पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 26 जुलै रोजी प्रगती मैदान येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषद केंद्र (IECC) संकुल राष्ट्राला समर्पित करणार
123 एकर भूखंडावर सुमारे 2700 कोटी रुपये खर्चून हे विस्तीर्ण संकुल बांधण्यात आले आहे
हे भारतातील सर्वात मोठे बैठक, प्रोत्साहन, परिषद आणि प्रदर्शन स्थळ((MICE) आहे आणि जगभरातील अव्वल प्रदर्शन आणि परिषद संकुलांमधील एक आहे.
नवीन परिषद केंद्रात प्रदर्शन सभागृह , अॅम्फी थिएटर्स सह अनेक अत्याधुनिक सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत.
वास्तुशास्त्राचा चमत्कार असलेले हे परिषद केंद्र आंतरराष्ट्रीय प्रदर्शने आणि परिषदांचे भव्य आयोजन करेल
हे केंद्र शंखाच्या आकारात विकसित करण्यात आले असून त्यात भारताच्या पारंपारिक कला आणि संस्कृतीच्या अनेक वास्तुशास्त्रीय घटकांचा समावेश आहे
हे नवनिर्मित संकुल भारताला जागतिक व्यापार केंद्र म्हणून चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल
Posted On:
24 JUL 2023 9:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जुलै 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 जुलै 2023 रोजी प्रगती मैदान येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषद केंद्र संकुल राष्ट्राला समर्पित करणार आहेत.
देशात बैठका, परिषद आणि प्रदर्शने आयोजित करण्यासाठी जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेतून प्रगती मैदानावर आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषद केंद्र साकारण्यात आले आहे.
प्रगती मैदानावरील जुन्या आणि कालबाह्य सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणणारा हा प्रकल्प सुमारे 2700 कोटी रुपये खर्चून राष्ट्रीय प्रकल्प म्हणून विकसित करण्यात आला आहे.
सुमारे 123 एकर परिसर असलेले हे संकुल भारतातील सर्वात मोठे बैठक, प्रोत्साहन, परिषद आणि प्रदर्शन स्थळ((MICE) म्हणून विकसित केले आहे. कार्यक्रमांसाठी उपलब्ध असलेल्या जागेच्या बाबतीत, जगभरातील अव्वल प्रदर्शन आणि परिषद संकुलांमधील हे एक संकुल आहे. प्रगती मैदानावर बांधण्यात आलेल्या या नवीन परिषद केंद्रात प्रदर्शन सभागृह, अॅम्फी थिएटर्स सह अनेक अत्याधुनिक सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत.
प्रगती मैदान संकुलातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून हे परिषद केंद्र विकसित केले आहे. वास्तुशास्त्राचा चमत्कार असलेल्या या परिषद केंद्राची रचना आंतरराष्ट्रीय प्रदर्शने, व्यापार मेळावे, संमेलन, परिषदा आणि इतर प्रतिष्ठित कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्याच्या दृष्टीने केली आहे. हे अनेक बैठक कक्ष, विश्रामगृह, सभागृह, अॅम्फीथिएटर आणि व्यापार केंद्राने सुसज्ज असल्यामुळे विविध कार्यक्रमांचे आयोजन करता येऊ शकणार आहे. इथले भव्य बहुउद्देशीय सभागृह आणि प्लेनरी हॉलची एकत्रित क्षमता सात हजार लोक इतकी असून ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध सिडनी ऑपेरा हाऊसच्या आसन क्षमतेपेक्षा अधिक आहे. येथील भव्य अॅम्फी थिएटरची आसन क्षमता 3,000 व्यक्ती बसू शकतील इतकी आहे.
या परिषद केंद्राच्या इमारतीची वास्तुशिल्प रचना भारतीय परंपरांनी प्रेरित आहे आणि आधुनिक सुविधा आणि जीवनशैलीचा अवलंब करताना भारताचा भूतकाळातील आत्मविश्वास आणि श्रद्धा यातून दिसून येते. इमारतीचा आकार शंखा सारखा असून परिषद केंद्राच्या विविध भिंती आणि दर्शनी भाग सौरऊर्जेचा वापर करण्याचे भारताचे प्रयत्न अधोरेखित करणारी ‘सूर्य शक्ती’, अंतराळातील आपले यश साजरे करणारे ‘झिरो टू इस्रो’, सार्वत्रिक पाया अधोरेखित करणारी आकाश ,वायु, अग्नि, जल , पृथ्वी ही पंचमहाभूते भारताच्या पारंपारिक कला आणि संस्कृतीचे अनेक घटक दर्शवतात . तसेच, देशाच्या विविध प्रांतातील अनेक चित्रे आणि आदिवासी कला प्रकार या परिषद केंद्राची शोभा द्विगुणित करतात.
परिषद केंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या इतर सुविधांमध्ये संपूर्ण परिसरात 5G सक्षम वाय-फाय सुविधेची उपलब्धता, 10G इंट्रानेट कनेक्टिव्हिटी, 16 वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवाद सेवा पुरवणारी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी इंटरप्रिटर रूम, मोठ्या आकाराच्या व्हिडिओ स्क्रीनसह प्रगत दृकश्राव्य प्रणाली, इष्टतम कार्यक्षमता आणि ऊर्जा कार्यक्षमता सुनिश्चित करणारी इमारत व्यवस्थापन प्रणाली, डिमिंग आणि ऑक्युपन्सी सेन्सर्ससह प्रकाश व्यवस्थापन प्रणाली, स्टेट ऑफ द आर्ट डीसीएन (डेटा कम्युनिकेशन नेटवर्क) प्रणाली, एकात्मिक देखरेख प्रणाली आणि ऊर्जा-कार्यक्षम केंद्रीकृत वातानुकूलन प्रणाली यांचाही सामावेश आहे.
याशिवाय, या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषद केंद्र (IECC) परिसरात एकूण सात प्रदर्शन हॉल आहेत. हा प्रत्येक हॉल प्रदर्शन, व्यापार मेळे आणि व्यवसायिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी एक बहुउद्देशीय स्थान म्हणून वापरला जाऊ शकतो. विविध प्रकारच्या उद्योगांना सामावून घेत, जगभरातील उत्पादने आणि सेवांचे प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने या प्रदर्शन हॉलची रचना करण्यात आली आहे. ही अत्याधुनिक वास्तू आधुनिक अभियांत्रिकी आणि वास्तुशास्त्रीय शाखेच्या विलक्षण कौशल्याचा भक्कम पुरावा आहे.
आयईसीसीच्या बाहेरील क्षेत्राचा विकास देखील विचारपूर्वक केला गेला आहे. हा परिसर मुख्य इमारतीच्या सौंदर्यात भर घालणारा असून या प्रकल्पाचा विकास आणि नियोजन अत्यंत काळजीपूर्वक केल्याचा दाखला देणारा आहे. येथील शिल्पे, प्रतिष्ठापने आणि भित्तिचित्रे भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा दर्शवतात. येथील संगीताच्या तालावर उडणारे कारंजे पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करणारे आणि नेत्रसुखद आहेत. येथील तलाव, सरोवर आणि कृत्रिम प्रवाह यांसारखे जलस्रोत परिसराची शांतता आणि सौंदर्य वाढवणारे आहेत.
या परिसरात 5,500 पेक्षा जास्त क्षमतेच्या वाहनतळाच्या तरतुदीतून अभ्यागतांची सोय हीच आयईसीसी ची प्राथमिकता असल्याचे दिसून येते. सिग्नल मुक्त रस्त्यांद्वारे प्रवासाच्या सुलभतेमुळे अभ्यागत कोणत्याही त्रासाशिवाय कार्यक्रमस्थळी पोहोचू शकतात हे सुनिश्चित होते. तसेच, आयईसीसी च्या एकंदरीत रचनेत अभ्यागतांची अखंड ये - जा सुलभ करून उपस्थितांच्या सोई आणि सुविधांना प्राधान्य दिल्याचे स्पष्ट होते.
प्रगती मैदानावर नवीन आयईसीसी परिसराच्या विकासामुळे भारताला जागतिक व्यावसायिक गंतव्यस्थान म्हणून प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल. व्यापार आणि व्यवसायाला चालना देण्यात देखील हा परिसर महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. यामुळे आर्थिक वाढीबरोबरच रोजगार निर्मितीही होईल. हा परिसर लघु आणि मध्यम उद्योगांना त्यांची उत्पादने आणि सेवा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करून त्यांच्या वाढीस हातभार लावेल. हे केंद्र ज्ञानाची देवाणघेवाण सुलभ करेल आणि सर्वोत्तम पद्धती, तांत्रिक प्रगती आणि उद्योग पद्धतींच्या प्रसारास प्रोत्साहन देईल. प्रगती मैदानावरील आयईसीसी म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या भावनेने भारताच्या आर्थिक आणि तांत्रिक उत्कृष्टतेच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे आणि नवीन भारत घडवण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे.
* * *
S.Patil/Sushma/Shraddha/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1942266)
Visitor Counter : 186
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam