शिक्षण मंत्रालय
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची ऑस्ट्रेलियाचे कौशल्य आणि प्रशिक्षण मंत्री ब्रेंडन ओ कॉनर यांनी घेतली भेट
भारत-ऑस्ट्रेलिया संबंध ऐतिहासिक उंचीवर असून ते अधिक दृढ करण्याचे केले आवाहन
कृषी, धातू, खनिकर्म, नूतन आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रात शिक्षण आणि कौशल्य सहकार्याची व्याप्ती वाढवण्यावर देण्यात आला विशेष भर
Posted On:
20 JUL 2023 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जुलै 2023
ऑस्ट्रेलियाचे कौशल्य आणि प्रशिक्षण मंत्री ब्रेंडन ओ कॉनर यांनी आज नवी दिल्ली इथे केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली. भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रात सध्या सुरु असलेले सहकार्य आणि दोन्ही देशांमधील दृढ संबंध आणखी वृद्धिंगत कसे करता येतील यावर दोन्ही नेत्यांनी यावेळी चर्चा केली.

ऑस्ट्रेलियाने खनिज संपत्तीसारख्या नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन करण्यामध्ये आणि आपल्या नागरिकांची क्षमता विकसित करण्यामध्ये केलेल्या कामगिरीची प्रशंसा करून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, भारतामध्ये अशा प्रकारची प्रक्रिया राबवण्याचा आणि इथल्या तरुणांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याचा मार्ग शोधण्याचा एकत्रित प्रयत्न दोन्ही देशांनी करायला हवा. कृषी तंत्रज्ञान, खनिकर्म, जलव्यवस्थापन, अक्षय ऊर्जा आणि कृत्रिम बुद्धीमत्ता आणि रोबोटिक्स सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यानचे संबंध ऐतिहासिक उंचीवर असताना हा क्षण मोलाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. या वर्षाच्या सुरुवातीला दोन्ही देशांमध्ये शैक्षणिक पात्रतेला परस्पर मान्यता देण्याच्या करारावर स्वाक्षरी झाल्याचे नमूद करून, या कराराची अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी केले, जेणेकरून दोन्ही देशांदरम्यान विद्यार्थी आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचा प्रवेश सुलभ होईल.

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ऑस्ट्रेलियाचे मंत्री ओ कॉनर यांना या वर्षी सप्टेंबरमध्ये गांधीनगर येथे आयोजित ऑस्ट्रेलिया-भारत शिक्षण आणि कौशल्य परिषदेच्या सातव्या बैठकीसाठी निमंत्रित केले. या बैठकीमुळे दोन्ही देशांदरम्यान शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रातील सहकार्याला आणखी गती देण्याची संधी मिळेल.
दोन्ही देशांमधील सहकार्य आणखी दृढ व्हायला हवे, अशी अपेक्षा ओ कॉनर यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांचा सुलभ प्रवेश सुनिश्चित करण्याला आपला देश प्राधान्य देत असून, त्यांची व्हिसा प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले.
* * *
R.Aghor/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1941069)