ग्रामीण विकास मंत्रालय
स्वयं सहाय्यता गटांच्या महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाकडून मोबाईल अॅपचा प्रारंभ
Posted On:
03 JUL 2023 8:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जुलै 2023
स्वयं सहाय्यता गटांच्या महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासंदर्भात सहाय्यासाठी आणखी एक पाऊल म्हणून दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाकडून ((DAY-NRLM) ई सरस (eSARAS) मोबाईल अॅपचा प्रारंभ करण्यात आला आहे. हे अॅप स्वयं सहाय्यता गटांच्या उत्पादनांना ई कॉमर्स उपक्रमांशी जोडेल. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयातील सचिव शैलेश कुमार सिंह यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे अॅपचा प्रारंभ झाला. मंत्रालयाच्या नवी दिल्ली येथील जनकपुरी कार्यालयात ई सरस पूर्तता केंद्राचे उदघाटनही सिंह यांच्या हस्ते झाले.
ई सरस पूर्तता केंद्राचे व्यवस्थापन फाऊंडेशन फॉर डेव्हलपमेंट ऑफ रुरल व्हॅल्यू चेन्स (FDRVC - ग्रामीण विकास मंत्रालय आणि टाटा ट्रस्ट यांनी संयुक्तपणे स्थापन केलेली ना नफा कंपनी) द्वारे केले जाईल. ग्राहकांनी eSARAS (ई सरस) पोर्टल आणि ई सरस मोबाईल अॅपद्वारे खरेदी केलेल्या उत्पादनांच्या प्रक्रिया, पॅकेजिंग आणि प्रेषणासाठी या केंद्राचा उपयोग केला जाईल. ऑनलाइन ऑर्डर ग्राहकाच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक लॉजिस्टिकविषयक बाबी हे केंद्र हाताळेल.
ई सरस हे ई-कॉमर्स मोबाईल अॅप स्वयं-सहायता गटातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी अधिक प्रभावी मंच म्हणून वापरले जाईल. सर्वोत्तम, अस्सल हस्तकला आणि हातमागाच्या विपणनासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाद्वारे संकल्पित केलेला हा उपक्रम आहे.
स्वयं सहाय्यता गटाच्या महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या सुलभ विपणनासह व्होकल फॉर लोकल अर्थात स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या तत्त्वाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम असल्याचे सचिव शैलेश कुमार सिंह यांनी या अॅपचा प्रारंभ करताना सांगितले. प्रत्येक स्वयं सहाय्यता गट कुटुंबाकडे उपजीविकेचे किमान 2-3 स्रोत असावेत असे मंत्रालयाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. गरिबांच्या उपजीविकेच्या अनेक साधनांपैकी एक बिगरशेती उद्योग आहे. स्वयं सहाय्यता गटांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठेशी जोडले जाण्याची व्यवस्था आवश्यक होती. स्वयं सहाय्यता गटांद्वारे बनवलेली हस्तनिर्मित उत्पादने आता ई सरस मोबाईल अॅपद्वारे प्रत्येकाला सुलभरित्या उपलब्ध होतील.
* * *
N.Chitale/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1937120)
Visitor Counter : 226