संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ‘संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरता’ या विषयावरील संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीची बैठक


राष्ट्रीय सुरक्षा बळकट  होत असून सशस्त्र दले तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक होत आहेत : केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह

Posted On: 16 JUN 2023 1:18PM by PIB Mumbai

 

कर्नाटकातील बंगळुरू येथे 16 जून 2023 रोजी  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरताया विषयावरील संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीदरम्यान, संसदेच्या दोन्ही सभागृहातील समितीच्या सदस्यांना, संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतासाध्य करण्यासाठी  संरक्षण मंत्रालयाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल आणि घेतलेल्या निर्णयांमुळे आतापर्यंत झालेल्या प्रगतीबद्दल माहिती देण्यात आली.

सतत विकसित होत असलेल्या जागतिक परिदृश्यामध्ये उद्भवणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी देशाची सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने आणि सशस्त्र दलांना तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक करण्यासाठी सरकार करत असलेले निरंतर प्रयत्न संरक्षण मंत्र्यांनी अधोरेखित केले. आत्मनिर्भरता सुनिश्चित करण्यासाठी मागणीसंदर्भातली स्वतःची क्षमता ही सर्वात महत्त्वाची बाब असल्याचे सांगत, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. या उद्दिष्टा मध्ये भांडवली खर्चासह संरक्षण आर्थिक तरतुदीत सातत्याने  वाढ; आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देशांतर्गत उद्योगासाठी विक्रमी 75 टक्के संरक्षण भांडवल खरेदी खर्चाची तरतूद आणि सकारात्मक स्वदेशीकरण याद्या जारी करणे याचा समावेश आहे.

सरकारच्या निर्णयांचे फलित प्राप्त होऊ लागले असून आज देश स्वदेशी पाणबुड्या, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि शस्त्रास्त्रे बनवत आहे, असे प्रातिपादन राजनाथ सिंह यांनी केले. वाढत असलेला संरक्षण उद्योग केवळ देशांतर्गत गरजाच भागवत नाही, तर मित्र देशांच्या सुरक्षा गरजाही पूर्ण करत आहे, असे ते म्हणाले. गेल्या आर्थिक वर्षात आपल्या  संरक्षण उत्पादनाने  एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आणि निर्यात 16,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. संरक्षण क्षेत्र आणि संपूर्ण देश योग्य मार्गावर वाटचाल करत असल्याची ही साक्ष आहे, असे ते म्हणाले.

संपूर्ण आत्मनिर्भरतेचे ध्येय गाठण्यासाठी विचारसरणीची पर्वा न करता सर्व स्तरातून नेहमीच एकमत राहिले आहे, या वस्तुस्थितीचे संरक्षण मंत्र्यानी कौतुक केले. जर आपल्याला भारताला आयातदार ऐवजी संरक्षण निर्यातदार बनवायचे असेल, तर आपण राष्ट्र प्रथम’  या संकल्पनेसह प्रत्येक परिस्थितीत एकत्र उभे राहिले पाहिजे. तरच आपल्याला आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साध्य करता येईल, असे त्यांनी सांगितले.

या बैठकी दरम्यान समितीच्या सदस्यांनी केलेल्या मौल्यवान सूचनांना दाद देत या सूचना अंतर्भूत करण्याचा प्रयत्न केला जाईल,असे त्यांनी सांगितले.

संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट; चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान; संरक्षण सचिव गिरीधर अरमाने; सचिव (माजी सैनिक कल्याण) विजय कुमार सिंह आणि संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ समीर व्ही कामत हे देखील बैठकीला उपस्थित होते.

***

S.Tupe/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1932889) Visitor Counter : 147