पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसह घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य

Posted On: 14 JUL 2023 11:29PM by PIB Mumbai

महामहीम आणि माझे प्रिय मित्र राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन,दोन्ही देशांचे प्रतिनिधी, 

माध्यम क्षेत्रातले  मित्र, 

नमस्कार !

पॅरिस सारख्या सुंदर शहरात इतक्या उत्साहपूर्ण स्वागतासाठी मी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे आभार मानतो. फ्रान्सच्या जनतेला राष्ट्रीय दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. हा दिवस जगभरात स्वातंत्र्य,समता आणि बंधुता यासारख्या मूल्यांचे प्रतीक मानले जाते. ही मूल्ये आपल्या दोन्ही लोकशाही देशांच्या संबंधांचा मुख्य आधार आहेत.आज या उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होण्याचा गौरव मला प्राप्त झाला.या समारंभाची शान वाढवण्यासाठी भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या तुकड्या यामधे सहभागी झाल्या याचा मला आनंद आहे.भारतीय राफेल विमानांचा  फ्लायपास्ट ही आपण पाहिला.

आपल्या नौदलाचे जहाजही फ्रान्सच्या बंदरामध्ये होते.म्हणजे पाणी,भूमी आणि आकाश या सर्व ठिकाणी आपल्या वाढत्या सहकार्याचे एक उत्तम चित्र आपल्याला एकाचवेळी पाहायला मिळाले.राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी फ्रान्सच्या  सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारानेही मला सन्मानित केले. हा सन्मान म्हणजे 140 कोटी भारतवासियांचा सन्मान आहे.

मित्रहो,   

आपण आपल्या धोरणात्मक भागीदारीची पंचवीस  वर्षे साजरी करत आहोत.गेल्या पंचवीस वर्षांच्या भक्कम आधारावर आम्ही येत्या पंचवीस वर्षांसाठीचा आराखडा तयार करत आहोत.यामध्ये धाडसी आणि महत्वाकांक्षी उद्दिष्टे निर्धारित करण्यात येत आहेत.भारताच्या जनतेनेही या कालखंडात विकसित देश घडवण्याचा संकल्प हाती घेतला आहे. या प्रवासात नैसर्गिक भागीदार म्हणून आम्ही फ्रान्सला पाहू इच्छितो.दोन दिवसात आम्हाला परस्पर सहयोगाच्या सर्व क्षेत्रांवर विस्ताराने चर्चा करण्याची संधी मिळत आहे. आर्थिक संबंध अधिक घनिष्ट करण्याला दोन्ही देशांचे सामायिक प्राधान्य आहे.

नवीकरणीय उर्जा,हरित हायड्रोजन, कृत्रिम  बुद्धीमत्ता, सेमीकंडक्टर, सायबर, डिजिटल तंत्रज्ञान  यासारख्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी आम्ही नव्या उपक्रमांचा शोध घेत आहोत.भारताचे UPI म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस फ्रान्समध्ये सुरु करण्याबाबत करार झाला आहे. दोन्ही देशांचे स्टार्ट अप्स आणि नवोन्मेश परिसंस्था परस्परांशी जोडण्यावर आम्ही भर देत आहोत. समान विचारधारा असणाऱ्या देशांसमवेत एकत्र येत आपल्याला तंत्रज्ञान पुरवठा साखळीच्या लोकशाहीकरणासाठी सातत्याने काम करायला हवे. हवामान बदल आणि पर्यावरण सुरक्षेला आमचे सामायिक आणि मुख्य प्राधान्य राहिले आहे.या दिशेने आम्ही याआधीच आंतरराष्ट्रीय सौर आघाडी स्थापन केली आहे जी आता चळवळ बनली आहे. नील अर्थव्यवस्था आणि महासागर व्यवस्थापन यासाठीच्या आराखड्यावर आम्ही झपाट्याने काम करू इच्छितो. एकल वापराच्या प्लास्टिक विरोधात आम्ही सामायिक उपक्रम घेऊन पुढे वाटचाल करू. इंडियन ऑईल आणि फ्रान्सची टोटाल कंपनी यांच्यात एलएनजी निर्यातीसाठी जो दीर्घकालीन करार झाला आहे त्याचे मी स्वागत करतो. यामुळे आमच्या स्वच्छ उर्जा परिवर्तनाच्या उद्दिष्टासाठी बळ मिळेल. आता थोड्याच वेळात आम्ही भारत – फ्रान्स सीईओ फोरम मध्ये सहभागी होऊ.दोन्ही देशांच्या व्यापार प्रतिनिधींसमवेत आर्थिक  सहयोग दृढ करण्यावर विस्ताराने चर्चा होईल.

मित्रहो,

संरक्षण सहकार्य हा आपल्यामधील संबंधांचा भक्कम  स्तंभ राहिला आहे. दोन्ही देशांमधल्या परस्परांविषयीच्या विश्वासाचे प्रतिक आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानात फ्रान्स महत्वाचा भागीदार आहे.

