महिला आणि बालविकास मंत्रालय
लहान मुलांना व्यसनमुक्त करत भारताला तंबाखू आणि अंमली पदार्थमुक्त राष्ट्र बनवण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडून "व्यसनमुक्त अमृत काळ" ही राष्ट्रीय मोहीम सुरू
प्रविष्टि तिथि:
07 JUN 2023 12:02PM by PIB Mumbai
जागतिक तंबाखू दिनानिमित्त, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) 31 मे 2023 रोजी एनसीपीसीआर येथे "व्यसनमुक्त अमृत काळ" ही राष्ट्रीय मोहीम यशस्वीपणे सुरू केली. निरोगी आणि व्यसनमुक्त भारताला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरु केलेली ही मोहीम तंबाखू आणि अंमली पदार्थमुक्त राष्ट्र निर्माण करण्याच्या मोहिमेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. टोबॅको फ्री इंडिया या नागरिकांच्या समूहासोबत तांत्रिक भागीदारीच्या सहकार्याने राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने या मोहिमेचे आयोजन केले आहे. ही मोहीम देशातील लहान मुलांमधील तंबाखू आणि अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेची समस्या सोडवण्याचा प्रयत्न आहे.
ओटीटी मंचावर तंबाखूच्या वापराचे चित्रण नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारने अलीकडेच लागू केलेल्या नियमांचे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो आणि सहभागींनी स्वागत केले.
अप्रत्यक्ष तंबाखू सेवनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या मुलांना शाळांमध्ये स्थापन केलेल्या 'प्रहरी क्लब'चे सदस्य बनवण्यात आले आहे, असे त्यांनी ही अनोखी मोहीम अधोरेखित करत नमूद केले. "आम्ही आतापर्यंत अशा प्रकारचे 60,000 क्लब तयार केले आहेत. या 'प्रहरी क्लब'चा उपयोग भारताला तंबाखू आणि अंमली पदार्थांपासून मुक्त करण्यासाठी करता येईल," असे ते म्हणाले. अशाप्रकारचे क्लब सरकारचे डोळे आणि कान म्हणून काम करतील आणि मुलांच्या शाळेजवळ तंबाखू विक्रीची दुकाने असल्यास माहिती देतील.
‘विज्ञान भारती’चे राष्ट्रीय सचिव आणि कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रवीण रामदास यांनी व्यसनमुक्तीसाठी पारंपरिक पद्धती आणि समग्र दृष्टिकोनांना चालना देण्यासाठी शैक्षणिक संस्थांच्या भूमिकेवर भर दिला.
एम्स दिल्लीच्या संधिवातशास्त्र विभागाच्या प्रमुख आणि प्रसिद्ध सार्वजनिक आरोग्य तज्ञ डॉ उमा कुमार यांनी अंमली पदार्थ आणि तंबाखूच्या व्यसनाशी संबंधित आरोग्य धोक्यांवर प्रकाश टाकला. प्राणघातक तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे देशात दरवर्षी 13 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो, यावर त्यांनी भर दिला. सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा (कोटपा ) दुरुस्ती विधेयकामुळे केवळ जीव वाचणार नाही तर आरोग्य व्यवस्थेवरील भार देखील कमी होईल, असेही त्या म्हणाल्या.
जागतिक आरोग्य संघटनेच्या तंबाखू मुक्त उपक्रमाच्या क्षेत्रीय सल्लागार डॉ जगदीश कौर यांनी व्यसन प्रतिबंध आणि नियंत्रणाबाबत जागतिक दृष्टीकोनातून माहिती दिली. तंबाखूच्या धोक्याबद्दल लोक अधिक जागरूक होत असताना, हा उद्योग तरुणांना जाळ्यात अडकवण्यासाठी नवनवीन मार्गांचा अवलंब करत असल्याबद्दल त्यांनी चिंता त्यांनी व्यक्त केली.
***
Sonal T/Sonal C/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1930425)
आगंतुक पटल : 309