण्यासाठी, सल्लागार, पूलरचना तज्ज्ञ , बोगदा तज्ज्ञ, आर ई भिंत तज्ज्ञ, भू-तंत्रज्ञान तज्ज्ञ, माती/सामग्री चाचणी प्रयोगशाळा यांचा समावेश असलेल्या सल्लागारांचा चमू, यांची सेवा हा विभाग घेईल. प्रत्यक्ष रचना विभागामध्ये सुद्धा, आवश्यकतेनुसार बांधकामांच्या रचनांचा आढावा घेण्यासाठी, रचना तज्ज्ञ/संशोधक/ आय आय टी, एन आय टी या संस्थांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकत असलेले विद्यार्थी, यांचा समावेश असेल.
याव्यतिरिक्त विभाग, नॉएडा इथली भारतीय महामार्ग अभियंता अकादमी (IAHE) आणि पुण्याच्या रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग (IRICEL), यांच्यामार्फत, पूल, बोगदे आणि आर ई भिंतींची रचना, बांधकाम, पर्यवेक्षण आणि देखभाल या विविध पैलूंवर, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांचे अधिकारी आणि कंत्राटदार/सल्लागार यांच्या कर्मचाऱ्यांसाठी, प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित करेल.
पुलांची सर्वेक्षण यादी, रेखाचित्रे, पूल मोडकळीस आला आहे हे निश्चित करणे, यासाठी रचना विभागाद्वारे एक माहिती-तंत्रज्ञानावर आधारीत देखरेख प्रणाली विकसित केली जाईल आणि त्यांच्या दुरुस्ती आणि बांधकामासाठी वार्षिक योजनांचे प्रस्तावदेखील तयार करेल. पूल, बांधकामे, बोगदे आणि आर ई भिंतींच्या अपयशाचे तपशिलवार विश्लेषण करण्यासाठी आणि भविष्यात असे अपयश टाळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याकरता तज्ज्ञांचे पथकदेखील, हा रचना विभाग नियुक्त करेल.
देशभरात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्गावरील पायाभूत सुविधांच्या विकासाची अंमलबजावणी सुरू असल्याने, पूल आणि इतर जुन्या बांधकामांची बांधणी, रचना आणि वस्तुस्थितीची चाचपणी तपासण्यासाठी, स्वयं क्षमता निर्मितीवरही रचना विभाग भर देईल.
* * *
S.Kakade/A.Save/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1949485)