माहिती आणि प्रसारण मंत्रालय
प्रकाशन विभागातर्फे वर्ष 1957 पासून विकासविषयक सरकारी मासिक ‘योजना’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांपैकी महत्त्वाच्या निवडक लेखांचे संकलन ‘योजना क्लासिक्स’ या नावाने विभागातर्फे प्रकाशित
Posted On:
01 AUG 2023 9:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2023
भारत सरकारची प्रमुख प्रकाशन संस्था असलेल्या प्रकाशन विभागाने ‘योजना क्लासिक्स’ या नावाची पुस्तकांची मालिका प्रकाशित केली आहे. विभागातर्फे दर महिन्याला प्रकाशित केल्या जाणाऱ्या ‘योजना’ या विकासविषयक अंकामध्ये वर्ष 1957 पासून प्रकाशित झालेल्या लेखांपैकी काही विविध संकल्पनांवर आधारित निवडक लेखांचे हे संकलन आहे. योजना मासिकातून वर्षानुवर्षे प्रसिध्द झालेल्या साहित्याचा उत्तम दर्जा आणि प्रचंड विस्तार पाहता, या संकलनासाठी मासिकाच्या सुरुवातीच्या आवृत्त्यांच्या तपकिरी मातकट आणि नाजूक पानांमधून अत्यंत सावधानतेने लेख संकलित करण्यात आले आहेत. हे पुस्तक वाचकांना भारतीय कला, संस्कृती आणि वारसा यांचा समृध्द प्रवास घडवेल. विद्यार्थी, कला आणि संस्कृतीचे रसिक, शिक्षणतज्ञ तसेच शब्दांच्या माध्यमातून कलेचा अविष्कार होतो तेव्हा काय जादू होते याची कल्पना असलेली कोणीही व्यक्ती यांच्याकरता संग्रही ठेवलेच पाहिजे असे हे पुस्तक आहे. हे पुस्तक लवकरच सूचना भवनातील प्रकाशन विभागाच्या पुस्तकदालनात तसेच www.publicationsdivision.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
दिल्लीमध्ये सध्या सुरु असलेल्या पुस्तक जत्रा 2023 मधील प्रकाशन विभागाच्या स्टॉलला, केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी आज दिलेल्या भेटीच्या वेळी त्यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. चंद्रा यांच्यासोबत यावेळी प्रकाशन विभागाच्या महासंचालक अनुपमा भटनागर यांच्यासह विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिवांनी प्रकाशन विभागाच्या स्टॉलची सखोल माहिती घेतली आणि विभागातर्फे या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या पुस्तकांच्या समृध्द संग्रहाचे कौतुक केले. ते म्हणाले की या पुस्तकांतून भारताचा सांस्कृतिक वारसा, कला आणि संस्कृती, वैभवशाली इतिहास आणि राष्ट्रीय नेत्यांच्या उल्लेखनीय योगदानाचे दर्शन घडते.
भारतीय व्यापार प्रोत्साहन संघटना (आयटीपीओ) ने भारतीय प्रकाशन महासंघाच्या (एफआयपी) सहकार्याने 29 जुलै ते 2 ऑगस्ट 2023 या कालावधीत नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर 23 वी दिल्ली पुस्तक जत्रा आयोजित केली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाने या ठिकाणच्या हॉल क्रमांक 11 मधील स्टॉल क्रमांक 12 वर विभागाने प्रकाशित केलेली पुस्तके आणि मासिके प्रदर्शनार्थ ठेवली आहेत.
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
(Release ID: 1944843)
Visitor Counter : 160