गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी सांबा येथे केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेची केली पायाभरणी तसेच जम्मूमध्ये विविध विकास योजनांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी
अमित शाह यांनी त्रिकुट नगर येथे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना वाहिली श्रद्धांजली
मोदी सरकारने आर्थिक विकासासाठी विविध औद्योगिक धोरणे, चित्रपटासाठी नवीन धोरण, पर्यटनाला चालना देण्यासाठी होम स्टे आणि हाऊस बोट धोरण आखले आहे, परिणामी जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणूक वाढत आहे आणि पर्यटकांची संख्याही सातत्याने वाढत आहे
अमेरिकेने भारताच्या पंतप्रधानांना राज-अतिथीचा सन्मान दिला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला हा सन्मान आजपर्यंत कोणालाही देण्यात आलेला नाही
भारत आणि अमेरिका यांच्यात अंतराळ, संरक्षण, सेमीकंडक्टर या क्षेत्रात करार होत आहेत आणि अनेक मोठ्या कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत
Posted On:
23 JUN 2023 5:19PM by PIB Mumbai
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज जम्मू येथील सांबा येथे केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेची (सीएफएसएल) पायाभरणी केली आणि विविध विकास योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. तत्पूर्वी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त अमित शाह यांनी त्रिकुट नगर येथे त्यांना श्रद्धांजली वाहिली. सीएफएसएल , सांबा आणि विविध विकास योजनांच्या उद्घाटन आणि पायाभरणी प्रसंगी जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात अमित शाह म्हणाले की, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान , धैर्य आणि निर्धारामुळे जम्मू आणि काश्मीर भारताशी जोडले गेले आहे आणि कलम 370 रद्द करण्यात आले आहे. ते म्हणाले की, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी कलम 370 समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाच्या निषेधार्थ 1953 मध्ये उद्योग आणि पुरवठा मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. या देशात दोन विधान, दोन निशान, दोन प्रधान चालणार नाहीत असे त्यांनी ठणकावून सांगितले होते. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे स्वप्न पूर्ण करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द केले असे शाह म्हणाले.
आज जम्मूमध्ये सुमारे 309 कोटी रुपये खर्चाच्या अनेक विकास योजनांची पायाभरणी करण्यात आली आहे असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. याअंतर्गत 100 कोटी रुपये खर्चून सीएफएसएल, 157.47 कोटी रुपये खर्चून रामबन आणि किश्तवाड येथे जल जीवन अभियानांतर्गत 41 पाणीपुरवठा योजना, 32.46 कोटी रुपये खर्चून दोडा बसस्थानकावर बांधण्यात येत असलेल्या बहुमजली पार्किंगचा समावेश आहे. त्याचबरोबर बक्षी नगर येथे 40.86 कोटी रुपये खर्चून बोन अँड जॉइंट रुग्णालय , 17.77 कोटी रुपये खर्चून ग्रीड स्टेशन आणि 25 कोटी रुपये खर्चून डोगरा चौक ते केसी चौक या सुधारित रस्त्याचेही उद्घाटन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जम्मू-काश्मीर विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहे, असे अमित शाह म्हणाले. गोल्डन हेल्थ कार्ड वाटपाचा कार्यक्रमही आज पार पडल्याचे त्यांनी सांगितले.
अलीकडेच श्रीनगरमध्ये G-20 शिखर परिषद यशस्वीरित्या पार पडली, असेही शाह यांनी सांगितले. या परिषदेत सहभागी झालेल्या अनेक देशांच्या नेत्यांनी काश्मीर मधील उत्तम पर्यटनाचा अनुभव घेतला आणि काश्मीरमधील सुधारलेल्या परिस्थितीचा हा अनुभव, त्यांच्यामार्फत संपूर्ण जगापर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा पंचायत राज व्यवस्था प्रस्थापित केली आहे, असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये गेली अनेक वर्षे तीन कुटुंबांनी राज्य केले. कलम 370 मुळे जम्मू-काश्मीरमध्ये विकास होऊ शकला नाही आणि दहशतवादामुळे 42,000 लोक मारले गेले. पण तरीही हे लोक म्हणतात की, आपण कलम 370 पाळले पाहिजे, पुन्हा आणले पाहिजे. केंद्रीय गृहमंत्री शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने जम्मू-काश्मीरमधील दहशतवादावर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे.
गेल्या 9 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचे काम केले आहे, असे अमित शाह म्हणाले. जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी भारत सरकारने विविध धोरणे आखल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवे जम्मू आणि काश्मीर उभारले जात आहे. पूर्वी या खोऱ्यातील तरुणांच्या हातात दगड असायचे, पण आता त्यांच्याकडे लॅपटॉप आहे. हे सुशिक्षित तरुण जम्मू-काश्मीर आणि देशाचे भविष्य घडवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 9 वर्षात केलेल्या प्रयत्नांमुळेच हा बदल शक्य झाला आहे. अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेने भारताच्या पंतप्रधानांना आपले राज अतिथी म्हणून म्हणून सन्मान दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जो सन्मान दिला गेला तो आजपर्यंत कोणालाही देण्यात आलेला नाही.
अंतराळ, संरक्षण, सेमीकंडक्टर या क्षेत्रात भारत आणि अमेरिका यांच्यात अनेक महत्त्वपूर्ण करार होत आहेत आणि अनेक मोठ्या कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत, असेही शाह यांनी सांगितले.
***
R.Aghor/S.Kane/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1934829)
Visitor Counter : 158