संरक्षण मंत्रालय
भारताचे संरक्षण मंत्री आणि जर्मनीचे संरक्षण मंत्री यांच्यात द्विपक्षीय संरक्षण सहकार्य, विशेषतः औद्योगिक भागीदारी वाढवण्यासंदर्भात चर्चा
राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू संरक्षण कॉरिडॉरमध्ये गुंतवणुकीसाठी जर्मनीला दिले आमंत्रण
भारताचे कुशल कर्मचारी तसेच स्पर्धात्मक किमती आणि जर्मनीचे उच्च तंत्रज्ञान तसेच गुंतवणूक यामुळे दोन्ही देशातील संबंध आणखी दृढ होतील : संरक्षण मंत्री
Posted On:
06 JUN 2023 4:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जून 2023
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 6 जून, 2023 रोजी नवी दिल्ली येथे जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. या मंत्र्यांनी विद्यमान द्विपक्षीय संरक्षण सहकार्य उपक्रमांचा आढावा घेतला आणि सहकार्य वाढवण्याचे विशेषतः संरक्षण औद्योगिक भागीदारी वाढवण्याचे मार्ग यावर चर्चा केली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमधील दोन संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरमध्ये जर्मन गुंतवणुकीच्या संभाव्य संधींसह संरक्षण उत्पादन क्षेत्रातल्या नव्या संधी अधोरेखित केल्या. भारतीय संरक्षण उद्योग जर्मन संरक्षण उद्योगाच्या पुरवठा साखळीत सहभागी होऊ शकतो आणि पुरवठा साखळीतील लवचिकतेमध्ये तसेच परिसंस्थेत महत्वपूर्ण योगदान देऊ शकतो हे संरक्षण मंत्र्यांनी अधोरेखित केले.
भारत आणि जर्मनी सामायिक उद्दिष्टे आणि कुशल कार्यबल आणि भारतातील स्पर्धात्मक किमती तसेच जर्मनीचे उच्च तंत्रज्ञान आणि गुंतवणूक यांसारख्या भक्कम पूरक घटकांच्या आधारे अधिक दृढ सहजीवी संबंध निर्माण करू शकतात यावर राजनाथ सिंह यांनी भर दिला.
भारत आणि जर्मनी यांच्यात 2000 पासून धोरणात्मक भागीदारी आहे, जी 2011 पासून सरकार प्रमुखांच्या स्तरावर आंतर-सरकारी सल्लामसलतींद्वारे मजबूत केली जात आहे.
शिष्टमंडळ स्तरावरील या बैठकीत संरक्षण सचिव गिरीधर अरमाने आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्यासह संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. जर्मनीच्या बाजूने संरक्षण मंत्रालयाचे राज्य सचिव बेनेडिक्ट झिमर, वरिष्ठ अधिकारी आणि भारतातील जर्मनीचे राजदूत उपस्थित होते. 2015 नंतर जर्मनीच्या संरक्षणमंत्र्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.
द्विपक्षीय बैठकीपूर्वी तिन्ही सेवादलांकडून पिस्टोरियस यांना मानवंदना देण्यात आली.
तसेच आज इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स (iDEX) द्वारे आयोजित कार्यक्रमात बोरिस पिस्टोरियस भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली येथे काही भारतीय संरक्षण स्टार्ट-अप्स प्रतिनिधींबरोबर संवाद साधतील.
जर्मनीचे संरक्षण मंत्री पिस्टोरियस यांचे चार दिवसीय भारत दौऱ्यासाठी 5 जून रोजी दिल्लीत आगमन झाले . 7 जून रोजी ते मुंबईला भेट देणार आहेत. मुंबईत ते पश्चिम नौदल कमांडचे मुख्यालय आणि माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडला भेट देणार आहेत.
S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1930241)
Visitor Counter : 208