संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सैन्य दल प्रमुखांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ड्युरान्ड चषक ट्रॉफी चा संघ मार्गस्थ

Posted On: 30 JUN 2023 2:51PM by PIB Mumbai

 

लष्करप्रमुख, एअर चीफ मार्शल जनरल मनोज पांडे, हवाई दल प्रमुख व्हीआर चौधरी, आणि अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे (एआयएफएफ)अध्यक्ष श्री कल्याण चौबे, यांनी 132 व्या ड्युरंड चषक  खेळाच्या ट्रॉफी टूरला आज हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.ड्यूरान्ड कप ही  भारतातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा असून 30 जून 2023 रोजी माणेकशॉ सेंटर, दिल्ली कॅंट येथे आयोजित करण्यात आलेल्या समारंभात या ट्रॉफी संघाला मार्गस्थ करण्यात आले.

ही स्पर्धा 03 ऑगस्ट ते 03 सप्टेंबर 2023 या कालावधीत कोलकाता येथे होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने युवा फुटबॉलप्रेमी आणि क्रीडाक्षेत्रातील प्रख्यात मान्यवर उपस्थित होते.

ड्युरान्ड कप ही आशियातील सर्वात जुनी आणि जगातील तिसरी सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे, ज्यामध्ये देशभरातील उत्तम भारतीय फुटबॉल क्लब सहभागी होतात. भारतीय सशस्त्र दलाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेली, ड्युरंड चषक फुटबॉल क्रीडा स्पर्धा ही गेल्या काही वर्षांपासून भारतातील फुटबॉल खेळातील प्रतिभावंत खेळाडूंसाठी सर्वोत्तम क्रीडास्पर्धा म्हणून मान्यता पावली आहे.या क्रीडाचषकाचा आरंभ 1888 मध्ये शिमला येथे आर्मी चषक  म्हणून सुरू झाला, जो त्याकाळी फक्त भारतातील ब्रिटिश सैन्य दलांसाठी खुला होता, परंतु लवकरच तो इतर नागरी संघांसाठीही खुला  झाला.

ड्युरान्ड चषक स्पर्धा ही अनोखी स्पर्धा असून यात विजेत्या संघाला तीन चषक मिळतात, म्हणजे ड्युरान्ड कप (एक फिरता चषक आणि मूळ बक्षीसाची रक्कम), शिमला चषक (हा फिरता चषक असून तो प्रथम 1904 मध्ये शिमलाच्या रहिवाशांनी सुरू केला आहे) आणि प्रेसिडेंट कप (कायमस्वरूपी ठेवण्यासाठी असून तो  सर्वप्रथम भारताचे पहिले राष्ट्रपती,डॉ.राजेंद्र प्रसाद,1956 यांच्या हस्ते देण्यात आला होता).

कोलकाता येथे होणाऱ्या मुख्य स्पर्धेपूर्वी, पुढील एक महिना हे तीनही चषक, ट्रॉफी टूरचा एक भाग म्हणून शिमला, उधमपूर, जयपूर, मुंबई, पुणे, बेंगळुरू, भुवनेश्वर, कोक्राझार, गुवाहाटी आणि शिलाँग यासारख्या प्रमुख शहरांमध्ये फिरवले जाणार आहेत.

यंदाचे वर्ष, या स्पर्धेचे 132 वे वर्ष असून नेपाळ, भूतान आणि बांगलादेशच्या संघांसह 24 संघांचा सहभाग यात आहे, परदेशी संघ 27 वर्षानंतर या स्पर्धेत भाग घेत आहेत.ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन (AIFF) च्या अंतर्गत ड्युरान्ड फुटबॉल टूर्नामेंट सोसायटी (DFTS) द्वारे आयोजित केलेली ही स्पर्धा क्लब सर्व संघांसाठी खुली आहे. ही स्पर्धा नेहमीच क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टता, खिलाडूवृत्ती आणि स्पर्धात्मकता दर्शवणारी ठरली आहे.

***

R.Aghor/S.Patgaonkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1936413) Visitor Counter : 141