संरक्षण मंत्रालय
24 व्या कारगिल विजय दिनानिमित्त, 1999 च्या कारगिल युद्धातील वीरांना राष्ट्राने वाहिली श्रद्धांजली; संरक्षणमंत्र्यांनी द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकात शूर सैनिकांना वाहिली आदरांजली
आजचा भारत आपल्या शूरवीरांनी दीलेल्या बलिदानाच्या पायावर उभा आहे: राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन
गरज पडल्यास केवळ अप्रत्यक्षपणेच नव्हे तर प्रत्यक्षपणेही देशाचे रक्षण करण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार राहण्याचे संरक्षणमंत्र्यांनी जनतेला केले आवाहन
Posted On:
26 JUL 2023 3:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जुलै 2023
1999 च्या कारगिल युद्धातील भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या 24 व्या वर्धापनदिनानिमित्त, राष्ट्राने या युद्धात शहीद झालेल्या शूर सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. दरवर्षी 26 जुलै हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लडाखमधील द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकाला भेट दिली आणि ‘ऑपरेशन विजय’ दरम्यान अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या शूर सैनिकांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
द्रास येथील समारंभात युद्धातील वीर, वीर नारी आणि शहीद झालेल्या वीरांचे कुटुंबीय देखील सहभागी झाले होते. राजनाथ सिंह यांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि राष्ट्रसेवेत सर्वोच्च बलिदान देणाऱ्या त्या सर्व वीरांचे स्मरण करून सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. या शूरवीरांचे बलिदान कधीही विस्मरणात जाणार नाही, अशी ग्वाही राजनाथ सिंह यांनी दिली.
संरक्षण मंत्र्यांनी उपस्थितांना संबोधित करताना, देशाला संकटकाळात ताठ उभे राहण्यास वेळोवेळी मदत करणाऱ्या सशस्त्र दलाच्या शौर्याचे आणि वचनबद्धतेचे कौतुक केले. आजचा भारत सैनिकांनी दिलेल्या बलिदानाच्या पायावर उभा आहे, असे ते म्हणाले. ‘ऑपरेशन विजय’ म्हणजे प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत धैर्य दृढनिश्चय दर्शविण्याच्या भारताच्या स्वभावाचा एक पैलू असल्याचे वर्णन राजनाथ सिंह यांनी केले.
कोणत्याही आव्हानाची पर्वा न करता राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राजनाथ सिंह यांनी सर्वांना दिली.
राजनाथ सिंह यांनी कारगिल युद्धातील अनेक शूरवीरांच्या शौर्याचे स्मरण केले. यामध्ये ज्यात परमवीर चक्र (PVC) पुरस्कार विजेते कॅप्टन विक्रम बत्रा आणि कॅप्टन मनोज पांडे; वीर चक्र (VrC) पुरस्कार विजेते लेफ्टनंट कर्नल आर विश्वनाथन, कॅप्टन जिंतू गोगोई, कॅप्टन विजयांत थापर आणि नायब सुभेदार मंगेज सिंह यांचा समावेश होता.
हे वीर भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरतील आणि कायम स्मरणात राहतील, असेही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
देशाच्या सीमांचे रक्षण करत असताना सैन्यदलातील भारतीय महिला या सैन्यदलातील पुरुषांपेक्षा जराही मागे नाहीत हा संदेश देणाऱ्या,अतुलनीय धैर्य दर्शविणाऱ्या फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना आणि श्रीविद्या राजन यांचा विशेष उल्लेख संरक्षण मंत्र्यांनी आपल्या भाषणात केला.
आवश्यकता भासल्यास, सर्व नागरीकांनी केवळ अप्रत्यक्षपणे नाही तर प्रत्यक्षपणे देखील युद्धात सहभागी होण्यासाठी तयार रहावे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले. "नागरिकांनी मानसिकरीत्या तयार राहिले पाहिजे, म्हणजे राष्ट्राला गरज लागेल, तेव्हा ते सैन्यदलाला सहाय्य करु शकतील. सैन्य दलांतील जवानांप्रमाणे प्रत्येक भारतीयाने जवानाची भूमिका बजावायला तयारीत असायला हवे,” असेही ते यावेळी म्हणाले.
लडाखचे निवृत्त नायब राज्यपाल (डॉ.) बी.डी.मिश्रा, सैन्यदल कर्मचारी प्रमुख जनरल अनिल चौहान, सैन्यदल प्रमुख जनरल मनोज पांडे, नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार, वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर चौधरी हे या समारंभाला उपस्थित होते.
साहस आणि निष्ठा यांचे सर्वोत्तम उदाहरण असलेले परमवीर चक्र विजेता,सुभेदार मेजर संजय कुमार आणि महावीर चक्र विजेता हवालदार दिगेंद्र कुमार यांनी या समारंभाला उपस्थित राहून त्याची शान वाढवली.परमवीर चक्र विजेता कॅप्टन मनोज कुमार पांडे यांचे बंधू मनमोहन पांडे,परमवीर चक्र विजेता कॅप्टन विक्रम बात्रा यांचे बंधू विशाल बात्रा यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती होती.
राष्ट्राने एकत्र येऊन वीरांचे स्मरण करणे,हे भारताच्या सांघिक भावनेचे प्रकटीकरण करते असून; द्रास येथील या समारंभाने एकता,कृतज्ञता आणि अभिमान या भावनांना अधोरेखित केले आहे.
दिल्ली येथील कार्यक्रमात संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, संरक्षण सचिव गिरीधर अरमाने, तीनही सैन्यदलांच्या प्रमुखांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे पुष्प चक्र वाहून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
* * *
JPS/SRT/Shraddha/Sampada/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1942825)
Visitor Counter : 161