राष्ट्रपती कार्यालय

भारताच्या राष्ट्रपतींनी दुंडीगल येथील वायूसेना अकादमीत केली संयुक्त पदवी संचलनाची पाहणी

Posted On: 17 JUN 2023 3:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जून 2023

 

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज हैदराबादमध्ये दिंडीगुल येथील वायूसेना अकादमीमध्ये संयुक्त पदवी संचलनाची पाहणी केली.

यावेळी, आपला अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या छात्रांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की त्यांची कारकीर्द आव्हानात्मक, कामाचे समाधान आणि उच्च सन्मान देणारी आहे. भारतीय वायूसेनेमध्ये ज्यांनी यापूर्वी सेवा केली आहे त्यांचा महान वारसा चालवण्याची जबाबदारी या छात्रांवर आहे, असे त्या म्हणाल्या. ‘नभम् स्पृशम् दीप्तम्’ म्हणजे आकाशाला स्पर्श करणारी वैभवशाली भरारी घ्या, हे भारतीय वायूसेनेचे घोषवाक्य अतिशय प्रेरणादायी आहे, असे त्यांनी सांगितले. हे छात्र, या घोषवाक्याची भावना आपल्यामध्ये बिंबवतील आणि त्यांच्याकडून देशाला असलेल्या अपेक्षा पूर्ण करतील, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.  

आक्रमक शेजारी राष्ट्रासोबत 1948, 1965 आणि 1971 च्या युद्धात देशाचे रक्षण करताना भारतीय वायूसेनेच्या शूर योद्ध्यांनी बजावलेल्या महान कामगिरीची गाथा सुवर्णाक्षरात लिहिली जाईल, असे राष्ट्रपतींनी सांगितले. या वीरांनी हाच निर्धार आणि कौशल्य यांचे दर्शन कारगील संघर्षादरम्यान आणि नंतर बालाकोटमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करताना घडवले, असे त्या म्हणाल्या. त्यामुळे भारतीय वायूसेनेचा ‘व्यावसायिकता, समर्पित वृत्ती आणि त्याग यांचा महान वारसा असलेले दल’ असा लौकिक आहे. भारतीय वायूसेना मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारणातही योगदान देत आहे, असेही राष्ट्रपतींनी नमूद केले. अलीकडेच भारतीय वायूसेनेने तुर्की आणि सीरियातील भूकंपाच्या काळात वैद्यकीय मदत पोहोचवण्यासाठी आणि आपत्ती निवारणासाठी वाईट हवामानातही तातडीने उड्डाणे केली. त्यापूर्वी काबूलमध्ये अडकलेल्या 600 पेक्षा जास्त भारतीयांना विमानाने मायदेशी आणण्यासाठी अतिशय धोकादायक परिस्थिती असलेल्या भागात विमाने उतरवली आणि उड्डाणे करून बचाव मोहीम राबवली. भारतीय वायूसेनेच्या उच्च क्षमतेचा हा दाखला आहे, अशा शब्दात त्यांनी भारतीय वायूसेनेची प्रशंसा केली.   

भूमी, सागर आणि आकाश या तिन्ही ठिकाणी संरक्षण सज्जतेकरता तंत्रज्ञानाचा अंगिकार वेगाने करणे अतिशय गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या. संरक्षण दलातील प्रत्येक अधिकाऱ्याने संरक्षण सज्जतेचा एक एकात्मिक दृष्टीकोन नेहमी लक्षात ठेवला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. नेटवर्क केंद्रीत भविष्यकालीन युद्ध अवकाशात उच्च तंत्रज्ञानावर आधारित युद्धांच्या आव्हानांसह एकंदर सुरक्षाविषयक स्थिती विचारात घेऊन सदैव तत्पर राहण्यासाठी वायूसेना उचलत असलेल्या पावलांबाबत राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केले.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

 

* * *

M.Pange/S.Patil/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1933034) Visitor Counter : 124