पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन


"पोर्ट ब्लेअरच्या नवीन टर्मिनल इमारतीमुळे प्रवास सुलभता, व्यवसाय सुलभता आणि संपर्क व्यवस्था वाढेल"

"भारतात दीर्घकाळापासून विकासाची व्याप्ती मोठ्या शहरांपुरती मर्यादित"

“भारतात समावेशकतेच्या विकासाचे नवे प्रारुप पुढे आले आहे. ते प्रारुप म्हणजे ‘सबका साथ,सबका विकास’"

"अंदमान हे विकास आणि वारशाच्या महामंत्राचे बनत आहे जिवंत उदाहरण"

"अंदमान आणि निकोबार बेटांचा विकास देशातील तरुणांसाठी ठरला आहे प्रेरणास्त्रोत"

"विकास, सर्व प्रकारच्या उपाययोजनांसह आकारास येतो"

"आज जगात अभूतपूर्व प्रगती केलेली बेटे आणि लहान किनारी देशांची अनेक उदाहरणे"

Posted On: 18 JUL 2023 3:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जुलै 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्‌घाटन केले. नवीन टर्मिनल इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे 710 कोटी रुपये खर्च आला असून, दरवर्षी सुमारे 50 लाख प्रवासी वाहतुकीची याची क्षमता आहे.

आजचा कार्यक्रम पोर्ट ब्लेअरमध्ये होत असला तरी वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रवासी वाहतुक क्षमता वाढवण्याची मागणी पूर्ण होत असल्याने संपूर्ण देश या केंद्रशासित प्रदेशाकडे उत्सुकतेने पाहत आहे असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. येथील आनंदी वातावरण आणि नागरिकांचे आनंदी चेहरे अनुभवता यावेत यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहता यायला हवे होते अशी इच्छाही पंतप्रधानांनी व्यक्त केली.  "अंदमानला भेट देण्याची इच्छा असणाऱ्यांनीही मोठ्या क्षमतेच्या विमानतळाची मागणी केली होती", असे ते पुढे म्हणाले.

सध्याच्या टर्मिनलमध्ये 4000 पर्यटक वाहतुकीची क्षमता होती.  नवीन टर्मिनलमुळे ही संख्या 11,000 वर गेली असून आता कोणीही वेळी 10 विमाने येथे उभी करता येतील असे या विमानतळ विस्ताराच्या अनुषंगाने त्यांनी सांगितले. यामुळे उड्डाणांची संख्या वाढेल. या भागात अधिक पर्यटक पर्यायाने नोकऱ्या येतील, असे ते म्हणाले.  पोर्ट ब्लेअरच्या नवीन टर्मिनल इमारतीमुळे प्रवास सुलभता, व्यवसाय सुलभता आणि संपर्क व्यवस्था वाढेल, असेही पंतप्रधान म्हणाले.

भारतात दीर्घकाळापासून विकासाची व्याप्ती मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहिली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. देशातील आदिवासी आणि बेटांचे प्रदेश दीर्घकाळापासून विकासापासून वंचित आहेत.गेल्या 9 वर्षात सध्याच्या सरकारने अत्यंत संवेदनशीलतेने आधीच्या सरकारांच्या चुका सुधारल्याच सोबतच नवी व्यवस्थाही आणली आहे.  भारतात समावेशकतेच्या विकासाचे नवे प्रारुप पुढे आले आहे. ते प्रारुप म्हणजे ‘सबका साथ, सबका विकास’, असे पंतप्रधान म्हणाले. विकासाचे हे प्रारुप अतिशय व्यापक असून त्यात प्रत्येक क्षेत्राचा, समाजातील प्रत्येक घटकाचा आणि जीवनातील प्रत्येक पैलूचा जसे की शिक्षण, आरोग्य आणि संपर्क व्यवस्थेचा समावेश आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या 9 वर्षात अंदमानमध्ये विकासाची नवी गाथा लिहिली गेली आहे असे पंतप्रधान म्हणाले. मागील सरकारच्या 9 वर्षाच्या काळात अंदमान आणि निकोबारला 23,000 कोटी रुपयांचा निधी मिळाला होता, तर विद्यमान सरकारच्या गेल्या नऊ वर्षांत अंदमान आणि निकोबारसाठी सुमारे 48,000 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला.   मागील सरकारच्या 9 वर्षाच्या कालखंडात 28,000 घरे जलवाहिनीद्वारे जोडण्यात आली होती, गेल्या 9 वर्षातील ही संख्या 50,000 झाली आहे. अंदमान आणि निकोबारमधील प्रत्येकाकडे आज बँक खाते आणि एक राष्ट्र एक शिधापत्रिकेची सुविधा आहे. पोर्ट ब्लेअरमधील वैद्यकीय महाविद्यालय देखील विद्यमान सरकारनेच उभारले आहे, यापूर्वी येथे  वैद्यकीय महाविद्यालय नव्हते.  पूर्वी इंटरनेट सुविधा केवळ उपग्रहांवर अवलंबून होती, आता सध्याच्या सरकारने समुद्राखालून शेकडो किलोमीटरचे ऑप्टिकल फायबर टाकण्याचा पुढाकार घेतला असे पंतप्रधानांनी सांगितले.

