रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आंध्रप्रदेशात तिरुपती येथे राष्ट्रव्यापी वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात


हा उपक्रम आपल्या देशातील राष्ट्रीय महामार्गांना पर्यावरणीय दृष्ट्या शाश्वत हरित महामार्गांमध्ये रुपांतरीत करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आलेल्या हरित भारत अभियानाशी सुसंगत आहे: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Posted On: 12 JUL 2023 9:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जुलै 2023

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज आंध्रप्रदेशात तिरुपती येथे राष्ट्रव्यापी वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात केली.

‘स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवा’अंतर्गत, एनएचएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राष्ट्रीय महामार्गांच्या लगतच्या परिसरात निश्चित केलेल्या 300 हून अधिक जागांवर, एका दिवसात एकाच वेळी 2.75 लाख रोपटी लावण्याच्या उद्देशाने हे अभियान आयोजित केले होते. महामार्गांच्या लगतच्या या 300 ठिकाणांमध्ये एनएचएआय लँड पार्सल्स, टोल वसुली केंद्रे आणि अमृत सरोवरांचा देखील समावेश आहे.पर्यावरणाच्या शाश्वततेचा संदेश प्रसारित करणाऱ्या या मोहिमेमध्ये लोक प्रतिनिधी, नागरी समाज, स्वयंसेवी संस्था आणि विद्यार्थ्यांनी देखील भाग घेतला.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की हा उपक्रम आपल्या देशातील राष्ट्रीय महामार्गांना पर्यावरणीय दृष्ट्या शाश्वत हरित महामार्गांमध्ये रुपांतरित करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आलेल्या हरित भारत अभियानाशी सुसंगत आहे. या कार्याप्रति आमची कटिबद्धता अविचल आहे कारण रस्ते प्रकल्पांच्या कार्यासाठी पडलेल्या झाडांच्या संख्येच्या दुप्पट संख्येने झाडे लावून, प्रकल्पासाठी पाडण्यात आलेल्या प्रत्येक झाडाची भरपाई करण्यासाठी परिश्रमपूर्वक प्रयत्न करत आहोत अशी माहिती त्यांनी दिली. तसेच रस्ते प्रकल्पांच्या मार्गातील पूर्णपणे वाढ झालेल्या आणि मोठमोठ्या झाडांचे दुसऱ्या ठिकाणांवर पुनर्रोपण करण्यात आम्हांला यश आले आहे असे ते पुढे म्हणाले.

ते म्हणाले की वृक्षांचे रोपण तसेच पुनर्रोपण करणे हा आता राष्ट्रीय महामार्ग विकास कार्याचा अविभाज्य भाग झाला आहे. या झाडांचे जिओटॅगिंग करण्यावर देखील भर दिला जात आहे जेणेकरुन, या झाडांची प्रगती आणि वाढ यावर लक्ष ठेवता येऊ शकेल असे त्यांनी सांगितले. या वृक्षारोपण अभियानाचा शाश्वत तसेच दीर्घकालीन परिणाम साधता यावा म्हणून सामान्य जनतेने पुढे येऊन या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन देखील केंद्रीय मंत्र्यांनी केले.

वृक्षारोपण कृती योजना हा महामार्ग विकास कार्यक्रमातील अधिक लक्ष केंद्रित करण्यात आलेला घटक असून त्या अंतर्गत महामार्गांच्या दोन्ही बाजूंच्या लगतची अतिरिक्त जमीन, येणारा आणि जाणारा महामार्ग विभागणारी जमीन तसेच आरओडब्ल्यूमधील जमीन यांच्यावर स्थानिक स्वदेशी झुडुपे आणि झाडे लावण्यात येतात. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जाहीर केलेल्या हरित महामार्ग धोरण – 2015 मधील नियमानुसार एनएचएआय ने वार्षिक वृक्षारोपण कृती योजनेचा भाग म्हणून वर्ष 2016-17 ते 2022-23 या काळात 3.46 कोटी रोपट्यांची लागवड केली. यावर्षी 56 लाखांहून अधिक रोपे लावण्याचे उद्दिष्ट निश्चित झाले असून हे काम पावसाळ्यापासूनच सुरु झाले आहे.

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1939087) Visitor Counter : 160