सांस्कृतिक मंत्रालय
जी-20 संस्कृती कार्यकारी गटाच्या (CWG) तिसऱ्या बैठकीला आजपासून कर्नाटकमध्ये हंपी इथे सुरुवात
सुमारे 150 पुरातन वस्तू आणि कलाकृती येत्या तीन ते सहा महिन्यात अमेरिकेतून भारतात परतणे अपेक्षित: गोविंद मोहन
Posted On:
09 JUL 2023 7:20PM by PIB Mumbai
भारताच्या जी-20 अध्यक्षते अंतर्गत जी-20 संस्कृती कार्यकारी गटाच्या (CWG) तिसऱ्या बैठकीला आजपासून कर्नाटकात हंपी इथे सुरुवात झाली. ही बैठक येत्या 12 जुलै पर्यंत सुरू राहील, असे केंद्रीय संस्कृती मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन यांनी हंपी इथे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
संस्कृती कार्यकारी गटाच्या या आधीच्या दोन बैठका मध्य प्रदेशात खजुराहो आणि ओदिशात भुवनेश्वर इथे झाल्या होत्या, आता हंपी इथे होत असलेल्या या तिसऱ्या बैठकीत, जी-20 राष्ट्र समूहाची सदस्य राष्ट्रे, निमंत्रित देश आणि सात बहुपक्षीय संस्थांचे मिळून 50 जण सहभागी होत आहेत अशी माहिती त्यांनी दिली.मागील दोन बैठकांमध्ये तज्ज्ञांचा समावेश असलेले, विशिष्ट संकल्पनेवर आधारीत 4 वेबिनार आयोजित करण्यात आले होते आणि जी-20 समूहाच्या सर्व 29 सदस्य देशांनी आणि 7 बहुउद्देशीय संस्थांनी त्यामध्ये सहभाग घेतल्यामुळे ते वेबिनार यशस्वी ठरले अशी माहितीही गोविंद मोहन यांनी दिली.
गोविंद मोहन म्हणाले की, संस्कृती कार्यकारी गटाने ठरवलेल्या 4 प्राधान्यक्रमांच्या अनुषंगाने असलेल्या शिफारसी आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींवर एकमत साधण्याचा प्रयत्न, आता ही तिसरी बैठक करेल. भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या काळात संस्कृती संवर्धनाचा एक भाग म्हणून निश्चित केलेली 4 मुख्य प्राधान्य क्षेत्रे, या तिसऱ्या बैठकीच्या केंद्रस्थानी असतील. सांस्कृतिक साधनसंपत्तीचे संरक्षण आणि पुनर्स्थापना, शाश्वत भविष्यासाठी सध्याचा प्रचलित वारसा यापुढेही जोपासणे, सांस्कृतिक आणि सर्जनशील उद्योग तसेच सर्जनशील अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन आणि संस्कृतीचे संरक्षण आणि संवर्धनासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर; ही ती चार प्राधान्य क्षेत्रे आहेत.
वाराणसी इथे पुढील महिन्यात ऑगस्टमध्ये होणाऱ्या जी-20 सदस्य राष्ट्रांच्या संस्कृती मंत्रीस्तरीय बैठकीसाठी यासंदर्भात सर्वांचे मिळून संयुक्त निवेदन तयार करण्याच्या दृष्टीने या सध्याच्या तिसऱ्या बैठकीत भर दिला जाईल असेही गोविंद मोहन म्हणाले.
'सांस्कृतिक साधनसंपत्तीचे संरक्षण आणि पुनर्स्थापना' या संकल्पनेबाबत अधिक तपशीलवार माहिती देताना ते म्हणाले की 1970 च्या युनेस्कोच्या अधिवेशनात या संदर्भातील ठरावावर स्वाक्षरी करणार्या देशांनी, वसाहतवादी लुटीतून किंवा वसाहतवादी राजवटी पश्चात तस्करी चोरीच्या माध्यमातून आपापल्या देशात आलेल्या जुन्या कलाकृती-चीज वस्तू त्या त्या देशांना स्वत:हून परत करायच्या आहेत. त्यामुळे भारतात सध्या सुरू असलेल्या संस्कृती कार्यगटाच्या बैठकांमध्ये, जी-20 समूहाच्या सर्व सदस्य राष्ट्रांनी या ठरावावर स्वाक्षरी करावी असा प्रयत्न केला जाईल आणि याचा फायदा भारताला मोठ्या प्रमाणात होईल असे त्यांनी सांगितले.
सुमारे 150 पुरातन वस्तू आणि कलाकृती येत्या तीन ते सहा महिन्यात अमेरिकेतून भारतात परतणे अपेक्षित आहे अशी माहितीही गोविंद मोहन यांनी दिली.
हंपी इथे होत असलेल्या या तिसऱ्या जी-20 CWG बैठकीचा एक भाग म्हणून “वूव्हन नरेटिव्हज’’ या नावाचे प्रदर्शन आयोजित केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
***
N.Chitale/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1938337)
Visitor Counter : 148