सुविधांच्या या विस्तारामुळे येथील पर्यटनाला गती मिळत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.  मोबाइल कनेक्टिव्हिटी, आरोग्य पायाभूत सुविधा, विमानतळ सुविधा आणि रस्ते यामुळे पर्यटकवाढीला चालना मिळते.  म्हणूनच, 2014 च्या तुलनेत पर्यटकांची संख्या दुपटीने वाढली आहे असे ते म्हणाले. साहसी पर्यटन देखील भरभराटीला येत आहे आणि येत्या काही वर्षांत ही संख्या अनेक पटींनी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अंदमान हे विकास आणि वारशाच्या महामंत्राचे जिवंत उदाहरण बनत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. लाल किल्ल्यावर फडकावण्यापूर्वी तिरंगा अंदमानमध्ये फडकावला गेला असला तरी येथे गुलामगिरीच्या खुणाच सापडतात, असे पंतप्रधानांनी नमूद केले.  नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ज्या ठिकाणी तिरंगा फडकावला त्याच ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सध्याच्या सरकारने रॉस बेटाचे नाव नेताजी सुभाष बेट, हॅवलॉक बेटाचे स्वराज बेट आणि नील बेटाचे शहीद बेट असे नामकरण केल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. 21 बेटांना परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांचे नाव देण्याचा उल्लेखही त्यांनी केला.  "अंदमान आणि निकोबार बेटांचा विकास देशातील तरुणांसाठी प्रेरणास्रोत बनला आहे", असे ते पुढे म्हणाले.

स्वातंत्र्याच्या गेल्या 75 वर्षात भारताने नवीन उंची गाठली असती, कारण भारतीयांच्या क्षमतेबद्दल शंका नाही.  मात्र, भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या राजकारणाने सर्वसामान्य नागरिकांच्या ताकदीवर नेहमीच अन्याय केला, असे पंतप्रधानांनी नमूद केले.  काही पक्षांच्या संधीसाधू राजकारणावरही पंतप्रधानांनी प्रकाशझोत टाकला. जातीयवाद आणि भ्रष्टाचाराच्या राजकारणावर त्यांनी टीका केली. भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, काही प्रकरणांमध्ये जामिनावर आहेत आणि दोषीही आहेत त्यांनाही स्विकारण्यावर त्यांनी टीका केली.  संविधानाला ओलीस ठेवण्याच्या मानसिकतेवर त्यांनी प्रहार केला.  अशा शक्ती सामान्य नागरिकांच्या विकासाचा विचार न करता स्वार्थी कौटुंबिक फायद्यावर लक्ष केंद्रित करतात याकडे त्यांनी लक्ष वेधले. संरक्षण आणि स्टार्टअप क्षेत्रात भारतातील तरुणांचे सामर्थ्य अधोरेखित करत तरुणांच्या या ताकदीला कसा न्याय मिळाला नव्हता  याबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले.

भाषणाचा समारोप करताना, देशाच्या विकासासाठी स्वत:ला झोकून देण्यावर पंतप्रधानांनी भर दिला.  आज जगात अभूतपूर्व प्रगती केलेली बेटे आणि लहान किनारपट्टीवरील देशांची अनेक उदाहरणे आहेत. प्रगतीचा मार्ग जरी आव्हानांनी भरलेला असला तरी विकास सर्व प्रकारच्या उपाययोजनांसह आकाराला येतो यावर त्यांनी प्रकाश टाकला. अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये होत असलेल्या विकासकामांमुळे संपूर्ण प्रदेश आणखी मजबूत होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

पार्श्वभूमी :-

संपर्क व्यवस्था पायाभूत सुविधा वाढवणे हे सरकारचे प्रमुख लक्ष आहे. सुमारे 710 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन, या केंद्रशासित प्रदेशाच्या संपर्क व्यवस्थेला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.  सुमारे 40,800 चौ.मी.च्या एकूण बांधकाम क्षेत्रासह, नवीन टर्मिनल इमारत दरवर्षी सुमारे 50 लाख प्रवासी वाहतुकीसाठी सक्षम असेल.  पोर्ट ब्लेअर विमानतळावर 80 कोटी रुपये खर्चून दोन बोईंग-767-400 आणि दोन एअरबस-321 प्रकारच्या विमानांसाठी उपयुक्त तळ देखील बांधण्यात आले आहे, ज्यामुळे विमानतळावर आता एकावेळी दहा विमाने उभी करता येतील.

  

S.Pophale/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1940447) Visitor Counter : 180