पंतप्रधान कार्यालय
G-20 शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश
Posted On:
22 JUN 2023 10:53AM by PIB Mumbai
मान्यवर मंडळी आणि बंधू भगिनींनो,
नमस्कार!
G-20 शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीसाठी मी आपणा सर्वांचे भारतात स्वागत करतो. शिक्षण हा केवळ आपल्या संस्कृतीचा पाया नाही तर मानवतेच्या भवितव्याचा शिल्पकारही आहे. सर्वांसाठी विकास, शांतता आणि समृद्धीसाठीच्या आमच्या प्रयत्नांमध्ये, शिक्षण मंत्री म्हणून तुम्ही सर्वजण, मानव जातीचे नेतृत्व करणारे शेर्पा आहात. भारतीय धर्मग्रंथांमध्ये ‘आनंद देते ते शिक्षण’ अशी शिक्षणाची भूमिका विषद केली आहे.
विद्या ददाति विनयं
विनयाद् याति पात्रताम्।
पात्रत्वात् धनमाप्नोति
धनाद्धर्मं ततः सुखम्॥
अर्थात “खरे ज्ञान हे नम्रता अंगी बाणवते. नम्रतेतून योग्यता येते, योग्यतेतून संपत्ती येते. संपत्ती माणसाला चांगली कर्मे करण्यास सक्षम करते आणि त्यातूनच आनंद मिळतो. म्हणूनच भारतात आम्ही शिक्षणाच्या सर्वसमावेशक आणि व्यापक प्रवासाला सुरुवात केली आहे. मूलभूत साक्षरता आमच्या युवा वर्गासाठी एक सक्षम पाया तयार करते, असा विश्वास आम्हाला वाटतो आणि आम्ही शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड सुद्धा देत आहोत. यासाठी आम्ही “नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग कॉम्प्रिहेन्शन अँड न्युमरसी” अर्थात “निपुण भारत” हा उपक्रम सुरू केला आहे. "मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र" या बाबींना तुमच्या गटाने सुद्धा प्राधान्य दिले आहे, याचा मला आनंद वाटतो. 2030 सालापर्यंत त्यावर कालबद्ध पद्धतीने काम करण्याचा संकल्प आपण केला पाहिजे.
आदरणीय मान्यवर,
उत्तम प्रशासनाबरोबरच दर्जेदार शिक्षण प्रदान करणे, हा आमचा उद्देश आहे. त्यासाठी आम्हाला अभिनव पद्धतीने नवीन ई-लर्निंगचा अवलंब करावा लागेल. त्यासाठी भारतात आम्ही अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. "स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह-लर्निंग फॉर यंग
एस्पायरिंग थॉट्स", किंवा स्वयम हा असाच एक कार्यक्रम आहे. या ऑनलाइन मंचावर इयत्ता नववीपासून पदव्युत्तर स्तरापर्यंतचे सर्व अभ्यासक्रम समाविष्ट आहेत. हा मंच विद्यार्थ्यांना दूरस्थ पद्धतीने शिक्षण घेण्यास सक्षम करतो आणि त्याचबरोबर प्रवेश, समानता आणि गुणवत्ता यावर लक्ष केंद्रित करतो. 34 दशलक्षापेक्षा जास्त नावनोंदणी आणि नऊ हजारपेक्षा जास्त अभ्यासक्रमांचा समावेश असणारा हा मंच, एक अतिशय प्रभावी शिक्षण माध्यम ठरला आहे. आमच्याकडे " डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग" अर्थात दीक्षा पोर्टल सुद्धा आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी तसेच नियमित वर्गांना उपस्थित राहू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा मंच उपयुक्त ठरतो आहे. दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून शालेय शिक्षण देण्यासाठी शिक्षक या मंचाचा वापर करतात. या मंचाच्या माध्यमातून 29 भारतीय आणि 7 परदेशी भाषांमधून शिक्षण प्रदान केले जाते आहे. या मंचावरून 137 दशलक्षापेक्षा जास्त अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आले आहेत. भारत देश , हा अनुभव आणि स्रोत, विशेषत: विकसनशील देशांतील लोकांशी आनंदाने सामायिक करेल.
