संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे जम्मू येथे प्रतिपादन


"सशस्त्र दलांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह सुसज्ज केले जात आहे"

“दहशतवाद कदापि खपवून घेतला जाणार नाही या आमच्या धोरणाने इतर देशांच्या धारणेतही घडवला बदल”

Posted On: 26 JUN 2023 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 जून 2023

 

राष्ट्रीय सुरक्षेला केंद्र सरकारचे  सर्वोच्च प्राधान्य असून  देशाचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता यांचे रक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. 26 जून 2023 रोजी जम्मू येथे आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय सुरक्षा परिषदे’ला संबोधित करताना ते बोलत होते. गेल्या 9 वर्षांच्या काळात भारताच्या संरक्षण विषयक चित्रात फार आमूलाग्र परिवर्तन झाले आहे. कुरापती  रोखता न येणारा  एक दुर्बल देश अशी 2013-14 मध्ये भारताची प्रतिमा होती, मात्र आज  कोणत्याही धोक्याचा सामना करण्याची आणि त्यावर मात करण्याची क्षमता देशामध्ये आहे याकडे राजनाथ सिंह यांनी निर्देश केला.

राष्ट्रीय सुरक्षेच्या आराखड्या बाबत तपशीलवार माहिती देताना संरक्षणमंत्री म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपले सरकार पुढील चार दिशादर्शक तत्वांवर काम करत आहे- देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्व यांना धोका निर्माण करणाऱ्या शक्तींचा मुकाबला करण्यासाठी देश  सक्षम करणे,राष्ट्रीय हिताचे संरक्षण करण्यासाठी करण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक कृती करणे, प्रगतीचा मार्ग सुकर होण्यासाठी देशात सुरक्षित परिस्थिती निर्माण करणे,देशातील जनतेचे जीवनमान सुधारणे तसेच त्यांच्या आकांक्षा पूर्ण करणे आणि दहशतवादासारख्या जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी मित्र देशांसोबत एकत्र येऊन योग्य वातावरण निर्माण करणे.

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की आपल्या सशस्त्र दलांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सुसज्ज केले जात आहे; ही दले देशाच्या सीमा आणि सागरकिनारे यांचे संरक्षण करण्यास संपूर्णपणे सज्ज आहेत अशी ग्वाही त्यांनी दिली. “जगातील आधुनिक लष्करांमध्ये आपल्या सशस्त्र दलांना आघाडीवर ठेवणे हे आमचे उद्दिष्ट आहे,” ते म्हणाले.

“बऱ्याच काळापासून पाकिस्तानने सीमेपलीकडून केल्या जाणाऱ्या दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून देशाची शांतता आणि सौहार्द यांना अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, जेव्हा आम्ही सत्तेत आलो, तेव्हा आम्ही, दहशतवादाविरुद्ध प्रभावी कारवाई केली. ‘दहशतवादाला  जराही थारा न देणारे धोरण म्हणजे काय हे आपण जगाला दाखवून दिले आहे.” ते म्हणाले.

केंद्रीय मंत्र्यांनी पुढे सांगितले की सरकारने उचललेल्या कठोर आणि सातत्यपूर्ण पाऊलांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादाचे जाळे खिळखिळे झाले आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यासंदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की या निर्णयामुळे, जम्मू काश्मीरमधील जनतेला देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडून घेण्यात यश आले आहे. तसेच, त्यांना शांती आणि प्रगतीच्या नव्या युगामध्ये प्रवेश करण्यासाठी मदत करता आली आहे.

पाकव्याप्त काश्मीर संदर्भात  बोलताना, राजनाथ सिंह म्हणाले की, पाकिस्तानने बेकायदेशीरपणे या भागावर कब्जा केल्याने यासंदर्भात  हस्तक्षेप करण्याचे पाकिस्तानला कोणतेही अधिकार नाहीत .पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे हे सांगणारे किमान तीन ठराव भारतीय संसदेने एकमताने मंजूर आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

संवादाच्या माध्यमातून आणि अत्यंत शांततापूर्ण पद्धतीने सीमा प्रश्न सोडवण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधा बळकट करणे आणि संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भर’ होणे यांसह राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी देण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या उपाययोजनांची केंद्रीय मंत्र्यांनी थोडक्यात माहिती दिली.

ते म्हणाले, “मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ हे आपले उद्दिष्ट आहे. आपल्या प्रयत्नांना आता यश येते आहे. आज, आपण रणगाडे, विमानवाहू जहाजे, पाणबुड्या तसेच विविध प्रकारची अस्त्रे यांचे उत्पादन करत आहोत. वर्ष 2014 मध्ये केवळ 900 कोटी रुपये असलेल्या संरक्षण सामग्रीच्या निर्यातीने 16,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. ही निर्यात लवकरच 20,000 कोटी रुपयांचा टप्पा पार करेल.”

केंद्र सरकारने हाती घेतलेल्या संरचनात्मक सुधारणांची देखील त्यांनी गणना केली.

जागतिकीकरण झालेल्या या विश्वात, भारताच्या सुरक्षाविषयक हिताचे संरक्षण करण्यासाठी अमेरिका तसेच रशिया यांसारख्या प्रमुख महासत्तांशी समन्वय साधण्याचे महत्त्व केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केले.

जागतिक पातळीवरील धोके आणि आव्हाने यांचा सामना करण्यासाठी एकत्रित आणि सामुहिक प्रतिसादाची गरज त्यांनी व्यक्त केली.

अमेरिकेकडून एमक्यू-9 बी या प्रकारच्या ड्रोन्सची खरेदी करताना त्यांची किंमत आणि इतर अटी यासंदर्भात व्यक्त करण्यात आलेल्या अटकळी  फेटाळून लावत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की केंद्रीय संरक्षण मंत्रालय जनरल अॅटोमिक्स (जीए)या कंपनीने इतर देशांना जी किंमत सांगितली आहे त्यांची तुलना करून पुढील व्यवहार ठरवेल.सुस्थापित खरेदी प्रक्रियेचे पालन करुनच ड्रोन खरेदी केली जाईल असा शब्द त्यांनी दिला.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1935445) Visitor Counter : 151