वस्त्रोद्योग मंत्रालय
कमी कार्बन उत्सर्जनासाठी योगदान आणि चक्राकार अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या शाश्वत कापड उद्योग क्षेत्रात भारत अग्रेसर आहे: केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल
भारतीय वस्त्रोद्योगाने आपल्या नाविन्यपूर्ण आणि आकर्षक उत्पादनांनी जगभरात ठसा उमटवला आहे: गोयल
क्लस्टर-आधारित दृष्टिकोन आणि योग्य चाचणी सुविधांसह दर्जेदार उत्पादनांमुळे पीएम मित्र पार्क लॉजिस्टिक खर्च कमी करतील : गोयल
Posted On:
26 JUN 2023 7:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जून 2023
कार्बन उत्सर्जन कमी राखण्यात योगदान देत आणि चक्राकार अर्थव्यवस्थेला चालना देत भारत शाश्वत वस्त्रोद्योगात अग्रेसर बनला आहे, असे केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योग तसेच ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे आज 69 व्या इंडिया इंटरनॅशनल गारमेंट फेअर (आयआयजीएफ) च्या उद्घाटन समारंभात त्यांनी मार्गदर्शन केले. भारतीय वस्त्रोद्योगाने आपल्या नाविन्यपूर्ण आणि आकर्षक उत्पादनांनी जगात ठसा उमटवला आहे, असे ते म्हणाले.
भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने देशातील 7 राज्यांमध्ये प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रीजन अँड अपेरल (पीएम मित्र) पार्कची स्थापना करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. योग्य चाचणी सुविधांसह दर्जेदार उत्पादन आणि उत्पादनाच्या क्लस्टर-आधारित दृष्टिकोनामुळे पीएम मित्र पार्क्स, लॉजिस्टिक खर्च कमी करतील असेही त्यांनी सांगितले. पीएम मित्र पार्क्स परिसरातल्या युनिट्सना देशांतर्गत मागणी तसेच निर्यात पूर्ण करण्यास मदत होणार असल्याने त्याचा स्थानिक फायदाही होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्योगांनी गुणवत्तेवर भर द्यावा आणि गुणवत्ता मानकांचे पालन करण्यासाठी त्यांच्या उत्पादनांची चाचणी घ्यावी असे आवाहन गोयल यांनी आपल्या भाषणात केले. चांगल्या दर्जाच्या उत्पादनांचे उत्पादन सुलभपणे करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी त्यांनी तरुणांना प्रेरित केले. वस्त्रोद्योग क्षेत्रात गुणवत्ता आणि व्यावसायिकता वाढवण्यावर आयआयजीएफने भर दिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
भारत विविध देशांसोबत सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार (सीइपीए) आणि मुक्त व्यापार करारांच्या (एफटीए) शक्यतांची चाचपणी करत आहे, असेही ते म्हणाले. या करारांचा उद्देश बाजारपेठांची व्याप्ती वाढवणे आणि भरभराट होत असलेल्या भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रातील निर्यातदारांना सुविधा देणे आहे, असे त्यांनी नमूद केले. भारताने नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करणे, निर्यात वाढवणे आणि वस्त्रोद्योगात वाढीच्या संधी निर्माण करणे हे या करारांचे उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले.
* * *
N.Chitale/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1935457)
Visitor Counter : 123