आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताची जी20 अध्यक्षता : आरोग्य कार्यगटाची तिसरी बैठक


भारताची डिजिटल सामग्री जगासाठी आहे. भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधा आणि क्षमता जागतिक आर्थिक वृद्धी आणि मानव विकासाला चालना देणारे घटक आहेत- डॉ. व्ही. के. पॉल. सदस्य, नीती आयोग

Posted On: 05 JUN 2023 2:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 जून 2023

भारताची डिजिटल सामग्री जगासाठी आहे. भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधा आणि क्षमता जागतिक आर्थिक वृद्धी आणि मानव विकासाला चालना देणारे घटक आहेत, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले आहे. हैदराबादमध्ये तेलंगणा येथे भारताच्या जी20 अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या आरोग्य कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी ‘सार्वत्रिक आरोग्य व्याप्तीला पाठबळ देण्यासाठी आणि आरोग्य सेवांच्या वितरणात सुधारणा करण्यासाठी डिजिटल आरोग्य नवोन्मेष आणि उपाययोजना’ यावर आयोजित सत्रात प्रमुख भाषण करताना पॉल बोलत होते. डिजिटल आरोग्याच्या क्षेत्रात भारताच्या नेतृत्वावर अधिक प्रकाश टाकताना डॉ. पॉल म्हणाले, जागतिक दक्षिण क्षेत्राचा आवाज म्हणून सार्वत्रिक आरोग्य व्याप्तीला पाठबळ देण्यासाठी डिजिटल उपाययोजना आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देत डिजिटल आरोग्य सुविधांमधील तफावत कमी करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.  सार्वत्रिक आरोग्याची व्याप्ती साध्य करण्यामध्ये आणि आरोग्यविषयक आकस्मिक स्थितीला तोंड देण्यामध्ये डिजिटल तंत्रज्ञान बहुमूल्य भूमिका बजावू शकते याबाबत आरोग्य कार्य गटाच्या विचारमंथनातून विश्वास निर्माण झाला आहे, असे त्यांनी नमूद केले. याविषयी अधिक सविस्तर माहिती देताना त्यांनी सांगितले की डिजिटल आरोग्यसुविधांच्या व्याप्तीमुळे लोकांना ते कोणत्याही भागात असले किंवा त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती कोणतीही असली तरीही टेलिमेडिसीन आणि मोबाईल ऍप यांच्या माध्यमातून आरोग्य सुविधांची उपलब्धता सुनिश्चित होते. त्याचबरोबर पुरवठादार, प्रणाली, रुग्ण, धोरणकर्ते आणि अशाच इतर घटकांमध्ये विविध प्रणालींच्या माध्यमातून आरोग्यविषयक माहितीची देवाणघेवाण होते आणि अतिशय सहजतेने झालेल्या देवाणघेवाणीच्या माध्यमातून सार्वत्रिक आरोग्य व्याप्तीचे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत मिळते, असे ते म्हणाले.

डिजिटल आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करताना डॉ. पॉल यांनी सार्वत्रिक आरोग्य व्याप्तीसाठी डिजिटल आरोग्यामधील जागतिक क्रांतीचा एक भाग बनण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केले.

या सत्रामध्ये बिल अँड मेलिंदा गेट्स फाउंडेशनच्या ग्लोबल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष डॉ. ख्रिस्तोफर एलियस, जागतिक आरोग्य संघटनेच्या डिजिटल आरोग्य आणि नवोन्मेष विभागाचे संचालक डॉ. ऍलेन लॅब्रिक या प्रमुख वक्त्यांचा समावेश होता.

जी20 अध्यक्षतेमध्ये डिजिटल आरोग्याला प्राधान्यक्रमाची बाब म्हणून समाविष्ट केल्याबद्दल डॉ. ख्रिस्तोफर यांनी प्रशंसा केली आणि समावेशकता, समानता आणि किफायतशीरपण या प्राधान्यक्रमाचे प्रमुख सिद्धांत आहेत, असे सांगितले. ते पुढे म्हणाले की तंत्रज्ञान विशेषतः डिजिटल तंत्रज्ञानाने सार्वत्रिक आरोग्य व्याप्तीच्या दिशेने आणि आरोग्य सेवांच्या वितरणातील सुधारणा करण्याच्या प्रगतीला गती देण्यात एका कारकाची महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी भारताच्या जी20 अध्यक्षतेचे आरोग्यविषयक तीन प्राधान्यक्रम अधोरेखित केले आणि सहभागींच्या योगदानाची प्रशंसा केली. यापुढील महामारी आपण एक जागतिक करार करण्याची वाट पाहात राहणार नाही असे नमूद करत ते म्हणाले की अब्जावधी जीव आणि चरितार्थ यांचे भवितव्य पणाला लागणार असल्याने दुसऱ्या महामारीच्या काळात आपण संपूर्ण तयारीनिशी सज्ज राहणे सुनिश्चित करणे ही काळाची गरज आहे, त्यामुळे आपल्याला अतिशय तातडीने पावले उचलली पाहिजेत. भारताच्या जी20 अध्यक्षतेच्या ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या संकल्पनेला अनुसरून काम करण्याचे आणि एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी सर्व संबंधितांना केले.       

S.Tupe/S.Patil/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1929981) Visitor Counter : 109