आज आम्ही संरक्षण क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाने सह-निर्मिती आणि सह -विकास या मुद्यांवर  चर्चा करणार आहोत. पाणबुडी असो किंवा नौदलाचे जहाज, आपण एकत्र येऊन केवळ आपल्याच नव्हे तर तिसऱ्या मित्र देशांच्या गरजाही पूर्ण करण्यासाठी काम करावे अशी आमची इच्छा आहे. आपल्या संरक्षण अंतराळ एजन्सीमध्ये सहयोग वाढवण्याच्या संधी आहेत. फ्रान्सच्या कंपन्यांकडून एमआरओ सुविधा, सुटे भाग, हेलिकॉप्टर साठी इंजिनची निर्मिती भारतात करण्याच्या दिशेने आम्ही आगेकूच करत आहोत. यासंदर्भात आपले सहकार्य अधिक भक्कम करण्यावर आम्ही भर देऊ. नागरी अणु क्षेत्रातले सहकार्य अधिक दृढ करतानाच आम्ही लहान आणि प्रगत रिएकटर्स मधल्या सहकार्याच्या शक्यतांवरही चर्चा करू.  चंद्रयानाच्या यशस्वी प्रक्षेपणाने अवघा भारत उत्साहित आहे. आपल्या वैज्ञानिकांचे हे मोठेच यश आहे. अंतराळ क्षेत्रात भारत आणि फ्रान्स यांचे सहकार्य प्रदीर्घ काळाचे आणि दृढ आहे.आपल्या अंतराळ संस्थांमध्ये नवे करार झाले आहेत. उपग्रह प्रक्षेपण सेवा,समुद्र आणि जमिनीचे तापमान आणि वातावरण यावर देखरेख ठेवणारा तृष्णा उपग्रह  तयार करण्याचाही समावेश आहे. अंतराळ आधारित सागरी क्षेत्रात जागरूकता यासारख्या क्षेत्रातही आपले सहकार्य वाढवण्यासाठी वाव आहे.

मित्रहो,

भारत आणि फ्रान्स मधल्या जनतेमध्ये प्रदीर्घ काळापासून घनिष्ट संबंध आहेत.आमच्यामध्ये झालेल्या आजच्या चर्चेने हे संबंध अधिक दृढ होतील. दक्षिण फ्रान्स मध्ये आम्ही नवा भारतीय दूतावास सुरु करणार आहोत. फ्रान्स मध्ये शिकलेल्या भारतीय मूळ असलेल्या लोकांना दीर्घ कालीन व्हिसा देण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. फ्रान्समधल्या विद्यापीठांना भारतात परिसर निर्माण करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत.दिल्लीत उभारल्या जाणाऱ्या नव्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामात फ्रान्स एक भागीदार  म्हणून सहभागी होत आहे. पुढच्या वर्षी पॅरिस इथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी सर्व भारतीय खेळाडू उत्सुक आहेत. या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि त्यांच्या संपूर्ण चमूला मी शुभेच्छा देतो.

मित्रहो,

आज आम्ही अनेक महत्वपूर्ण प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवरही चर्चा करणार आहोत. हिंद-प्रशांत क्षेत्रात स्थानिक शक्ती म्हणून या भागात शांतता आणि स्थैर्य याची भारत आणि फ्रान्स यांच्यावर विशेष  जबाबदारी आहे. आपल्या सहकार्याला नवा आयाम देण्यासाठी आम्ही हिंद-प्रशांत सहकार्य आराखड्यावर काम करत आहोत.हिंद-प्रशांत त्रिकोणीय विकास सहकार्य निधी बाबतच्या प्रस्तावावरही दोन्ही देशांची चर्चा सुरु आहे. यातून या क्षेत्रात स्टार्टअप्स आणि नवोन्मेशाला प्रोत्साहन देण्याच्या नव्या संधी निर्माण होतील.भारताच्या हिंद-प्रशांत महासागर उपक्रमात सागरी संसाधन स्तंभासाठी पुढाकार घेण्याच्या फ्रान्सच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.

मित्रहो,

कोविड महामारी आणि युक्रेन संघर्षाचा संपूर्ण जगावर परिणाम होत आहे. ग्लोबल साउथ देशांवर याचा मोठा नकारात्मक परिणाम होत असून ही  चिंतेची बाब आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सर्व देशांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.  सर्व विवादांचे निराकरण हे चर्चा आणि राजनैतिक मार्गांच्या माध्यमातून झाले पाहिजे असे आमचे मत आहे. चिरस्वरूपी शांततेसाठी योगदान देण्याकरिता भारत तयार आहे. दहशतवादाविरोधातल्या लढ्यात भारत आणि फ्रान्स सदैव एकत्र राहिले आहेत.सीमापार दहशतवाद नष्ट करण्यासाठी ठोस कारवाईची आवश्यकता आहे. या दिशेने सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही देश सहमत आहेत.  

राष्ट्राध्यक्ष  मॅक्रॉन,  

या वर्षात जी-20 शिखर परिषदेत भारतात आपले स्वागत करण्यासाठी मी आणि सर्व भारतवासी उत्सुक आहोत. आपले मित्रत्व आणि माझ्या  आदरातिथ्याबद्दल पुन्हा एकदा खूप-खूप धन्यवाद.

***

Nikita J/Nilima C/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1945725) Visitor Counter : 112