आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

G-20 भारतीय अध्यक्षता: आरोग्य कार्यकारी गटाची तिसरी बैठक


हैदराबादमध्ये तेलंगणा इथे G-20 आरोग्य कार्यकारी गटाच्या तिसऱ्या बैठकीच्या उद्घाटन सत्राला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रविण पवार यांनी संबोधित केले

साथीच्या रोगांचा धोका अद्याप संपलेला नाही. एकल आरोग्य आधारित देखरेख प्रणाली एकत्रित आणि सशक्त करण्याची गरज आहे: डॉ भारती प्रविण पवार

निरोगी आणि प्रेरित जग निर्माण करण्यासाठी वैश्विक आरोग्यसेवेचे सामर्थ्य बळकट करण्यासाठी G-20 उत्तम व्यासपीठ : जी किशन रेड्डी

Posted On: 04 JUN 2023 4:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जून 2023

 

“साथीच्या रोगांचा धोका संपला नाही. एकल आरोग्य आधारित देखरेख प्रणाली एकत्रित आणि सशक्त करण्याची गरज आहे”, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी म्हटलं आहे. त्या आज G-20 भारतीय अध्यक्षते अंतर्गत तिसऱ्या आरोग्य कार्यकारी गटाच्या बैठकीला संबोधित करताना बोलत होत्या. केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रा. एस पी सिंह बघेल आणि नीति आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही के पॉल हेदेखील यावेळी उपस्थित होते.

वैश्विक सहकार्य आणि भागीदारीचे महत्त्व अधोरेखित करताना डॉ. भारती प्रवीण पवार यांनी सांगितलं की कोविड-19 साथीच्या रोगामुळे हे स्पष्ट झाले की भागीदाऱ्या या चालू असलेल्या महामारीच्या काळात नव्हे तर केवळ शांततेच्या काळात विकसित केल्या जातात. प्राथमिक आरोग्य या महत्वपूर्ण घटकासह लवचिक आरोग्य प्रणाली निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे असं त्या म्हणाल्या. जी 20 सदस्य म्हणून आम्ही करत असलेली भागीदारी महत्त्वाची असून विश्वास निर्माण करणे, ज्ञान सामायिक करणे, रचनात्मक जाळे उभारणे आणि अर्थपूर्ण निष्कर्ष तसेच परिणाम साध्य करण्यासाठी एकत्र काम करणे यामुळे सुलभ ठरत असल्याचे त्या पुढे म्हणाल्या.

सुरक्षित, परिणामकारक आणि दर्जेदार वैद्यकीय उपायांच्या उपलब्धतेची गरजही डॉ पवार यांनी अधोरेखित केली.

जागतिक आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापरासाठी सुरू असलेल्या उपक्रमांना एकत्रित करण्यासाठी डिजिटल हेल्थ, WHO - व्यवस्थापित नेटवर्कवरील जागतिक उपक्रमाच्या भारताच्या प्रस्तावाची माहितीही डॉ पवार यांनी उपस्थित प्रतिनिधी मंडळांना दिली. हा उपक्रम राष्ट्रांमधील डिजिटल दरी भरून काढण्यास सक्षम ठरू शकतो तसेच यामुळे तंत्रज्ञानाचे लाभ जगातील प्रत्येक नागरिकाला उपलब्ध करून देता येतील असेही त्यांनी सांगितले.

भारतीय पारंपरिक ज्ञान प्रणालींचे आरोग्यसेवेतील योगदान अधोरेखित करताना केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी म्हणाले की भारतीय पारंपरिक ज्ञान प्रणालीने सर्वांसाठी प्रतिबंधात्मक आणि सर्वांगीण कल्याणाचा प्रसार केला आहे. आयुर्वेद आणि योगाचा जगभरातील महत्त्वाचा प्रभावही त्यांनी अधोरेखित केला. भारतीय सभ्यता आणि सांस्कृतिक वारशामुळे आपल्याला पाच हजार वर्षांपासून अस्तित्वात असलेले पारंपरिक आयुर्वेद किंवा जीवनाचे विज्ञान मिळाले आहे असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही वाढवण्यासाठी योग सर्वात विश्वासार्ह पद्धतींपैकी एक म्हणून उदयास आला आहे असे रेड्डी यावेळी म्हणाले. 

