वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन क्षेत्रांमध्ये व्यापाराला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी तसेच विकासाला वेग देण्यासाठी सरकार वचनबद्ध: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल


उद्योगक्षेत्रासाठी आवश्यक बाबी आणि ग्राहकांच्या गरजा या दोन्हींची पूर्तता करणाऱ्या उच्च दर्जाच्या उत्पादनांची निर्मिती करण्यावर केंद्रीय मंत्री गोयल यांनी दिला अधिक भर

Posted On: 28 JUN 2023 7:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 जून 2023

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग तसेच ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे की उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) क्षेत्रांमध्ये व्यापाराला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी तसेच विकासाला वेग देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. “पीएलआय योजना”या विषयावर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीपीआयआयटी) काल आयोजित केलेल्या कार्यशाळेत बीजभाषण करताना त्यांनी पीएलआय योजनेशी संबंधित धोरणे, प्रक्रिया आणि या योजनेची परिणामकारकता यांना आकार देण्यासाठी उद्योग क्षेत्राचा अभिप्राय तसेच सहकार्यात्मक सहभागाला प्रोत्साहन दिले.

उद्योगक्षेत्रासाठी आवश्यक बाबी आणि ग्राहकांच्या गरजा या दोन्हींची पूर्तता करणाऱ्या उच्च दर्जाच्या उत्पादनांची निर्मिती करण्यावर उद्योग क्षेत्राने लक्ष एकाग्र करण्याच्या महत्त्वावर केंद्रीय मंत्री गोयल यांनी अधिक भर दिला. पीएलआय योजनेच्या लाभार्थ्यांनी योजनेची अंमलबजावणी करणारे मंत्रालय/विभाग यांच्याशी संबंधित प्रक्रियात्मक आव्हाने /समस्या सरकारसमोर आणावीत जेणेकरुन त्या संदर्भात सकारात्मक सुधारणा करता येतील आणि पीएलआय योजनेला अधिक कार्यक्षम आणि परिणामकारक स्वरूप देता येईल असे देखील त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, अंमलबजावणी करणारे मंत्रालय/विभाग यांच्यात कार्यरत सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील संबंधित पीएलआय लाभार्थ्यांशी नियमितपणे चर्चा तसेच गोलमेज बैठका यांचे आयोजन करावे जेणेकरून लाभार्थ्यांच्या समस्या तत्परतेने सोडवता येतील.

आपल्या देशातील उद्योगक्षेत्रात विकास, नवोन्मेष आणि स्पर्धात्मकता यांची चालना देणाऱ्या वातावरणाची निर्मिती करण्यासाठी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी भागधारकांना केले. पीएलआय योजनेशी संबंधित महत्त्वाच्या सर्व भागधारकांना एका मंचावर आणणे तसेच त्यांच्यात स्वामित्वाची भावना निर्माण करणे हा या कार्यशाळेच्या आयोजनाचा उद्देश होता. महत्त्वाच्या 14 क्षेत्रांतील पीएलआय योजनांची परिणामकारक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी या भागधारकांना त्यांचे ज्ञान तसेच अनुभव सामायिक करता यावेत या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केली होती.

योजनेची अंमलबजावणी करणारी 10 केंद्रीय मंत्रालये, महत्त्वाच्या 14 क्षेत्रांतील कंपन्या/पीएलआय लाभार्थी, आयएफसीआय, सिडबी,इरेडा यांसारख्या विविध प्रकल्प व्यवस्थापन संस्था, निवडक उद्योग संघटना (सीआयआय,फिक्की,एसोचेम) तसेच एफआयईओ, ईईपीसी आणि टीईपीसी यांसारखी संबंधित निर्यात प्रोत्साहन मंडळे या सर्वांनी या कार्यशाळेत भाग घेतला.

या कार्यशाळेमध्ये, विस्ट्रॉन, फॉक्सकॉन, सॅमसंग, डेल, विप्रो, जीई, डॉ.रेड्डीज, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, नोकिया सोल्युशन्स, आयटीसी, डाबर, जेएसडब्ल्यू तसेच रिलायन्स यांसारख्या प्रख्यात कंपन्यांच्या प्रतिनिधींचा गट उपस्थित होता.

सर्व उपस्थितांनी पीएलआय योजनांमध्ये सक्रियतेने सहभागी होण्याची आणि उपलब्ध अनुदानाचा त्यांच्या संपूर्ण क्षमतेने वापर करून घेण्याची सामुहिक वचनबद्धता व्यक्त केली त्यानंतर  या कार्यशाळेचा समारोप झाला.

कार्यशाळेमध्ये पीएलआय योजनांच्या यशाबद्दल चर्चा करण्यात आली.

विविध क्षेत्रांमध्ये देशांतर्गत मूल्यवर्धनामध्ये पीएलआय योजनांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1936071) Visitor Counter : 84