उपराष्ट्रपती कार्यालय
"लोकांचे जीवन बदलण्यासाठी उत्कटता, ध्येय आणि करुणा बाळगा " - नागरी सेवकांना उपराष्ट्रपतींचे आवाहन
Posted On:
14 JUL 2023 9:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जुलै 2023
उपराष्ट्रपतीं जगदीप धनखड यांनी आज युवा नागरी सेवकांना लोकांचे जीवन बदलण्यासाठी उत्कटता, ध्येय आणि करुणा बाळगण्याचे आवाहन केले. “ ज्यांनी आशा गमावली आहे त्यांना आनंद देण्यापेक्षा अधिक समाधानकारक काहीही असू शकत नाही,” असे त्यांनी आज उप-राष्ट्रपती निवास येथे भेटायला आलेल्या 2021 आणि 2022 तुकडीच्या भारतीय टपाल सेवेतील प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना सांगितले.
भारताचा जागतिक पटलावर नव्याने उदय झाला आहे,असे सांगून धनखड म्हणाले की, ग्रामीण भागाचे योगदान आणि कष्टकरी शेतकरी आणि कामगारांच्या प्रयत्नांमुळे भारताचा हा उदय शाश्वत असणार आहे. भारताच्या जागतिक विकासाला थांबवता येणे शक्य नाही असे सांगून, त्यांनी अधोरेखित केले की, " एक दशकापूर्वी आपण जागतिक अर्थव्यवस्थेत दहाव्या स्थानावर होतो आणि आता आपण पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत."
युवा अधिकारी प्रशिक्षणार्थींना ‘विकासाचे दूत’ आणि ‘अमृत कालचे योद्धे’ असे संबोधत त्यांच्या नवकल्पना आणि कौशल्याने भारताची प्रगती जलद गतीने करण्याचे आवाहन त्यांनी केले. देश परिवर्तनाच्या निर्णायक क्षणी आहे यावर भर देत नागरी सेवकांनी सर्वसमावेशक विकास , आर्थिक समावेशकता आणि सुलभ सेवा वितरण सुनिश्चित करावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
लोकांमध्ये शिस्त आणि राष्ट्रवादाची मूल्ये रुजविण्याचे आवाहन करून धनखड यांनी प्रत्येक टपाल कार्यालयाने मूलभूत कर्तव्ये प्रदर्शित आणि प्रसिद्ध करावीत असे सुचवले; यामुळे नागरिकांचा दृष्टिकोन बदलेल.
S.Kane/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1939630)
Visitor Counter : 149