भारताला वैद्यकीय पर्यटनाच्या केंद्रांपैकी एक बनवण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकत केंद्रीय पर्यटन मंत्री म्हणाले की, भारत हे माफक दरातल्या, प्रभावी  आणि विश्वासार्ह आरोग्यसेवेचे घर आहे जे देशाला वैद्यकीय मूल्याच्या प्रवासात आपल्या ध्येयापर्यंत पोचवेल.  आरोग्य आणि निरामयता  यात जगभरातील लोकांच्या पसंतीच्या दहा देशांमध्ये भारताचा समावेश असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मंत्री किशन रेड्डी म्हणाले की "जीवन वाचवण्याच्या आणि उपजीविकेचे रक्षण करण्याच्या उदात्त दृष्टीकोनात एक विश्वासार्ह भागीदार असल्याचा भारताला अभिमान वाटतो" आणि 'फार्मसी ऑफ द वर्ल्ड', अर्थात "जगाचे औषधालय " म्हणून भारताला मिळालेली ओळख त्यांनी अधोरेखित केली. त्यांनी नमूद केले की, एकट्या हैदराबादमधील जीनोम व्हॅलीचे जगातील लस उत्पादनात 33% योगदान आहे.

वर्ष 2030 पर्यंत सर्वांसाठी सार्वभौम आरोग्य सेवा साध्य करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे यावर केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी भर दिला. त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना असे म्हटले की, निरोगी आणि उत्साही जग निर्माण करण्यासाठी सार्वत्रिक आरोग्यसेवेच्या सामर्थ्याला पाठिंबा देण्यासाठी, त्याचा उपयोग करून घेण्यासाठी आणि सुविधा पुरवण्यासाठी G20 पेक्षा दुसरे कोणतेही चांगले व्यासपीठ असू शकत नाही. 

साथीच्या रोगाचा प्रतिबंध, तयारी आणि प्रतिसाद यासाठी विविध बहुपक्षीय प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे प्रा. एस. पी. सिंग बघेल यांनी नमूद केले, ते म्हणाले की,“ नुकत्याच कोविड 19 साथीच्या रोगाने आपल्याला हे शिकवले आहे की केवळ शाश्वत आरोग्य व्यवस्थेद्वारेच एक शाश्वत अर्थव्यवस्था निर्माण केली जाऊ शकते. प्रादेशिक, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर आरोग्य क्षेत्रात सतत हस्तक्षेप करूनच साथीच्या रोगाचा प्रभावी प्रतिबंध, सज्जता आणि प्रतिसाद सुकर होऊ शकतो”, असेही त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्री म्हणाले की, G20 च्या व्यासपीठावरून सर्वांसाठी सर्वोत्तम आरोग्य सुविधा, लस, उपचार आणि निदान सुनिश्चित करण्याचे भारताचे ध्येय आहे. आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य यंत्रणा आणि वैद्यकीय सोसायट्यांना वित्तपुरवठा करण्याच्या मुद्द्याला प्राधान्य दिल्याबद्दल त्यांनी जी 20  जॉइंट फायनान्स (एकत्र निधी) आणि हेल्थ टास्क फोर्स आणि जी 7 देशांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, "'सर्वांसाठी आरोग्य' हा शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये नमूद केलेला एक महत्त्वाचा अजेंडा आहे. नुकत्याच पार पडलेल्या 76व्या जागतिक आरोग्य संमेलनाशी ही संलग्न  संकल्पना होती. त्यांनी नमूद केले की, भारताच्या G20 अध्यक्षतेची संकल्पना, म्हणजे, “एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य” देखील सार्वत्रिक आरोग्याच्या व्यापक संकल्पनेला सूचित करते. आरोग्य आणीबाणीची तयारी, प्रतिबंध आणि प्रतिसाद, वैद्यकीय क्षेत्रातली आव्हाने, डिजिटल हेल्थ याविषयी, जागतिक आरोग्य तज्ञांमध्ये सुरू असलेल्या समांतर चर्चां खूप महत्त्वाच्या असून यामध्ये सर्वांनी एकत्रित येण्याची गरज असल्याचं सचिव भूषण यांनी नमूद केले.

इंडोनेशियन आणि ब्राझिलियन ट्रोइका सदस्यांनी तीन आरोग्य प्राधान्यक्रम अधोरेखित केल्याबद्दल भारताच्या जी-20 अध्यक्षपदाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, साथीच्या रोगाची तयारी, प्रतिबंध आणि प्रतिसाद उपायांना बळकटी देण्याच्या दिशेने आपल्या प्रयत्नांना एकत्रितपणे गती देण्याची आणि या उद्देशासाठी योग्य जागतिक आरोग्य रचना तयार करण्याची गरज आहे.

यावेळी आरोग्य संशोधन विभाग सचिव आणि आयसीएमआर (ICMR) चे महानिदेशक डॉ. राजीव बहल, परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि भारताच्या G20 अध्यक्ष परिषदेचे एसओयुएस शेर्पा अभय ठाकूर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लव अग्रवाल, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव हेकाली झिमोमी, G20 सदस्य देशांचे प्रतिनिधी, विशेष आमंत्रित देश, आंतरराष्ट्रीय संस्था, मंच आणि डब्ल्यूएचओ, जागतिक  बँक,  डब्ल्यूइफ इत्यादी भागीदार आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

* * *

S.Tupe/N.Chitale/Sandesh/Vikas/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1929733) Visitor Counter : 121