पंतप्रधान कार्यालय

जी 20 पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीला पंतप्रधानांनी केले संबोधित


"पर्यटनासंदर्भातील भारताचा दृष्टीकोन प्राचीन संस्कृत श्लोक 'अतिथी देवो भवः' वर आधारित असून त्याचा अर्थ 'अतिथी म्हणजे देवाचे रूप ' असा आहे’’

"पर्यटनासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करताना समृद्ध वारसा जतन करण्यावर पर्यटन क्षेत्रातील भारताचे प्रयत्न केंद्रित आहेत"

"गेल्या नऊ वर्षांत, आम्ही देशातील पर्यटनाची संपूर्ण व्यवस्था विकसित करण्यावर विशेष भर दिला "

“शाश्वत विकास उद्दिष्टे वेगाने साध्य करण्यासाठी भारत पर्यटन क्षेत्राची समर्पकता देखील निश्चित करत आहे”

"सरकार, उद्योजक, गुंतवणूकदार आणि शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्यामुळे पर्यटन क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीला गती मिळू शकते"

''दहशतवाद फूट पाडतो मात्र पर्यटन एकत्र आणते ”

"भारताच्या जी 20 अध्यक्षतेचे ब्रीदवाक्य, 'वसुधैव कुटुंबकम्' - 'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' हे जागतिक पर्यटनाचे ब्रीदवाक्य बनू शकते"

"लोकशाहीच्या जननीमध्ये आयोजित लोकशाहीच्या उत्सवाला अवश्य भेट द्या"

Posted On: 21 JUN 2023 6:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जून 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यात आयोजित जी 20 पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीला चित्रफितीच्या माध्यमातून संदेशाद्वारे संबोधित केले.

या बैठकीला संबोधित करताना  पंतप्रधानांनी अतुल्य भारताच्या भावनेचे आवाहन केले. जागतिक स्तरावर दोन ट्रिलियन डॉलर्सचे क्षेत्र हाताळत असले तरी पर्यटन मंत्र्यांना क्वचितच स्वतः पर्यटक होण्याची संधी मिळते, असे ते म्हणाले. जी 20 पर्यटन मंत्र्यांची बैठक, भारतातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या गोव्यात होत असल्याचे लक्षात घेऊन पंतप्रधानांनी मान्यवरांना त्यांच्या महत्वाच्या  चर्चेतून थोडा वेळ काढून गोव्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि आध्यात्मिक बाजू पाहण्याचे आवाहन केले.  

भारताचा पर्यटनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन प्राचीन संस्कृत श्लोक ‘अतिथी देवो भवः’ वर आधारित आहे, याचा  अर्थ ‘अतिथी म्हणजे देवाचे रूप ’ असा आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. पर्यटन म्हणजे केवळ प्रेक्षणीय स्थळे पाहणे नाही तर तो  एक विलक्षण अनुभव आहे यावर  मोदी यांनी  भर दिला.“संगीत असो वा खाद्यपदार्थ , कला असो किंवा संस्कृती, भारतातील विविधता खरोखरच ऐश्वर्य संपन्न आहे”, “उंच हिमालयापासून ते घनदाट जंगलांपर्यंत, कोरड्या वाळवंटापासून ते सुंदर समुद्रकिनारे, साहसी खेळांपासून ते ध्यान स्थळांपर्यंत, भारतामध्ये प्रत्येकासाठी काहीतरी आहे.”, असे पंतप्रधान म्हणाले. भारत आपल्या जी -20 अध्यक्षपदाच्या काळात देशभरातील 100 वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास 200 बैठका आयोजित करत आहे आणि प्रत्येक बैठकीच्या वेळी वेगळी अनुभूती देत आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. “  ज्यांनी या बैठकींसाठी यापूर्वी  भारताला भेट दिली आहे त्या   तुमच्या मित्रांना तुम्ही विचारा , मला खात्री आहे की कोणतेही दोन अनुभव सारखे नसतील,”  असे ते म्हणाले. 

