पंतप्रधान कार्यालय

विविध शासकीय विभाग आणि संस्थांमध्ये रोजगार मेळ्यात नवनियुक्त 70000 उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरीत करण्याच्या कार्यक्रमात दृक्श्राव्य पद्धतीने पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 22 JUL 2023 2:07PM by PIB Mumbai

 

नमस्कार,

आज ज्या तरुण सहकाऱ्यांना नियुक्तीपत्रे मिळत आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हा संस्मरणीय दिवस आहे, मात्र त्या सोबतच, देशसाठी देखिल हा ऐकिहासिक दिवस आहे. आजच्याच दिवशी, 1947 मध्ये, म्हणजे 22 जुलैला संविधानाने आज जसा आहे, त्या स्वरुपात तिरंग्याचा स्वीकार केला होता. या महत्वाच्या दिवशी आपणा सर्वांना सरकारी नोकरीचे नियुक्तीपत्र मिळणे, हे खरं म्हणजे खूप प्रेरणादायी आहे. सरकारी सेवेत तुम्हाला नेहमी तिरंग्याचा मान आणि शान वाढविण्यासाठी काम करायचे आहे, देशाचे नाव उज्ज्वल करायचे आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी काळात, जेव्हा देश विकसित होण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे, तुमचं सरकारी नोकरीत येणं, ही एक फार मोठी संधी आहे. आपल्या परिश्रमांचे हे फलित आहे. नियुक्तीपत्र मिळविणाऱ्या सर्व युवकांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे मी खूप खूप अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. 

 

मित्रांनो,

स्वातंत्र्याच्या या अमृत काळात सर्व देशवासीयांनी येणाऱ्या 25 वर्षांत भारत विकसित करण्याचा संकल्प सोडला आहे. तुम्हा सर्वांसोबतच भारतासाठी ही येणारी 25 वर्षे, म्हणजे तुमच्या आयुष्यातील येणारी 25 वर्षे तुमच्यासाठी जशी महत्वाची आहेत, तशीच भारतासाठी येणारी 25 वर्षे अतिशय महत्वपूर्ण आहेत. आज जगभरात भारताविषयी जो विश्वास निर्माण झाला आहे, भारताविषयी जे आकर्षण निर्माण होत आहे. आज भारताचे महत्व तयार होत आहे, आपण सर्वांनी मिळून याचा फायदा घेतला पाहिजे. तुम्ही बघितलं आहे, की केवळ 9 वर्षांत भारताची अर्थव्यवस्था जगातील 10 व्या क्रमांकावरून 5 व्या क्रमांकावर आली आहे. आज प्रत्येक तज्ञ हे म्हणत आहे, की काही वर्षांतच भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल, पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये पोचणे हे भारतासाठी असामान्य क्षमता देणारं आहे. प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यासाठी याहून मोठी कुठलीच संधी असू शकत नाही, याहून महत्वाचा कुठलाच काळ असू शकत नाही. तुमचे निर्णय, देशहिताचे आणि देशाच्या विकासाला गती देणारे तर असतीलच, याची मला खात्री आहे, मात्र ही संधी, हे आव्हान, सर्वकाही तुमच्या समोर आहे. तुम्हाला या अमृत काळात देशसेवा करण्याची फार मोठी, खरोखरच अभूतपूर्व संधी मिळाली आहे. देशाच्या नागरिकांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांच्या आयुष्यातील अडचणी संपाव्यात, ही तुमची प्राथमिकता असायला हवी. कुठल्याही विभागात, ज्या शहरात किंवा गावात तुमची नियुक्ती होईल, एक गोष्ट कायम मनात असू द्या की तुमच्या कामामुळे सर्वसामान्य जनतेच्या अडचणी कमी व्हायला हव्यात, संकटं दूर झाली पाहिजेत, जगण्याची सुलभता वाढेल आणि सोबतच 25 वर्षांत विकसित भारत उभा करण्याच्या ध्येयाशी तुमची भूमिका सुसंगत असेल. अनेकदा, तुमचा एक लहानसा प्रयत्न, कुणाची तरी फार मोलाची मदत करू शकतो, कुणाचं अडकलेलं काम करू शकतो. आणि तुम्ही माझं म्हणणं नक्की लक्षात ठेवा. जनता जनार्दन ईश्वराचं रूप असते. म्हणून तुम्ही दुसऱ्यांची मदत करण्याच्या भावनेने, दुसऱ्यांची सेवा करण्याच्या भावनेने काम कराल, तर आपले यश देखील वाढेल आणि आयुष्यातली जी सर्वात मोठी मिळकत असते, समाधान, ते समाधान तिथूनच मिळणार आहे.

