संरक्षण मंत्रालय

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांची नवी दिल्ली येथे झाली चर्चा


दोन्ही देशांदरम्यानच्या भक्कम संरक्षण सहकार्यविषयक उपक्रमांचा घेतला आढावा, नवीन तंत्रज्ञान आणि सह-उत्पादनाच्या सह-विकासावर भर

पुढील काही वर्षातील भारत-अमेरिका संरक्षण औद्योगिक सहकार्याविषयीचा आराखडा पूर्ण

Posted On: 05 JUN 2023 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 जून 2023

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांच्यात आज नवी दिल्ली येथे द्विपक्षीय बैठक झाली. अतिशय जिव्हाळ्याच्या आणि सौहार्दाच्या वातावरणात ही बैठक झाली. औद्योगिक सहकार्य बळकट करण्याच्या विविध मार्गांना लक्षात घेण्यावर विशेष भर देत दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्यविषयक अतिशय महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा केली. एक भक्कम चिवट पुरवठा साखळी उभारण्याच्या उपायांबाबत दोन्ही मंत्र्यांनी विचारविनिमय केला.  नव्या तंत्रज्ञानाच्या सह-विकासाच्या आणि सध्या अस्तित्वात असलेल्या आणि नव्या प्रणालींच्या सहउत्पादनाच्या संधी दोन्ही बाजूंकडून विचारात घेतल्या जातील आणि दोन्ही देशांच्या संरक्षणविषयक स्टार्ट अप परिसंस्थांमध्ये सहकार्य वृद्धिंगत करतील. या उद्देशांनी  त्यांनी भारत-अमेरिका संरक्षण औद्योगिक सहकार्यासाठी एक आराखडा पूर्ण केला ज्याद्वारे आगामी काही वर्षातील धोरणाची दिशा निश्चित करता येईल. दोन्ही देशांनी परस्परांमध्ये असलेल्या भक्कम आणि बहुआयामी संरक्षण सहकार्यविषयक उपक्रमांचा आढावा घेतला आणि  परस्परांसोबत संपर्क राहण्याच्या या प्रक्रियेला मिळालेली गती कायम राखण्याबाबत सहमती व्यक्त केली. संरक्षणविषयक कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संरक्षणविषयक अंतराळ यावर भर देण्यासंदर्भात अलीकडेच झालेल्या संवादाचे त्यांनी स्वागत केले. यावेळी त्यांनी हिंद-प्रशांत क्षेत्रात शांतता राखण्याबाबत आणि स्थैर्याबाबत दोन्ही देशांना असलेल्या सामाईक स्वारस्याच्या दृष्टीकोनातून प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्यांवर देखील चर्चा केली. 

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ  जनरल अनिल चौहान, संरक्षण सचिव गिरीधर अरमाने आणि संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर कामत या बैठकीत सहभागी झाले होते.

शिष्टमंडळ स्तरीय चर्चेपूर्वी ऑस्टिन यांना तिन्ही संरक्षण दलांकडून मानवंदना देण्यात आली. अमेरिकेचे संरक्षणमंत्री कालपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत.

 

  

Jaydevi PS/S.Patil/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 (Release ID: 1929935) Visitor Counter : 165