आदरणीय मान्यवर,
आपल्या युवा वर्गाच्या भवितव्याला आकार देण्यासाठी आपल्याला कौशल्ये प्रदान करण्याबरोबरच, पुनर्कौशल्य आणि कौशल्ये अद्ययावत करण्याची आवश्यकता आहे. विकसित होत असलेल्या कामाच्या पद्धती आणि युवा वर्गाची क्षमता यांची सांगड घातली गेली पाहिजे. भारतात आम्ही स्किल मॅपिंगचे काम सुरू करत आहोत. शिक्षण, कौशल्य आणि कामगार ही आमची मंत्रालये या उपक्रमावर एकत्र काम करत आहेत. G-20 देश जागतिक स्तरावर कौशल्य मॅपिंग सुरू करू शकतात आणि ज्या त्रुटी दूर करण्याची आवश्यकता आहे, त्यांवर काम करू शकतात.
आदरणीय मान्यवर,
डिजिटल तंत्रज्ञान हे समकारक (इक्विलाइजर) म्हणून कार्य करते आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देते. डिजिटल तंत्रज्ञान हे शिक्षणात विद्यार्थी प्रवेश वाढवण्यासाठी तसेच भविष्यातील गरजांशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरते. आज कृत्रिम बुद्धिमत्ता, कौशल्य निर्मिती आणि शिक्षण क्षेत्रात अनंत संधी उपलब्ध आहेत. तंत्रज्ञान हे संधीबरोबरच अनेक आव्हाने सुद्धा निर्माण करते. आपल्याला योग्य संतुलन साधावे लागेल. या कामी G-20 देश महत्त्वाची भूमिका बजावू शकतील.
आदरणीय मान्यवर,
भारतातही आम्ही संशोधन आणि नवनिर्मितीवर भर दिला आहे. आम्ही देशभरात दहा हजार ‘अटल टिंकरिंग लॅब’ स्थापन केल्या आहेत. या प्रयोगशाळा आमच्या शाळेतील मुलांसाठी संशोधन आणि नवकल्पनांचे नंदनवन म्हणून काम करत आहेत. या प्रयोगशाळांमध्ये 7.5 दशलक्षाहून अधिक विद्यार्थी 1.2 दशलक्षाहून अधिक नाविन्यपूर्ण प्रकल्पांवर काम करत आहेत. G-20 देश, आपल्या संबंधित सामर्थ्याचा वापर करत, विशेषत: विकसनशील देशांमध्ये संशोधन आणि नवकल्पनांना चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. संशोधन सहकार्य वाढवण्यासाठी पुढे जाण्याचा मार्ग तयार करावा, अशी विनंती मी तुम्हा सर्वांना करतो.
आदरणीय मान्यवर,
आपल्या मुला-मुलींच्या आणि युवा वर्गाच्या भविष्याच्या दृष्टीने तुमची भेट खूप महत्त्वाची आहे. शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तुमच्या गटाने हरित परिवर्तन, डिजिटल परिवर्तन आणि महिला सक्षमीकरण हे प्रवेगक निश्चित केले आहेत, याचा मला मनापासून आनंद वाटतो. शिक्षण हा या सर्व प्रयत्नांचा गाभा आहे. हा गट सर्वसमावेशक, कृतीभिमुख आणि भविष्याच्या दृष्टीने उपयुक्त असा शैक्षणिक अजेंडा घेऊन येईल, असा विश्वास मला वाटतो. यामुळे वसुधैव कुटुंबकम अर्थात एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या खर्या भावनेतून संपूर्ण विश्व लाभान्वित होईल. तुमची बैठक फलदायी आणि यशस्वी व्हावी, यासाठी माझ्यातर्फे तुम्हा सर्वांना शुभेच्छा.
धन्यवाद.
***
R.Aghor/M.Pange/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1934752)
Visitor Counter : 134
Read this release in:
Assamese
,
Manipuri
,
Gujarati
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Nepali
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam