रेल्वे मंत्रालय

पंतप्रधानांनी गोरखपूर रेल्वे स्थानकावर दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा


गोरखपूर-लखनौ अयोध्या मार्गे आणि जोधपूर-अहमदाबाद (साबरमती) दरम्यान वंदे भारत रेल्वेगाडी सुरू

आता देशात एकूण 50 वंदे भारत रेल्वे कार्यरत

सध्याच्या मार्गांवर सर्वात वेगाने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या तुलनेत वंदे भारतमधून प्रवास करताना वेळेची बचत

प्रवाशांना जागतिक दर्जाचा अनुभव देण्यासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू

Posted On: 07 JUL 2023 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 जुलै 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील गोरखपूर रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्स्प्रेसच्या दोन नवीन आणि अद्यावत  गाड्यांना आज हिरवा झेंडा दाखवला. त्यामुळे भारतीय रेल्वेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला.  उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोरखपूरचे खासदार रवि किशन शुक्ला, लोकप्रतिनिधी आणि विशेष अतिथी यावेळी उपस्थित होते.

आरामदायी आणि अधिक सुकर अशा रेल्वे प्रवासाचा अनुभव देणारे एक नवे युग त्यामुळे सुरू झाले. गोरखपूर-लखनौ अयोध्या मार्गे आणि जोधपूर-अहमदाबाद (साबरमती) दरम्यान दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू झाल्या आहेत. या गाड्या राज्यांच्या राजधान्या आणि इतर शहरांमधील संपर्क सुधारतील, प्रवासाचा वेळ कमी करतील आणि अधिक आरामदायी प्रवास देतील. या वंदे भारत ट्रेन आपल्या देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात नव भारत - विकसित भारताचा संदेश घेऊन जात आहेत.

 

गोरखपूर-लखनौ वंदे भारत एक्सप्रेस

उत्तर प्रदेशची ही दुसरी वंदे भारत एक्सप्रेस गाडी गोरखपूरहून निघेल. त्याच दिवशी ही गाडी बस्ती आणि अयोध्या येथे थांबून लखनौ येथे  पोहोचेल. ही गाडी सुरू झाल्यामुळे गोरखपूर आणि लखनौ, जवळपासची धार्मिक स्थळे आणि पर्यटन स्थळांची कनेक्टिव्हिटी वाढेल, तसेच या प्रदेशाचा सर्वांगीण विकासही होईल. या मार्गामुळे धार्मिक शहरांमधील संपर्काची दीर्घकाळ प्रलंबित मागणीही पूर्ण होणार आहे.

 

जोधपूर- अहमदाबाद (साबरमती)

राजस्थानातील जोधपूर ते गुजरातमधील अहमदाबाद (साबरमती) ही वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडी   जोधपूर रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि त्याच दिवशी पाली मारवाड, रणकपूर अबू रोड येथे थांबा घेऊन अहमदाबाद (साबरमती) स्थानकात पोहोचेल. त्यामुळे सहज आणि जलद प्रवासाबरोबरच या प्रदेशांची संस्कृती, पर्यटन आणि तीर्थक्षेत्रे  एकमेकांना जोडली गेली आहेत.

गोरखपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामांची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. 498 कोटी रुपये खर्चून या स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार असून तिथे  जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवल्या जाणार आहेत.

कवच तंत्रज्ञानासह प्रगत अत्याधुनिक सुरक्षा हेही या गाड्यांचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक रेल्वेगाडीला  160 किमी प्रतितास या गतीसाठी पूर्णपणे सस्पेंडेड  ट्रॅक्शन मोटर्स असलेल्या बोगी देण्यात आल्या आहेत. प्रगत अत्याधुनिक सस्पेन्शन सिस्टीम प्रवाशांसाठी सुरळीत आणि सुरक्षित प्रवासाची खात्री देते.

पॉवर कार्स आणि प्रगत रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम असलेली या गाडीची रचना सुमारे 30% विजेची बचत करते. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी भारतीय रेल्वे करत असलेल्या प्रयत्नांची प्रचिती येत आहे.

 

* * *

S.Kakade/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1938024) Visitor Counter : 113