अर्थ मंत्रालय

सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि पात्र खाजगी क्षेत्रातील बँकांना महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, 2023 योजनेची अंमलबजावणी करण्यास परवानगी

Posted On: 30 JUN 2023 4:14PM by PIB Mumbai

 

केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने 27 जून 2023 रोजी जारी केलेल्या ई-राजपत्रित अधिसूचनेद्वारे, सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांना आणि पात्र खाजगी क्षेत्रातील बँकांना महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, 2023 ची अंमलबजावणी करण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे, मुली/महिलांसाठीची ही योजना आता अधिक ठिकाणी सहजपणे उपलब्ध असेल. टपाल कार्यालयांसह पात्र शेड्यूल्ड बँकांमधूनही महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचा लाभ घेता येईल.

ही योजना टपाल विभागामार्फत  1 एप्रिल 2023 पासून चालवली जात आहे.

महिलांच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी केंद्र सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून अनेक प्रयत्न केले आहेत. याच प्रयत्नांचे पुढचे पाऊल म्हणून, केंद्र सरकारने देशातल्या प्रत्येक मुलीला आणि महिलेला आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, 2023 योजना जाहीर केली.

 

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये.

  • ही योजना सर्व मुली आणि महिलांना आकर्षक आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय प्रदान करते.
  • या योजनेंतर्गत 31 मार्च 2025 रोजी किंवा त्यापूर्वी दोन वर्षांच्या कालावधीसाठी खाते उघडले जाऊ शकते.
  • महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत ठेवलेल्या ठेवीवर 7.5% वार्षिक दराने व्याज असेल ज्यात तिमाही चक्रवाढ होईल. त्यामुळे, प्रभावी व्याज दर अंदाजे 7.7 टक्के असेल.
  • किमान 1000 रुपये आणि 100 च्या पटीत 200,000 रुपयांच्या कमाल मर्यादेत कितीही रक्कम जमा केली जाऊ शकते.
  • या योजनेतील गुंतवणुकीची मॅच्युरिटी ही योजनेअंतर्गत खाते उघडल्याच्या तारखेपासून दोन वर्षांची असेल.
  • या योजनेत केवळ गुंतवणुकीतच नव्हे तर योजनेच्या कालावधी दरम्यान आंशिक पैसे काढण्यासाठी देखील लवचिकता ठेवण्यात आली आहे. खातेदार योजनेच्या खात्यातील  शिलकीच्या कमाल 40% पर्यंत काढण्यास पात्र असेल.

***

R.Aghor/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1936426) Visitor Counter : 154