पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या हस्ते 29 जुलै रोजी दिल्लीतील भारत मंडपम येथे होणार अखिल भारतीय शिक्षण समागमचे उद्घाटन


राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या तिसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत या दोन दिवसीय समागमाचे आयोजन

'पीएम श्री' योजने अंतर्गत निधीचा पहिला हप्ता पंतप्रधान करणार वितरित

बारा भारतीय भाषांमध्ये अनुवादित शैक्षणिक आणि कौशल्य विषयक पाठ्यपुस्तके पंतप्रधान करणार प्रकाशित

Posted On: 28 JUL 2023 6:45PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 29 जुलै 2023 रोजी सकाळी दहा वाजता दिल्लीतील प्रगती मैदानात भारत मंडपम येथे अखिल भारतीय शिक्षण समागमचे उद्घाटन होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या तिसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत या दोन दिवसीय कार्यक्रमाचे  आयोजन होत आहे.

पीएम श्री योजने अंतर्गत निधीचा पहिला हप्ता पंतप्रधान यावेळी वितरित करतील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) 2020 च्या संकल्पनेनुसार समानता असलेल्या, सर्वसमावेशक आणि बहुवैविध्य समाजाच्या निर्मितीसाठी, सक्रिय, उत्पादक आणि योगदान देणारे नागरिक बनवण्याकरिता या शाळा विद्यार्थ्यांना घडवतील. बारा भारतीय भाषांमध्ये अनुवादित शैक्षणिक आणि कौशल्यविषयक पाठ्यपुस्तकांचे प्रकाशनही पंतप्रधान यावेळी करणार आहेत.

अमृतकाळात देशाचे नेतृत्व करण्यासाठी तरुणांना घडवणे, तयार करणे या उद्देशाने पंतप्रधानांच्या ध्येयदृष्टीने प्रेरित एनईपी 2020 ची सुरुवात करण्यात आली. भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांना तयार करण्याबरोबरच, त्यांच्यात मुलभूत मानवी मूल्यांची रुजवात करणे हे याचे उद्दीष्ट आहे. योजनेच्या तीन वर्षांच्या अंमलबजावणी कालावधीत शाळा, उच्च आणि कौशल्य शिक्षणात आमूलाग्र परिवर्तन घडून आले.

हा कार्यक्रम 29 आणि 30 जुलै असे दोन दिवस आयोजित केला जाणार आहे. शैक्षणिक संस्था, शिक्षणतज्ञ, धोरणकर्ते, उद्योग प्रतिनिधी, शिक्षक आणि शाळा, उच्च शिक्षण आणि कौशल्य संस्थांमधील विद्यार्थी तसेच इतरांना एनईपी 2020 ची अंमलबजावणी करण्यासाठी आणि ते पुढे नेण्याकरिता धोरणे आखण्यासाठी त्यांच्या यशोगाथा, अनुभव, सर्वोत्तम कार्यपद्धती सामायिक करण्यासाठी हा कार्यक्रम एक व्यासपीठ प्रदान करेल.

अखिल भारतीय शिक्षण समागम मध्ये एकूण 16 सत्रे असतील. दर्जेदार शिक्षण आणि प्रशासनापर्यंत पोहच, समान आणि सर्वंकष शिक्षण, सामाजिक-आर्थिक दृष्टीने मागास समुदायांचे प्रश्न, राष्ट्रीय संस्था मानांकन रुपरेषा, भारतीय ज्ञान प्रणाली, शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण यासह विविध संकल्पनांचा यात समावेश आहे.

***

S.Kakade/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1943825) Visitor Counter : 167