पर्यटन मंत्रालय

गोव्यात आज पर्यटनविषयक कृतिगटाच्या चौथ्या बैठकीला सुरुवात; दोन अनुषंगिक कार्यक्रमांचेही आयोजन


केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी यांनी क्रुझ पर्यटन आणि पर्यटन क्षेत्रातील प्लास्टिकची चक्राकार अर्थव्यवस्था या विषयांवरील अनुषंगिक कार्यक्रमांना केले संबोधित

क्रुझचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या 2015-16 मधल्या 1.26 लाखावरून वाढून 2019-20 मध्ये 4.68 लाखांवर पोहोचली : केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी

क्रुझ पर्यटन क्षेत्रामध्ये केवळ गोव्याच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्याची अमर्याद क्षमता आहे : केंद्रीय मंत्री श्रीपाद येसो नाईक

Posted On: 19 JUN 2023 8:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 जून 2023

 

केंद्रीय संस्कृती, पर्यटन आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री जी.के.रेड्डी आणि केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांच्या उपस्थितीत आज गोवा येथे दोन अत्यंत महत्त्वाच्या अनुषंगिक कार्यक्रमांच्या आयोजनासह जी-20 समूहाच्या पर्यटनविषयक कृतिगटाच्या चौथ्या बैठकीला सुरुवात झाली. गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खुंटे यांच्यासह केंद्रीय पर्यटन सचिव व्ही.विद्यावती या देखील यावेळी उपस्थित होत्या.

यावेळी आयोजित करण्यात आलेला पहिला कार्यक्रम ‘क्रुझ पर्यटनाला शाश्वत आणि जबाबदार प्रवासासाठीचा आदर्श नमुना म्हणून आकार देणे’  या संकल्पनेवर आधारित होता. क्रुझ पर्यटनावर आधारित कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय मंत्री जी,किशन रेड्डी म्हणाले की गोव्यामध्ये सूर्यप्रकाश, वाळू आणि समुद्र यांचा  परिपूर्ण संगम पाहायला मिळतो आणि प्रत्येकाने भारतातील या सुंदर राज्यातील पर्यटनाचा अनुभव घ्यायला हवा. गोव्यातील स्नेहार्द्र आणि मनोरंजनप्रेमी   लोक तजेलदार  संगीत आणि स्वादिष्ट भोजना सह जीवनाचा आनद घेतात असे त्यांनी सांगितले.

भारताला सात हजार पाचशे किलोमीटर लांबीचा किनारा लाभला आहे आणि त्यामुळे आपला देश सागरी क्षेत्रात आघाडीचा देश झाला असून  भारतीय सभ्यता आणि संस्कृती यांनी आशियावर  जो प्रभाव टाकला आहे त्यातून आपल्या समृद्ध सागरी इतिहासाचे दर्शन होते. यामध्ये आजच्या व्हिएतनाम मधील चंपा राज्य तसेच मोंबासा बंदरातून आफ्रिकेशी होणारा भारताचा व्यापार यांचा समावेश आहे.

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की,भारताचा प्रदीर्घ समुद्रकिनारा केवळ व्यापार करण्यासाठी आणि आपली निर्यात वाढवण्यासाठीचा प्रमुख मार्ग आहे असे नव्हे तर देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठीची मोठी संधी देखील आहे. भारताचे लांबलचक सागरकिनारे विविध बंदरे, नैसर्गिक समुद्रतट आणि सुंदर बेटांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग देखील पुरवतात असे त्यांनी सांगितले.

देशात क्रुझचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या वर्ष 2015-16 मध्ये 1.26 लाख होती त्यात वाढ होऊन 2019-20 मध्ये ती 4.68 लाखांवर पोहोचली यावर त्यांनी अधिक भर दिला. ते म्हणाले की क्रुझ पर्यटनासाठी वापरल्या जाणाऱ्या जहाजांची संख्या देखील 2015-16 मध्ये केवळ 128 होती ती 2019-20 मध्ये 451 वर पोहोचली आहे.

