महिला आणि बालविकास मंत्रालय
महिला सक्षमीकरणासंदर्भातल्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या मंत्रीस्तरीय परिषदेने महिला केंद्रित विकासाला गती देण्यासाठीचे उपक्रम केले साजरे
Posted On:
07 AUG 2023 5:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2023
महिला सक्षमीकरण या विषयावरील जी 20 मंत्रीस्तरीय परिषदेचे 2 ते 4 ऑगस्ट 2023 दरम्यान गुजरात मध्ये गांधीनगर येथे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जी 20 सदस्य राष्ट्रे आणि निमंत्रित राष्ट्रांमधील महिला आणि लिंग समानता विभागाचे मंत्री सहभागी झाले होते.
जी 20 सक्षमीकरण आणि W20 मधील समन्वयक अर्थात नोडल अधिकारी या नात्याने महिला आणि बाल विकास मंत्रालयाने सात आंतरराष्ट्रीय बैठकांचे आयोजन केले ज्यामध्ये महिला सक्षमीकरणावरील मंत्रीस्तरीय परिषदेचा समावेश आहे. या परिषदेत अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, युरोपियन युनियन, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, कोरिया प्रजासत्ताक, सौदी अरेबिया, तुर्किए, युनायटेड किंगडम आणि अमेरिका या पंधरा जी 20 सदस्य राष्ट्रांचे 138 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि बांगलादेश, मॉरिशस, नेदरलँड, सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिरात या पाच निमंत्रित राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या परिषदेत साठ पेक्षा अधिक वक्त्यांनी सहभाग घेतला.
या समारंभाच्या उदघाटनपर सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताच्या जी 20 परिषदेच्या अध्यक्षतेचे प्रमुख समन्वयक हर्ष वर्धन श्रुंगला, भारताच्या महिला आणि बाल विकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती झुबिन इराणी; इंडोनेशियाच्या महिला सक्षमीकरण आणि बाल संरक्षण मंत्री धर्मावती; फेडरेटिव्ह रिपब्लिक ऑफ ब्राझील सरकारच्या महिला उपमंत्री मारिया हेलेना गुआरेझी, भारताच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे सचिव इंदेवर पांडे यांनी संबोधित केले.
त्यानंतर जी 20 सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी राष्ट्र स्तरावरील आणि मंत्री स्तरावरील निवेदने सादर केली. या परिषदे दरम्यान, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित एस टी ई एम अशा शैक्षणिक विषयावरील चर्चेसह, डिजिटल कौशल्य, उदयोन्मुख तंत्रज्ञानातील महिलांची भूमिका, तळागाळातल्या नेतृत्वाला चालना देण्यासाठी भागीदारी, संस्कृती आणि महिला उद्योजकता आणि उपक्रम अशा विविध विषयांवर विस्तृत विचारमंथन झाले.
भारताचे महिला आणि बालविकास राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई यांच्या भाषणाने, ब्राझीलला बॅटन सुपूर्द करून आणि भारताच्या महिला आणि बालविकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांच्या समारोपीय भाषणाने मंत्रीस्तरीय परिषदेचा समारोप झाला. यावेळी जी 20 सदस्य राष्ट्र, अतिथी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींमधील महिलांच्या सक्षमीकरणासाठी उत्तरदायित्व असलेल्या जी 20 मंत्र्यांच्या विचारांचे प्रतिनिधित्व करणारे अध्यक्षांचे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये लिंग समानता आणि महिला सक्षमीकरणाचे ध्येय गाठण्यासाठीच्या प्रतिबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला आहे.
या मंत्रीस्तरीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारताची महिला केंद्रित विकासाची संकल्पना त्यांच्या शब्दात सारांशरूपाने मांडली :
"जेव्हा महिला समृद्ध होतात, तेव्हा जग समृद्ध होते. त्यांचे आर्थिक सक्षमीकरण विकासाला बळ देणारे असते. त्यांच्याकडे शिक्षण पोचले की त्यातून जागतिक प्रगतीला प्रेरणा मिळते. त्यांचे नेतृत्व सर्वसमावेशकतेला चालना देते आणि त्यांचा आवाज सकारात्मक बदलांना प्रेरणा देतो.”
केवळ महिला सक्षमीकरण यावर भर न ठेवता भारताच्या जी 20 अध्यक्षतेखाली, महिला केंद्रित विकास हे एक महत्वाचे प्राधान्य क्षेत्र म्हणून उदयाला आले. यासाठी जागतिक स्तरावर एकमत-निर्माण करत भारताने जगभरातील महिलांच्या प्रगतीसाठीचे आदर्श प्रारूप सर्वांसमोर मांडले. यासाठी सात प्रत्यक्ष परिषदा आणि दूरस्थ आंतरराष्ट्रीय बैठकांसह 86 बैठकांचा समावेश आहे. यामध्ये 18 जी 20 राष्ट्र आणि सात निमंत्रित राष्ट्रांचे सुमारे 300 प्रतिनिधी सहभागी झाले होते. भारताने स्थानिक किंवा सामुदायिक स्तरावर महिलांचे सक्षमीकरण आणि महिलांना ओळख मिळावी यावर भर दिला आहे.
