ऊर्जा मंत्रालय
जागतिक पर्यावरण दिनाच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र सरकारच्या वतीने ई-कूकिंग संक्रमणसंदर्भात ग्राहक-केंद्रित दृष्टीकोन शोधण्यासाठी परिषदेचे आयोजन
ई-कूकिंग हे भारतीय स्वयंपाकघराचे भविष्य आहे, याकरता परवडण्याजोगे व्यापार आराखडे आवश्यक आहेत : अतिरिक्त सचिव, उर्जा मंत्रालय
Posted On:
05 JUN 2023 2:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जून 2023
भारतात ऊर्जा कार्यक्षम, स्वच्छ आणि परवडणारी इलेक्ट्रिक कुकिंग पद्धत कार्यान्वित करण्याच्या उपक्रमाला आपण कशाप्रकारे गती देऊ शकतो? आजच्या जागतिक पर्यावरण दिनी भारत सरकारचे उर्जा मंत्रालय, ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो (BEE) यांनी क्लास्प (CLASP) च्या सहकार्याने नवी दिल्ली येथे आयोजित केलेलया या परिषदेत या प्रश्नाची नवीन उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. ई-कूकिंग संक्रमणसंदर्भात ग्राहक-केंद्रित दृष्टीकोन शोधण्यासाठी परिषदेच्या निमित्ताने संस्थात्मक ग्राहक, ग्राहक संशोधन गट, धोरण निर्माते, थिंक टँक, उत्पादक आणि इतर सक्षम गट इलेक्ट्रिक कुकिंगच्या दिशेने जलद संक्रमण करण्याच्या धोरणावर चर्चा करण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी समान व्यासपीठावर एकत्र येऊ शकले.
आगामी काळात ई-कूकिंग ही सर्व भारतीयांसाठी एक पर्यावरण स्नेही सवय ठरेल असे याप्रसंगी एक विशेष निवदेन देताना उर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अजय तिवारी यांनी सांगितले.
ऊर्जा संक्रमण क्षेत्रात भारत जगासमोर एक नेतृत्व म्हणून उदयाला आला आहे, असे तिवारी यांनी सांगितले. 2021 मध्ये ग्लासगो येथे झालेल्या 26 व्या कॉप 26 (COP26) राष्ट्रांच्या संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रारंभ केलेल्या मिशन LiFE बद्दल माहिती देताना तिवारी बोलत होते. आपल्याकडे घरात 24/7 वीजेचा पुरवठा असतो, त्यामुळे आपण ई-कूकिंग कडे वळले पाहिजे, असे अतिरिक्त सचिव म्हणाले.
जेव्हा भारतातील सर्व घरांमध्ये वीजेचा पुरवठा असेल, तेव्हा ई-कूकिंग हे भारतीय स्वयंपाकघराचे भविष्य असेल, असा विश्वास तिवारी यांनी व्यक्त केला. “याकरता परवडण्याजोगे व्यापार आराखडे आवश्यक आहेत”
परवडण्याजोग्या किमतीचे महत्व विशद करताना ते म्हणाले की आपण ई-कूकिंग ला प्रोत्साहन देण्यासाठी सौर ऊर्जा, औष्णिक ऊर्जा यांसारख्या नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा वापर केला पाहिजे. “आम्ही भारतीय स्वयंपाकघरात सेवा देण्यासाठी ई-कूकिंगच्या भारतीय प्रारूपाकडे वाटचाल करत आहोत. जर आपल्याकडे दर्जेदार आणि परवडण्याजोगी प्रारूपे असतील तर आपण केवळ 2-3 वर्षात सर्व शहरी भागात ई-कूकिंग सुरु करू शकतो"
या क्षेत्रात अत्यंत कमी संशोधनाची गरज आहे, कारण आपल्याकडे याआधीच ई-कूकिंग संदर्भातील उत्पादने आहेत आणि ग्राहक देखील त्याबाबत सर्वश्रुत आहेत, असे ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोचे महासंचालक अभय बाक्रे यांनी सांगितले. “ग्राहकांनी ई-कूकिंग पद्धतीचा अवलंब करण्यासाठी असलेले प्रमुख अडथळे म्हणजे ई-कूकिंग उपकरणांमधील संभाव्य त्रुटी आणि सर्व प्रकारचे पदार्थ ई-कूकिंगने करता येऊ शकतील का ही शंका होय. आपण पाहिले आहे की पारंपारिक स्टोव्ह चा वापर करून बनवता येणारे बहुतेक सर्व पदार्थ ई-कूकिंगने देखील बनवता येतात. तर, आवश्यकता आहे ती मोठ्या प्रमाणावर गती वाढवण्याची”.
आज आपण जागतिक पर्यावरण दिनाचा पन्नासावा वर्धापन दिन साजरा करत असताना, निर्णायक आणि परिवर्तनकारी कृती करण्याची ही वेळ आहे आणि ई-कूकिंगमधील संक्रमण ही संधी दर्शवते आहे, असे क्लास्प CLASP चे वरिष्ठ संचालक बिशाल थापा म्हणाले. ई-कूकिंगमधील संक्रमणामुळे ऊर्जेच्या आयातीचे प्रमाण कमी होईल आणि पुरवठ्यातील असुरक्षा कमी करण्यास मदत होईल. एकूणच, हे संक्रमण जीवनाची गुणवत्ता सुधारू शकते, कार्बन उत्सर्जन कमी करू शकते आणि घरातील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा करू शकते.”
ई-कूकिंग मिशन लाइफसाठी गुरूकिल्ली
इलेक्ट्रिक कूकिंगवर लक्ष केंद्रित करणे हे, ई-कूकिंग ही मिशन लाईफ (LiFE -पर्यावरणपूरक जीवनशैली) ची गुरुकिल्ली आहे या मान्यतेवर आधारित आहे. ई-कूकिंग संक्रमणसंदर्भात ग्राहक-केंद्रित दृष्टीकोन शोधण्यासाठी आयोजित केलेल्या या एकदिवसीय परिषदेत वित्त, मागणी एकत्रीकरण, कार्बन क्रेडिट्स आणि व्यापार आराखडे यांसारख्या ई-कूकिंग पर्यायांचा अवलंब करण्यासाठी सक्षमकांचा शोध घेतला जाईल.
S.Tupe/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1929900)
Visitor Counter : 195