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, भारतीय क्रुझ पर्यटन करणे म्हणजे जीवनाच्या तणावापासून दूर जाऊन शांतता मिळवणे आणि नैसर्गिक वातावरणातून जीवनाचा अनुभव घेणे आहे. भारतीय क्रुझ पर्यटन क्षेत्र कुटुंबातील प्रत्येक सदस्याला काहीतरी देते  अनेक पिढ्यांच्या एकत्रित प्रवासाचा पर्याय शोधणाऱ्यांसाठी क्रुझ पर्यटन अधिक पसंतीचे ठरते असे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, आज 73% क्रूझ (सागरी पर्यटन) प्रवासी कुटुंबातील सदस्यांसह प्रवास करत असून, ते किमान दोन पिढ्यांचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी असेही सांगितले की, पर्यटन मंत्रालय, केंद्रीय आर्थिक सहाय्य योजनेद्वारे, बंदरे आणि क्रूझ टर्मिनलचा विकास, दीपगृहांचा विकास, प्रवासी बोटींची खरेदी, रिव्हर  क्रूझ सर्किट्सचा विकास, यासाठी पर्यटन पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सहाय्य करत आहे.

ते पुढे म्हणाले की, बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय क्रूझ प्रवासी आणि समुद्रपर्यटन जहाजांसाठी समर्पित टर्मिनल विकसित करण्याच्या दिशेने देखील काम करत आहे.

जी के रेड्डी यांनी असेही सांगितले की पर्यटन मंत्रालय आणि नौवहन मंत्रालयाने एकत्र येऊन, क्रूझ पर्यटनासाठी एक समर्पित कृती दल गठित केले आहे. 

सागरी हवाई सेवेचे परिचलन सुधारण्यासाठी  16 ठिकाणी वॉटरड्रोम, अर्थात सागरी विमानतळ विकसित केले जात आहेत आणि 2023 पर्यंत निवडक बंदरांवर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल विकसित करण्याचे देखील उद्दिष्ट आहे.

ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकार भारतातील क्रूझ पर्यटनाला चालना देण्यासाठी बंदरांचे श्रेणी सुधारणा आणि आधुनिकीकरण, बंदर शुल्काचे सुसूत्रीकरण , प्रवासी जहाजांना प्राधान्याने बर्थिंग (नांगरणी) प्रदान करणे, ई-व्हिसा सुविधा प्रदान करणे इत्यादीसाठी काम करत आहे.

चौपाटी पर्यटन,दीपगृह पर्यटन, आणि क्रूझ पर्यटनाद्वारे किनारी  पर्यटनाला चालना दिल्याने मासेमारी करणार्‍या समुदायांसारख्या समुदायांना उपजीविकेच्या इतर संधी उपलब्ध होतील आणि त्यांच्या उत्पन्नात भर पडेल, असे जी किशन रेड्डी यांनी सांगितले. ते म्हणाले की,  भारत सरकारने 75 पेक्षा जास्त दीपगृहांच्या जवळच्या क्षेत्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी  एक कार्यक्रम आखला आहे.

सरकारने नमामि गंगे मिशनच्या माध्यमातून 4.3 अब्ज अमेरिकी डॉलर्स पेक्षा जास्त, म्हणजे 35,414 कोटी रुपये खर्च केले असून, स्वच्छ नद्यांमुळे क्रूझ पर्यटनासारख्या उपक्रमांना चालना मिळेल, असे त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी श्रीपाद येसो नाईक म्हणाले की, या कार्यक्रमाने क्रूझ पर्यटनामधील अफाट क्षमतेवर आणि त्याच्या जगभरातील कामगिरीवर प्रकाश टाकला आहे. गोवा  हे स्थान बॅकपॅकर्सपासून ते  अलिशान प्रवाशांपर्यंत, सर्वांसाठी भरभरून देते  असेही त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, गोव्यामधील वास्तुकला हे चित्ताकर्षक पोर्तुगीज बंगले आणि आधुनिक हॉटेल्स यांचा मिलाफ आहे.गोवा कार्निव्हल, सनबर्न फेस्टिव्हल यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर   प्रसिद्ध महोत्सवांसाठीही गोवा राज्य ओळखले जाते. त्यामुळे जगभरातील पर्यटक गोव्याकडे आकर्षित होतात. गोव्याच्या समृद्ध वारशाचे दर्शन या महोत्सवांतून घडते आणि त्यामुळे पर्यटकांना अविस्मरणीय अनुभव मिळतो. समुद्रपर्यटनाच्या अपर क्षमता  फक्त गोव्यासाठी नव्हे तर  संपूर्ण देशातील पर्यटन व्यवसायात रोजगाराच्या संधी पुरवतात, कर महसूलात भर आणि आर्थिक विकासाला हातभार लावतात.

