आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, माता, नवजात, बाल आरोग्यासाठी भागीदारी (PMNCH), जिनेव्हा यांच्या सहयोगाने G20 अंतर्गत किशोरवयीन आणि युवा आरोग्य आणि कल्याण या विषयावर आयोजित एका कार्यक्रमाचे केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय करणार उद्घाटन


केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, अनुराग ठाकूर, डॉ. भारती प्रवीण पवार आणि प्रा. एस. पी. सिंह बघेल उपस्थित राहणार

Posted On: 19 JUN 2023 7:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 जून 2023

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने, 20 जून 2023 रोजी नवी दिल्ली येथे माता, नवजात, बाल आरोग्यासाठी भागीदारी (PMNCH), जिनेव्हा, यांच्या सहयोगाने 'हेल्थ ऑफ यूथ-वेल्थ ऑफ नेशन', अर्थात तरुणांचे आरोग्य-राष्ट्राची संपत्ती हा G20 अंतर्गत सह-ब्रँडेड कार्यक्रम आयोजित केला आहे. जगभरातील 1.8 अब्ज पौगंडावस्थेतील  मुले आणि तरुणांच्या आरोग्य आणि कल्याणाची गरज अधोरेखित करणे आणि किशोरवयीन आणि तरुणांच्या आरोग्याबाबत G20 देशांचे लक्ष आणि गुंतवणुकीला चालना देणे, हे या जागतिक मेळाव्याचे उद्दिष्ट आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय या कार्यक्रमाचे उद्घाटन करतील आणि बीजभाषण देतील. शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री, धर्मेंद्र प्रधान, माहिती आणि प्रसारण आणि क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री, अनुराग ठाकूर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, प्रा. एस. पी. सिंह बघेल, आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार देखील यावेळी उपस्थित राहतील, आणि युवकांसमोरील आव्हाने आणि या आव्हानांना तोंड देण्यासाठी आवश्यक भविष्यातील रणनीती तसेच  युवकांचे आरोग्य आणि कल्याण यासाठी सरकार करत असलेले प्रयत्न यावर त्यांचे विचार मांडतील. दक्षिण आफ्रिकेचे आरोग्य मंत्री डॉ. मथुम जोसेफ 'जो' फाहला हे देखील उद्घाटन सत्राला संबोधित करतील आणि उपस्थित तज्ञांसमोर आपला दृष्टीकोन मांडतील.

जगात 10 ते 24 वयोगटाची 1.8 अब्ज लोकसंख्या असून, यामधील सर्वात जास्त युवा लोकसंख्या भारतामध्ये आहे. ही युवा लोकसंख्या कोणत्याही देशासाठी मोलाची असून, आर्थिक वृद्धी आणि विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांचे आरोग्य आणि कल्याण यामधील गुंतवणूक महत्वाची ठरते. युवा लोकसंख्येच्या लाभांशाचे  महत्व लक्षात घेऊन, या  कार्यक्रमात  किशोरवयीन मुले आणि तरुणांचे आरोग्य आणि कल्याण यामधील गुंतवणुकीच्या गरजेवर भर दिला जाईल. तरुणांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणारा, आणि सर्वांसाठी शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याण सुनिश्चित करण्याचा दृष्टीकोन असलेला  हा कार्यक्रम, आर्थिक वृद्धी आणि विकासासाठी भारतातील तरुणांच्या क्षमतांचा उपयोग करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन आणि वचनबद्धतेशी सुसंगत आहे.   

तरुणांना समाजात परिवर्तन घडवण्यासाठी सक्षम बनवणे, यासह धोरणकर्ते, सरकारी अधिकारी, तज्ञ, भागीदार संस्था आणि G20 राष्ट्रांमधील युवा नेत्यांमध्ये संवाद आणि गुंतवणूक वाढवणे हे  कार्यक्रमाच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांपैकी जवळजवळ एक तृतीयांश प्रतिनिधी भारताच्या विविध भागांतील आणि इतर G20 देशांमधील तरुण असतील. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे आरोग्य आणि कल्याणाबाबत त्यांनी व्यक्त केलेले प्रश्न जाणून  त्यांचे विचार आणि मागण्यांना भविष्यातील धोरण आणि कार्यक्रम अंमलबजावणीमध्ये स्थान मिळेल.

या कार्यक्रमात किशोरवयीन मुलांचे आरोग्य आणि कल्याण आणि तरुणांच्या सहभागासाठी बहु-क्षेत्रीय भागीदारी यावर लक्ष केंद्रित करणारी दोन तांत्रिक सत्रे असतील.

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1933480) Visitor Counter : 91