मंत्रिस्तरीय परिषदेच्या प्रारंभी भारताच्या महिला आणि बाल विकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी उपस्थितांना भारताच्या जी 20 अध्यक्षतेखालील प्रमुख केंद्रस्थानांविषयी स्मरण करून दिले. यामध्ये शिक्षण : महिला सक्षमीकरणासाठी एक निर्णायक मार्ग , महिला उद्योजकता इक्विटी आणि अर्थव्यवस्थेसाठी एक विजयी स्थिती आणि तळागाळातल्या स्तरापासून प्रत्येक स्तरावर महिलांच्या नेतृत्वाला चालना देण्यासाठी भागीदारी या मुद्द्यांचा समावेश होता.
या सर्व गोष्टींना प्रेरणा देणारा एक मार्ग म्हणजे डिजिटल समावेशकता. भारताने अनेक मूर्त परिणाम साध्य केले असून त्यामध्ये वैविध्य आहे. स्थानिक किंवा तळागाळातील स्तरावर महिलांचे नेतृत्व, नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग असलेले जन भागीदारी उपक्रम आणि महिला आणि हवामान बदल यावर अधिक भर यांचा समावेश आहे.
इंडोनेशियाच्या महिला सक्षमीकरण आणि बाल संरक्षण मंत्र्यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि तंत्रज्ञान-संबंधित शिक्षणात मुली आणि महिलांना समान प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे असे सांगितले.
फेडरेटिव्ह रिपब्लिक ऑफ ब्राझील सरकारच्या महिला उपमंत्री मारिया हेलेना गुआरेझी यांनी वेतनातील लिंगाधारित तफावत दूर करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.
भारताच्या अध्यक्षतेखाली, 19 जी 20 देशांमधील 149 प्रारूप आदर्श उपक्रमांची जी 20 सक्षमीकरणासाठी सर्वोत्कृष्ट पद्धतींच्या प्लेबुक मध्ये नोंद झाली आहे, ज्यामुळे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व उद्योग आणि व्यवसायांमधील महत्वपूर्ण अंतर्दृष्टी आणि सर्वोत्तम पद्धतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
प्रथमच, जी 20 एम्पॉवर अंतर्गत KPI डॅशबोर्ड लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये महिलांच्या भूमिकेकडे लक्ष देईल.
भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात महिलांच्या प्रगतीला प्रोत्साहन देणाऱ्या G20 एम्पॉवरला (मुख्य कार्यकारी अधिकारी, संघटना प्रमुख आणि इतर नेत्यांचा समावेश असलेल्या) लक्षणीय समर्थन मिळाले आहे.
जी 20 सदस्य राष्ट्रांपैकी 9 देशांमधील अडथळ्यांवर मात करणाऱ्या 73 महिलांच्या प्रेरणादायी कथा जी 20 एम्पॉवर वेबसाइटवर अधोरेखित करण्यात आल्या आहेत.
भारताचे जी 20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळाचे मुख्य समन्वयक हर्षवर्धन श्रृंगला यांनी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा यासाठी आयोजित वॉकथॉनपासून फ्लॅशमॉबपर्यंतच्या व्यापक नवकल्पना तसेच मोठ्या संख्येने लोकांचा सहभाग आणि सहभागींनी सामायिक केलेल्या कहाण्याबाबत माहिती दिली.
“जेव्हा आपण 'लिंग समानता' या बाबत चर्चा करतो, तेव्हा त्यातून एक राष्ट्र म्हणून आपण नेहमीच महिलांच्या क्षमता आणि संभाव्यता कशा ओळखल्या आहेत आणि सातत्याने त्यांच्या सक्षमीकरणाला पाठिंबा देण्यासाठी केलेले प्रयत्न प्रतिबिंबित होतात.” असे भारताचे महिला आणि बाल विकास राज्यमंत्री डॉ मुंजपारा महेंद्रभाई यांनी सांगितले
मंत्रिस्तरीय परिषदेचा एक भाग म्हणून आयोजित द्विपक्षीय बैठकांमध्ये जी 20 देशांनी पोषण ट्रॅकरची प्रशंसा केली. पोषण ट्रॅकर हे सुमारे 100 दशलक्ष नोंदणीकृत लोकांची पोषण सेवा आणि शैशव काळजी सेवा वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी शासनाचे महत्वपूर्ण साधन म्हणून विकसित केलेले एक अद्वितीय माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान (ICT) व्यासपीठ आहे.
मंत्रिस्तरीय परिषदेत, भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मागील जी 20 एम्पॉवर आणि W20 बैठकींसह, भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि इतिहास प्रदर्शित करण्यासाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम, सहली आयोजित करण्यात आल्या होत्या, यासोबतच पाहुण्यांसाठी खास भारतीय पक्वान्नांचा बेत ठरवण्यात आला होता. महिलांच्या नेतृत्वाखालील विकास दर्शवण्यासाठी खास प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. महिला नेते, कारागीर, बचत गट आणि विविध राज्यांतील उद्योजकांनी मोठ्या उत्साहाने त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन केले.
महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाची घोडदौड सुरू ठेवण्यासाठीची मशाल आता ब्राझीलकडे सुपूर्द केली जाणार आहे.
* * *
N.Chitale/Bhakti/Shraddha/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1946451)
Visitor Counter : 258