 

मित्रांनो,

आजच्या या कार्यक्रमात बँकिंग क्षेत्रात अनेक तरुणांना नियुक्तीपत्र मिळत आहेत. अर्थव्यवस्थेचा विस्तार होण्यात बँकिंग क्षेत्राची फार मोठी भूमिका असते. आज भारत त्या देशांपैकी एक आहे, जिथले बँकिंग क्षेत्र सर्वात मजबूत समजले जाते. मात्र 9 वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. जेव्हा सत्ता स्वार्थ राष्ट्रहिताच्या आड येतो, तेव्हा कशी वाताहत होते, कसा विनाश होतो, देशात अनेक उदाहरणं आहेत, हे आपल्या बँकिंग क्षेत्राने तर मागच्या सरकारांच्या काळात ही वाताहत बघितली आहे, सहन केली आहे, भोगली आहे. तुम्ही लोक तर आजकालच्या  डिजिटल युगातले लोक आहात, मोबाईल फोनवरून बँकिंग सेवांचा लाभ घेत आहात, मात्र आजपासून 9 वर्षांपूर्वी जी सरकारे होती, त्या काळात ना ही फोन बँकिंगची कल्पनाच वेगळी होती, प्रथाच वेगळ्या होत्या, पद्धती वेगळ्या होत्या, उद्देश वेगळे होते. त्या काळात त्या सरकारमध्ये हे फोन बँकिंग माझ्या, तुमच्या सारख्या सामान्य नागरिकांसाठी नव्हते, देशाच्या 140 कोटी नागरिकांसाठी नव्हते. त्या काळात एका विशिष्ट कुटुंबाच्या जवळचे काही शक्तीशाली नेते, बँकांना फोन करून आपल्या मित्रांना कोट्यावधी रुपयांचे कर्ज मिळवून देत होते. या कर्जाची कधीच परतफेड केली जात नसे आणि केवळ कागदी घोडे नाचवले जात. एक कर्ज फेडण्यासाठी पुन्हा बँकांना फोन करून दुसरे कर्ज, दुसरे कर्ज फेडण्यासाठी, पुन्हा तिसरे कर्ज मिळवून देणे. हा फोन बँकिंग घोटाळा, पूर्वीच्या सरकारच्या, मागच्या सरकारच्या सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक होता. पूर्वीच्या सरकारच्या या घोटाळ्यांमुळे देशाच्या बँकिंग व्यवस्थेचं कंबरडं मोडलं होतं. तुम्ही सर्वांनी 2014 मध्ये आम्हाला सरकार स्थापन करून देशसेवा करण्याची संधी दिलीत. 2014 मध्ये आमचं सरकार आल्यावर आम्ही बँकिंग क्षेत्राला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी एकामागे एक पावले उचलून काम सुरु केले. आम्ही सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचे व्यवस्थापन सशक्त केले, व्यावसायिकतेवर भर दिला. आम्ही देशातल्या लहान लहान बँका एकत्र करून मोठ्या बँक तयार केल्या. आम्ही हे सुनिश्चित केले की बँकेत सर्वसामान्य नागरिकांची 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम कधीच बुडणार नाही. कारण बँकांवर असलेला सर्वसामान्य लोकांचा विश्वास दृढ करणे अतिशय गरजेचे झाले होते. कारण अनेक सहकारी बँका बुडायला लागल्या होत्या. सर्वसामान्य लोकांचे कष्टाचे पैसे बुडत होते आणि म्हणून आम्ही 1 लाखाहून ती सीमा 5 लाख केली, जेणेकरून 99% नागरिकांना त्यांचा कष्टाचा पैसा परत मिळू शकेल. सरकारने आणखी एक महत्वाचे पाउल उचलले. नादारी आणि दिवाळखोरी संहिता या सारखे कायदे बनविले, जेणेकरून एखादी कंपनी कुठल्याही कारणाने बंद झाली तर बँकांचे कमीत कमी नुकसान व्हावे. या सोबतच आम्ही चुकीचे काम करणाऱ्यांवर फास देखील आवळला, बँकांची लुबाडणूक करणाऱ्यांची संपत्ती जप्त केली. त्याचा परिणाम आज आपल्यासमोर आहे. ज्या सरकारी बँकांची चर्चा हजारो कोटीच्या नुकसानाच्या संदर्भात होत असे, बुडीत मालमत्ता यासाठी होत होती, आज त्याच बँकांची चर्चा विक्रमी नफ्यासाठी होत आहे.

