रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आसाममधील 1450 कोटी रुपयांच्या चार रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
Posted On:
05 JUN 2023 6:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जून 2023
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आसाममधील नागाव बायपास-तेलियागाव आणि तेलियागाव-रंगागारा दरम्यानच्या चौपदरीकरण कामाचे उद्घाटन केले आणि मंगलदाई बायपास आणि दाबोका-परखुवा दरम्यानच्या चौपदरीकरणाची पायाभरणी केली.
नागाव बायपास-तेलियागाव आणि तेलियागाव-रंगागारा दरम्यानचा 18 किमी लांबीचा चौपदरी विभाग 403 कोटी रुपयांचा आहे. या रुंद केलेल्या महामार्गामुळे उत्तर आणि अप्पर आसाम मधील संपर्क अधिक वाढेल आणि त्यामुळे पर्यायाने आर्थिक वृद्धी होऊन नवीन संधी उपलब्ध होतील.
राष्ट्रीय महामार्ग 15 वरील मंगलदाई येथील एकूण 535 कोटी खर्चाच्या 15 किलोमीटर अंतराच्या बायपासच्या निर्मितीमुळे आसाम, पश्चिम बंगाल आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील दुवा मजबूत होईल आणि विनाव्यत्यय प्रवास आणि प्रादेशिक एकात्मतेला आणखी चालना मिळेल.
राष्ट्रीय महामार्ग 29 वरील एकूण 517 कोटी खर्चाच्या दाबोका-परखुवा दरम्यानच्या 13 किलोमीटर अंतराच्या बायपासच्या निर्मितीमुळे गुवाहाटी-दिमापूर आर्थिक कॉरिडॉर मधील संपर्क आणि म्यानमार आणि थायलंडला जोडण्यासाठीचा दुवा अधिक मजबूत होईल. बायपासमुळे आसाम आणि नागालँडमधील आंतर-प्रादेशिक संपर्क वाढेल.
N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1930017)
Visitor Counter : 137