कार्यक्रमादरम्यान आज  केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांच्या उपस्थितीत पर्यटन मंत्रालयाने एअरबीएनबीशी सामंजस्य (एअर बेड अँड ब्रेकफास्ट सेवा) करार केला.

‘पर्यटन क्षेत्रात प्लास्टिकच्या चक्राकार अर्थव्यवस्थेकडे  वाटचाल करणारी अर्थव्यवस्था विकसित करण्यासाठी जागतिक पर्यटन उपक्रम’ या संकल्पनेवर आधारित दुसरा एक कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला होता.पृथ्वी ही आपली माता आहे आणि आपण तिची लेकरे आहोत, असे अथर्व वेदात म्हटल्याचे  रेड्डी यांनी आपल्या भाषणात सांगितले.

भारतीय तत्त्वज्ञान आणि जीवनशैलीची मुळे नेहमीच निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याच्या संकल्पनेत रुजलेली आहेत. आपल्या संस्कृतीत शाश्वतता आणि पर्यावरण संरक्षण हा आचारविचाराचा अविभाज्य भाग आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या नऊ वर्षांत भारत शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाला पाठिंबा देणारे  जागतिक नेतृत्व  म्हणून उदयास आला आहे, असे ते म्हणाले.

जागरूक आणि दायित्व असलेल्या  आदरातिथ्यासाठी शाश्वतता महत्त्वाची प्रेरणा आहे आणि जेव्हा आपण शाश्वत पर्यटनाविषयी बोलतो तेव्हा प्रथम लोक आणि पृथ्वी, पर्यटन स्थळांना कार्बनमुक्त करणे तसेच व्यावसायिकांचे सक्षमीकरण याला प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी सुचवले.

ते पुढे म्हणाले की,  भारतात अंदाजे 30,000 युवा पर्यटन  क्लब आहेत. विशेष म्हणजे अशा क्लबचे सदस्य  इयत्ता  चौथीमधील मुलांपासून  ते महाविद्यालयीन युवकांपर्यंत आहेत. असे क्लब अतिशय जबाबदारीने चालवले जात असल्यामुळे  पर्यटनविषयक उपक्रमांना  चालना मिळेल. तसेच  शाश्वत पर्यटनामध्‍ये  रस निर्माण होईल.  ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ आणि ‘देखो अपना देश’ या उपक्रमांवर भर दिला जाईल.  

पर्यटन मंत्रालयाने शाश्वत पर्यटन आणि स्वदेश दर्शन 2.0 उपक्रमाने पर्यटन क्षेत्रात प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे घालून दिल्याची माहिती त्यांनी दिली.  

जी- 20 देशांनी एकत्रितपणे ‘सजग आणि शाश्वत वापर’ या तत्त्वांसह प्लास्टिकचा वापर  कमी करण्यामध्‍ये  योगदान देण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असे आवाहनही त्यांनी केले.

दुसऱ्या जोड कार्यक्रमात पर्यटन क्षेत्रातील प्लास्टिक प्रदूषणाची दखल घेण्यासाठी केंद्रीय नोडल एजन्सी, शाश्‍वत पर्यटन, आरटीएसओआय  आणि पंजाब पर्यटन मंडळ यांच्यात केंद्रीय मंत्री  जी. किशन रेड्डी  यांच्या उपस्थितीत यावेळी सामंजस्य करार करण्यात आला.

जी-20 बैठकीबरोबरीने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्‍ये समूह चर्चा झाली. यामध्‍ये अनुभवांची देवाणघेवाण, कार्याची सर्वोत्तम पद्धती,  कार्यासाठी  शिफारसी, तसेच पुढील  वाटचालीविषयी माहिती आणि भागीदारी वाढवल्‍यामुळे होणारा लाभ, यावर  पॅनेल चर्चेचे आयोजन केले.क्रूझ पर्यटनमध्‍ये स्त्री-पुरुष समतोल  , क्रूझ पर्यटनाचे केंद्र म्हणून भारताचा विकास आणि क्रूझ पर्यटनवर जागतिक दृष्टीकन  या विषयावर विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी गोवा पर्यटनाने ‘पर्ल ऑफ द ओरिएंट’ या सादरीकरणातून  गोव्याच्या पर्यटनाची अनोखी  वैशिष्ट्ये आणि या क्षेत्रामध्ये  असलेल्या क्षमता यावर प्रकाश टाकला.

 

* * *

N.Chitale/Sanjana/Rajshree/Prajna/Suvarna/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1933499) Visitor Counter : 125