सहकार मंत्रालय

खेड्यापाड्यात आणि दुर्गम भागातील सहारा समूहाच्या ठेवीदारांसाठी सीआरसीएस- सहारा रिफंड पोर्टलवर दावे दाखल करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याकरता केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी घेतला महत्वपूर्ण निर्णय

Posted On: 19 JUL 2023 4:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 जुलै 2023

 

खेड्यापाड्यात आणि दुर्गम भागात राहणाऱ्यांसाठी सहारा रिफंड पोर्टल, म्हणजेच सहकारी संस्था केंद्रीय निबंधक- सहारा परतावा पोर्टलवर दावे दाखल करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सहारा समूहाच्या सहकारी संस्थांच्या वैध ठेवीदारांना परतावा मिळवण्याच्या प्रक्रियेत, CRCS- सहारा रिफंड पोर्टलवर त्यांचे दावे दाखल करण्यामध्ये कॉमन सर्व्हिस सेंटर्स (CSCs), अर्थात सामान्य सेवा केंद्र सहाय्य करतील. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी 18 जुलै 2023 रोजी नवी दिल्ली येथे  https://mocrefund.crcs.gov.in  या सहकारी संस्था  केंद्रीय निबंधक (CRCS)-सहारा रिफंड पोर्टलचा शुभारंभ केला.

देशभरातील 5.5 लाखांहून अधिक सामान्य सेवा केंद्रे इंटरनेट जोडणी, संगणक, प्रिंटर आणि स्कॅनर इत्यादी आवश्यक सुविधांनी सुसज्ज असलेल्या 300 पेक्षा जास्त ई-सेवा पुरवत आहेत. वैध ठेवीदार CRCS- सहारा रिफंड पोर्टलवर दावे दाखल करण्यासाठी आपल्या जवळच्या सामान्य सेवा केंद्राची मदत देखील घेऊ शकतील.

सहाराच्या वैध ठेवीदारांना गाव पातळीवरील उद्योजकांनी (VLEs) सहाय्य करावे अशी विनंती सामान्य सेवा केंद्रांनी (CSC-SPV) केली आहे, आणि लोकांना सामान्य सेवा केंद्रांच्या माध्यमातून आपले दावे दाखल करता यावेत, या दृष्टीने आपली प्रणाली सक्षम केली आहे.

सहारा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सहारायन युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड, हमारा इंडिया क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि स्टार्स मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या सहारा समूहाच्या सहकारी संस्थांच्या वैध ठेवीदारांना दावे दाखल करता यावेत, यासाठी CRCS- सहारा रिफंड पोर्टल, विकसित करण्यात आले आहे.

 

* * *

S.Patil/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1940735) Visitor Counter : 124