अर्थ मंत्रालय
जी-20 च्या पायाभूत सुविधा कार्यगटाची तिसरी बैठक 26-28 जून 2023 दरम्यान ऋषिकेश इथे होणार
Posted On:
25 JUN 2023 5:53PM by PIB Mumbai
भारताच्या जी-20 अध्यक्षपदाअंतर्गत, जी-20 पायाभूत सुविधा कार्यगटाची तिसरी बैठक, 26 ते 28 जून 2023 दरम्यान उत्तराखंडच्या ऋषिकेश इथे होणार आहे. जी-20 सदस्य गटांचे प्रतिनिधी, निमंत्रित देशांचे प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी असे एकूण 63 प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतील. या बैठकीत, पायाभूत सुविधा अजेंडयावर तसेच याआधी, मार्च महिन्यात विशाखापट्टणम इथे झालेल्या दुसऱ्या बैठकीतील विषयांवर पुढची चर्चा होईल.
जी-20 पायाभूत सुविधा कार्यगट पायाभूत सुविधांशी संबंधित गुंतवणूक, ज्यात, देशाची संपत्ती म्हणून पायाभूत सुविधा विकसित करणे, उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करणे आणि पायाभूत गुंतवणुकीसाठीचे वित्तीय स्त्रोत निर्माण करण्यासाठी अभिनव मार्गांचा शोध घेणे, अशा विविध विषयांचा समावेश राहील. या पायाभूत सुविधा कार्यगटातील चर्चेचे निष्कर्ष जी-20 वित्तीय ट्रॅक प्राधान्यक्रमांमधे समाविष्ट केले जातात तसेच पायाभूत सुविधा विकासाला यामुळे चालनाही मिळते.
पायाभूत सुविधा कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीत, 2023 च्या पायाभूत सुविधा अजेंडयानुसार, विविध कार्यप्रवाहांवर चर्चा केली जाईल. यात पहिले प्राधान्य, “भविष्यातील शहरांना वित्तपुरवठा : सर्वसमावेशक, लवचिक आणि शाश्वत” या संकल्पनेसह इतर प्राधान्यक्रमांवरही चर्चा होईल.
या तीन दिवसीय बैठक सत्रात, विविध औपचारिक बैठका आणि प्रतिनिधींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. या औपचारिक चर्चासत्रासोबतच, सर्व प्रतिनिधी, ऋषिकेशची समृद्ध संस्कृती आणि सुंदर निसर्गदृश्यांचा अनुभव घेतील. तसेच, 28 जून रोजी दुपारी प्रतिनिधींसाठी सहलीचेही आयोजन केले आहे.
पायाभूत सुविधा कार्यगट बैठकीदरम्यान, दोन इतर कार्यक्रमांचे देखील नियोजन केले गेले आहे. 26 जून रोजी आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेच्या संयुक्त विद्यमाने “शहरांच्या शाश्वत विकासासाठीचा आराखडा ” या उच्चस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीतील तीन सत्रांमधे G20 निर्णयकर्त्यांना तंत्रज्ञान, इन्फ्रा-टेक आणि डिजिटायझेशनच्या भूमिकेचा शोध घेण्यासह हवामान बदलाच्या संकटापासून संरक्षित राहू शकतील अशा लवचिक पायाभूत सुविधांची उभारणी , जलद शहरीकरण आणि सर्वसमावेशकता अशा विविध आव्हांनांवर चर्चा होईल. इंडोनेशियातील नियोजित शहर, ‘नुसंतारा’ जे जगातील सर्वात मोठे महत्त्वाकांक्षी शहर मानले जाते, ते विकसित करण्यातल्या अनुभव आणि त्यामागचा विशिष्ट दृष्टिकोन देखील प्रतिनिधींना या वेळी ऐकता येईल. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञ या बैठकीत सहभागी होणार आहेत.
27 जून रोजी, ‘भारताला एमआरओ म्हणजेच देखभाल,दुरुस्ती संदर्भातले केंद्र बनवण्याबाबतच्या विषयावर एक गोलमेज परिषद होईल. यात, एमआरओ क्षेत्रात भारताला असलेल्या संधींवर चर्चा होईल. प्रतिनिधींसाठी “रात्री भोज पर संवाद’ चेही आयोजन केले गेले असून, त्यावेळी त्यांना उत्तराखंडच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल. 26 जून 2023 रोजी प्रतिनिधींना "योग रिट्रीट" कार्यक्रमाद्वारे भारताची योगसंस्कृतीही अनुभवता येईल.
***
N.Chitale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1935239)
Visitor Counter : 165