 

मित्रांनो,

भारताची मजबूत बँकिंग व्यवस्था आणि बँकेचा प्रत्येक कर्मचारी, यांनी गेल्या 9 वर्षांत सरकारच्या दृष्टीकोनाशी सुसंगत काम केले आहे, त्या सर्वांचा आपल्याला अभिमान आहे. बँकेत काम करणाऱ्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनी इतकी मेहनत घेतली, इतकी मेहनत घेतली, की बँका संकटातून बाहेर काढल्या, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासात अग्रेसर होऊन भूमिका निभावली आणि या बँक कर्मचाऱ्यांनी, बँकेच्या लोकांनी मला आणि माझा दृष्टीकोन नाकारला नाही आणि निराश केले नाही. मला आठवतं, जेव्हा जनधन योजना सुरु करण्यात आली, तेव्हा जुनाट विचारांचे जे लोक होते, ते मला प्रश्न विचारत होते, गरिबांकडे तर पैसे नाहीत, ते बँकेत खातं उघडून काय करतील? बँकांवरचा भार वाढेल, बँक कर्मचारी काम कसं करतील? अनेक प्रकरे निराशा पसरविण्यात आली होती. मात्र बँकेतल्या माझ्या सहकाऱ्यांनी गरिबांचे जनधन खाते उघडले जावे यासाठी दिवस रात्र मेहनत करत होते, झोपडपट्टीत जात होते, बँकेचे कर्मचारी, लोकांची खाती उघडत होते. जर आज देशात जवळपास 50 कोटी जनधन बँक खाती उघडली गेली आहेत, तर त्याह्च्यामागे बँकेत कामकरणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांचे परिश्रम आहेत, त्यांचे समर्पण आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळेच सरकार, कोरोना काळात कोट्यवधी महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करू शकले.

 

मित्रांनो,

असंघटित क्षेत्रातील लोकांना मदत करण्यासाठी आपल्या बँकिंग क्षेत्रात कोणतीही व्यवस्था नाही असा चुकीचा आरोप काही लोकांनी आधी केला आणि आत्ताही करत आहेत. आधीच्या सरकारांमध्ये काय झाले हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे. पण 2014 नंतरची परिस्थिती तशी नाही. सरकारने मुद्रा योजनेतून युवकांना हमीशिवाय कर्ज देण्याचा निर्णय घेतल्यानंतर बँकेतील कर्मचाऱ्यांनीच या योजनेच्या अंमलबजावणीत पुढाकार घेतला आहे.

सरकारने महिला बचत गटांसाठी कर्जाची रक्कम दुप्पट केली तेव्हा बँक कर्मचाऱ्यांनीच अधिकाधिक बचत गटांना आर्थिक मदत केली. कोविड काळात जेव्हा सरकारने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग (एमएसएमई) क्षेत्राला मदत करण्याचा निर्णय घेतला तेव्हा बँक कर्मचाऱ्यांनीच जास्तीत जास्त कर्जे देऊन एमएसएमई क्षेत्राला वाचवण्यास साहाय्य केले आणि बेरोजगार होण्याची शक्यता असलेल्या 1.5 कोटींहून अधिक उद्योजकांच्या लघुउद्योगांना वाचवून 1.5 कोटींहून अधिक लोकांचा रोजगारही वाचवला.