पर्यटन क्षेत्रासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करताना भारताचे प्रयत्न समृद्ध वारसा जतन करण्यावर केंद्रित आहेत, असे पंतप्रधानांनी विशद केले. भारत जगातील प्रत्येक प्रमुख धर्माच्या यात्रेकरूंना आकर्षित करतो हे लक्षात घेऊन पंतप्रधानांनी आध्यात्मिक पर्यटनाच्या विकासावर भर दिला. वाराणसी हे प्राचीन काळापासून असलेले शहर प्रमुख आध्यात्मिक केंद्रांपैकी एक आहे. या शहरात पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्यामुळे यात्रेकरूंच्या संख्येत दहा पटीने वाढ झाली असून आजघडीला त्यांची संख्या 7 कोटी झाली आहे. भारत पर्यटनासाठी नवीन आकर्षणे निर्माण करत आहे हे त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीचे उदाहरण देऊन सांगितले. हा जगातील सर्वात उंच पुतळा असून अनावरण झाल्यानंतर एका वर्षातच सुमारे 2.7 दशलक्ष पर्यटक या स्थळाला भेट द्यायला आले असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या नऊ वर्षांत देशातील पर्यटनाची संपूर्ण परिसंस्था विकसित करण्यावर विशेष भर दिल्याचे त्यांनी सांगितले. "परिवहन पायाभूत सुविधांपासून ते आदरातिथ्य क्षेत्र ते कौशल्य विकासापर्यंत आणि व्हिसा प्रणालींमध्येही सुधारणांचा केंद्रबिंदू म्हणजे पर्यटन क्षेत्र आहे", असे मोदी म्हणाले. आदरातिथ्य क्षेत्रात रोजगार निर्मिती, सामाजिक समावेशकता आणि आर्थिक प्रगतीला मोठा वाव आहे आणि इतर क्षेत्रांच्या तुलनेत या क्षेत्रात महिला आणि तरुणांना अधिक रोजगार मिळतो. शाश्वत विकास उद्दिष्टे जलदगतीने साध्य करण्यासाठी पर्यटन क्षेत्राची समर्पकता भारत ओळखत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.

हरित पर्यटन, डिजिटलायझेशन, कौशल्य विकास, पर्यटन क्षेत्रातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि पर्यटन स्थळांचे व्यवस्थापन ही एकमेकांशी जोडलेली पाच प्राधान्य क्षेत्रे भारताच्या तसेच ग्लोबल साउथच्या प्राधान्यक्रमांना प्रतिबिंबित करतात यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संवर्धित वास्तव यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून नावीन्यता आणण्याची सूचना पंतप्रधानांनी यावेळी केली. भारतात बोलल्या जाणाऱ्या विविध भाषांचे त्वरित (रिअल टाईम) भाषांतर करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापराच्या दिशेने भारत काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार, उद्योजक, गुंतवणूकदार आणि शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्याने पर्यटन क्षेत्रात अशा तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीला गती मिळू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधानांनी पर्यटन कंपन्यांसाठी व्यावसायिक नियम सुलभ करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची तसेच त्यांना अर्थसाहाय्य मिळावता यावे आणि कौशल्य विकासामध्ये गुंतवणूक करता यावी यासाठी मदत करण्याची सूचना पंतप्रधानांनी केली.

“दहशतवाद विभाजित करतो, मात्र पर्यटन सगळ्यांना एकत्र आणते.” असे पंतप्रधान नरेंद्र यांनी म्हटले.  पर्यटनात समाजातील सर्व क्षेत्रातल्या, सर्व स्तरातल्या लोकांना एकत्रित आणण्याची आणि त्याद्वारे सौहार्दपूर्ण समाज निर्माण करण्याची क्षमता आहे, असे पंतप्रधान म्हणाले. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संस्थेच्या भागीदारीतून जी-20 पर्यटन डॅश बोर्ड विकसित केला जात असून, विविध देशांमधील उत्तम पद्धती, पर्यटनाशी संबंधित अध्ययन/अहवाल आणि प्रेरणादायक कथा एकत्रित आणणारा हा अशा प्रकारचा पहिलाच प्लॅटफॉर्म ठरेल, असे त्यांनी सांगितले. ह्या चर्चा आणि ‘गोवा आराखडा’ पर्यटनाच्या परिवर्तनात्मक शक्ती प्रत्यक्षात आणण्यासाठीच्या एकत्रित प्रयत्नांना कित्येक पटींचे बळ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “ भारताच्या जी-20 अध्यक्षपदाचे ब्रीदवाक्य, “वसुधैव कुटुंबकम’ म्हणजे एक पृथ्वी, एक कुटुंब असे आहे, हे ब्रीदवाक्यच भविष्यात जागतिक पर्यटनाचे ब्रीदवाक्य ठरू शकते.” असे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनीआपल्या भाषणात,  गोव्यात लवकरच होणाऱ्या साओ जोआओ महोत्सवाचा उल्लेख केला आणि म्हणाले की भारत हा उत्सवप्रिय देश आहे. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांचा संदर्भ देत पंतप्रधानांनी मान्यवरांना  जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा हा उत्सव बघण्याचे आवाहन केले. एक महिना चालणाऱ्या लोकशाहीच्या या उत्सवात कोट्यवधी मतदार सहभागी होतील आणि लोकशाही व्यवस्थेवरचा आपला विश्वास अधोरेखित करतील, असे ते म्हणाले. "देशभरात एक कोटीपेक्षा जास्त मतदान केंद्रे असतील. त्यामुळे तुम्हाला या महोत्सवाचे वैविध्य बघण्यासाठी जागा कमी पडणार नाहीत," पंतप्रधान म्हणाले. लोकशाहीचा महोत्सव बघण्यास येण्याचे आमंत्रण देऊन पंतप्रधानांनी आपले भाषण संपवले.

 

 

* * *

S.Bedekar/Sonal C/Radhika/Prajna/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1934160) Visitor Counter : 86