अणुऊर्जा विभाग
संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित 34 व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारत पदकतालिकेत अव्वलस्थानी
जालन्याच्या मेघ छाबडाने पटकावले सुवर्णपदक
Posted On:
11 JUL 2023 3:17PM by PIB Mumbai
मुंबई, 11 जुलै 2023
संयुक्त अरब अमिरातीमध्ये अल एन येथे 3 जुलै ते 11 जुलै 2023 दरम्यान आयोजित 34 व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड (आयबीओ) 2023 मध्ये भारताने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. हे शक्य झाले सुवर्णपदक जिंकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणवत्तेमुळे ! भारताने प्रथमच सुवर्ण कामगिरी करून आयबीओमध्ये पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.
सुवर्ण कामगिरी करणारे या वर्षीचे विद्यार्थी :
ध्रुव अडवाणी (सुवर्णपदक ) बंगळुरू, कर्नाटक
ईशान पेडणेकर (सुवर्णपदक ) कोटा, राजस्थान
मेघ छाबडा (सुवर्णपदक ) जालना , महाराष्ट्र
रोहित पांडा (सुवर्णपदक ) रिसाली, छत्तीसगड
विद्यार्थ्यांच्या चमूसोबत प्रा. मदन एम. चतुर्वेदी (माजी वरिष्ठ प्राध्यापक, दिल्ली विद्यापीठ) आणि डॉ. अनुपमा रोनाड (एचबीसीएसई, टीआयएफआर ) हे दोन प्रमुख आणि डॉ. व्ही. बिनॉय (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीज, बंगळुरू) आणि डॉ रामभादूर सुबेदी (एनआयआरआरएच, मुंबई) हे दोन वैज्ञानिक निरीक्षक होते.
यंदाच्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 76 देशांतील 293 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या स्पर्धेत एकूण 29 सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. भारताव्यतिरिक्त केवळ सिंगापूर या देशाने या स्पर्धेत चार सुवर्णपदके पटकावली.
यापूर्वी, भारताने खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र (2008, 2009, 2010, 2011, 2015 आणि 2021 मध्ये), भौतिकशास्त्र (2018 मध्ये) आणि कनिष्ठ विज्ञान (2014, 2019, 2021 आणि 2022 मध्ये) पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.
S.Thakur/S.Chavan/ P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1938675)
Visitor Counter : 177