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे पाठवण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली तेव्हा बँकर्सनीच तंत्रज्ञानाच्या मदतीने ही योजना यशस्वी करण्यात कोणतीही कसर ठेवली नाही.

पदपथावर बसून माल विकणारे लहान फेरीवाले आणि हातगाडीवाल्यांसाठी शासनाने स्वाभिमानी योजना सुरू केली. तेव्हा या गरीब बंधू भगिनींसाठी बॅंक कर्मचाऱ्यांनीच मेहनत घेतली. काही बँकेच्या शाखांनी तर या लोकांना शोधून काढून, त्यांना बोलावून त्यांना कर्ज मिळवून दिले आहे.  आज बँक कर्मचार्‍यांच्या मेहनतीमुळे 50 लाखांहून अधिक रस्त्यावरील विक्रेत्यांना बँकेकडून मदत मिळू शकली आहे.

मी त्यासाठी प्रत्येक बँक कर्मचाऱ्याचे कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. आता तुम्ही बँकिंग क्षेत्रात सामील होत असल्यामुळे एक नवीन ऊर्जा, एक नवीन विश्वास, समाजासाठी काहीतरी करण्याची नवीन भावना निर्माण होईल. जुने लोक करत असलेल्या कष्टात तुमच्या मेहनतीची भर पडेल. आणि बँकिंग क्षेत्राच्या माध्यमातून आम्हाला गरीबातील गरीबाला मजबूत करायचे आहे यावर माझा ठाम विश्वास आहे. त्यात आज नियुक्ती पत्रासोबत तुम्ही लोक संकल्प पत्र घेऊन जाल.

 

मित्रांनो,

जेव्हा योग्य हेतूने निर्णय घेतले जातात, योग्य धोरण आखले जाते, तेव्हा त्याची फलनिष्पत्तीही आश्चर्यकारक, अभूतपूर्व असते. याचा पुरावा देशाला काही दिवसांपूर्वीच मिळाला आहे. अवघ्या 5 वर्षांत भारतातील 13.5 कोटी भारतीय दारिद्र्यरेषेच्या वर आले आहेत, असे नीती आयोगाने अहवालात म्हटले आहे.  भारताच्या या यशात सरकारी कर्मचाऱ्यांची मेहनतही आहे.

गरिबांना पक्की घरे देण्याची योजना असो, गरिबांसाठी शौचालये बांधण्याची योजना असो, गरिबांना वीज जोडणी देण्याची योजना असो, आमच्या सरकारी कर्मचाऱ्यांनी अशा अनेक योजना सर्वसामान्यांपर्यंत गावोगाव, घरोघरी पोहोचवल्या आहेत. जेव्हा या योजना गरिबांपर्यंत पोहोचल्या तेव्हा गरिबांचे मनोबलही खूप वाढले, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला.

भारतातील गरिबी दूर करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर भारतातून गरिबीचे समूळ उच्चाटन होऊ शकते या वस्तुस्थितीचे हे यश म्हणजे एक द्योतक आहे. यात देशातील प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याचा नक्कीच मोठा वाटा आहे. गरिबांच्या कल्याणासाठी ज्या काही योजना आहेत, त्याविषयी तुम्ही स्वतः जागरूक राहिले पाहिजे आणि जनतेला त्या योजनांशी जोडले पाहिजे.

 

मित्रांनो,

भारतातील कमी होत असलेल्या गरिबीचा आणखीही एक आयाम आहे. देशात गरिबांची संख्या कमी होत असतानाच नव-मध्यम वर्गाचा सतत विस्तार होत आहे. त्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. भारतातील वाढत्या नव-मध्यमवर्गाच्या स्वतःच्या मागण्या आहेत, स्वतःच्या आकांक्षा आहेत. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आज देशात मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जात आहे. आपले कारखाने आणि आपले उद्योग विक्रमी उत्पादन घेतात त्याचा युवकांना सर्वाधिक फायदा होतो.

आजकाल तुम्ही पहात आहात की, दररोज एका नवीन विक्रमाची चर्चा आहे, नवीन कामगिरीची चर्चा आहे. भारतातून मोबाईल फोनची विक्रमी निर्यात होत आहे. या वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांत भारतात विकल्या गेलेल्या कारचा आकडाही उत्साहवर्धक आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनांचीही विक्रमी विक्री होत आहे. या सगळ्यामुळे देशात रोजगार वाढत आहे, रोजगाराच्या संधी वाढत आहेत.

 

मित्रांनो,

आज संपूर्ण जगाची नजर भारताच्या प्रतिभेकडे आहे. जगातील अनेक विकसित अर्थव्यवस्थांमध्ये, लोकांचे वय झपाट्याने वाढत आहे, जगातील अनेक देश मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांनी भरलेले आहेत, तिथली तरुण पिढी कमी होत आहे, सक्रिय लोकसंख्या कमी होत आहे. त्यामुळे भारतातील तरुणांनी कठोर परिश्रम करण्याची, त्यांची कौशल्ये आणि क्षमता वाढवण्याची हीच वेळ आहे.

भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुणवत्ता तसेच डॉक्टर, परिचारिका आणि आखाती देशांमध्ये बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्यांना किती मागणी आहे हे आपण पाहिले आहे. प्रत्येक देशात, प्रत्येक क्षेत्रात भारतीय प्रतिभेचा आदर सतत वाढत आहे. त्यामुळेच गेल्या 9 वर्षांत सरकारचा भर कौशल्य विकासावर आहे. पीएम कौशल विकास योजनेंतर्गत सुमारे 1.5 कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आपल्या तरुणांना जागतिक संधींसाठी तयार करता यावे यासाठी सरकार ३० स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर्सची स्थापना करत आहे.

आज देशभरात नवीन वैद्यकीय महाविद्यालये, नवीन आयटीआय, नवीन आयआयटी, तांत्रिक संस्था उभारण्याची मोहीम जोरात सुरू आहे. 2014 पर्यंत आपल्या देशात केवळ 380 वैद्यकीय महाविद्यालये होती. गेल्या 9 वर्षांत ही संख्या 700 हून अधिक झाली आहे. त्याचप्रमाणे नर्सिंग कॉलेजच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. जागतिक मागणी पूर्ण करणारी कौशल्ये भारतातील तरुणांसाठी लाखो नवीन संधी निर्माण करणार आहेत.

 

मित्रांनो,

तुम्ही सर्वजण अतिशय सकारात्मक वातावरणात शासकीय सेवेत रूजू होत आहात. देशाचा हा सकारात्मक विचार पुढे नेण्याची जबाबदारी आता तुमच्यावर आहे. तुम्ही सर्वांनी तुमच्या आकांक्षा वाढवण्याचा प्रयत्न करावा. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारल्यानंतरही शिकण्याची आणि आत्म-विकासाची प्रक्रिया सुरू ठेवा. तुम्हाला मदत करण्यासाठी सरकारने कर्मयोगी हे शिक्षणासाठीचे ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध केले आहे.

आपण सर्वांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा, या नवीन जबाबदारीसाठी मी तुमचे आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे अभिनंदन करतो. ही नवीन जबाबदारी हा एक सुरुवातीचा बिंदू आहे, तुम्हीही आयुष्यात नव्या उंचीवर पोहोचू शकता.

जिथे जिथे सेवा करायची संधी मिळेल तिथे देशातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी तुमच्यामुळे नवीन बळ मिळू शकेल. तुम्ही तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करा, तुमचा संकल्प तडीस न्या, जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडा. यासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद.

***

M.Iyengar/R.Aghor/P.Jambhekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1941894) Visitor Counter : 178