आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

हैदराबाद येथे 4 जून 2023 रोजी होणाऱ्या जी-20 आऱोग्य कार्य गटाच्या तिसऱ्या बैठकीसाठी आरोग्य मंत्रालय सज्ज


या तिसऱ्या एचडब्लूजी बैठकीच्या निमित्ताने संशोधन आणि विकास आणि नवोन्मेषावर भर

Posted On: 03 JUN 2023 3:22PM by PIB Mumbai


 

भारताच्या जी20 अध्यक्षतेचा भाग म्हणून हैदराबाद येथे आरोग्य कार्य गटाच्या तिसऱ्या बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. जी20 हेल्थ ट्रॅकच्या प्राधान्यक्रमाच्या तीन प्रमुख बाबींवर यामध्ये भर असेल. या बैठकीच्या बरोबरीने आयोजित होणाऱ्या इतर कार्यक्रमांमध्ये औषधनिर्मिती, लसी, थेराप्युटिक्स आणि निदान यांच्यासह संशोधन आणि विकास आणि नवोन्मेष यावर भर देण्यात येईल. हैदराबाद येथे उद्यापासून सुरू होत असलेल्या या तीन दिवसीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या वार्ताहर परिषदेत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली.

1 डिसेंबर 2022 हा दिवस भारतासाठी ऐतिहासिक होता कारण या दिवशी एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य, वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेसह जी20 अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली, असे त्यांनी सांगितले. जी20 संघटनेचे भारताच्या आधी अध्यक्षपद भूषवणारा इंडोनेशिया आणि भारतानंतर अध्यक्षपद भूषवणारा ब्राझिल हे दोन्ही देश विकसनशील देश आहेत त्यामुळे जी20च्या या तीन अध्यक्षपदांचा विचार करता  ग्लोबल साउथ क्षेत्राच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याची एक महत्त्वाची संधी भारताला उपलब्ध झाली आहे आणि त्यामुळे ग्लोबल साउथ क्षेत्राला भेडसावणारी आव्हाने अधोरेखित होतील आणि या क्षेत्राची एकजूट होईल, असे अग्रवाल म्हणाले.

 

जी20च्या आरोग्य प्राधान्यक्रमांविषयी सविस्तर माहिती देताना लव अग्रवाल यांनी सांगितले की आरोग्यविषयक आकस्मिकता प्रतिबंध, सज्जता आणि प्रतिसाद यांच्यासह तीन प्राधान्यक्रमांवर भारताच्या जी20 अध्यक्षतेचा भर राहील.

सुरक्षित, प्रभावी, दर्जेदार आणि परवडण्याजोग्या वैद्यकीय उपाययोजना( लसी, थेरॅप्युटिक्स आणि निदान) यांची हाताळणी आणि उपलब्धता यावर भर आणि सार्वत्रिक आरोग्य  व्याप्तीला पाठबळ देण्यासाठी डिजिटल आरोग्य नवोन्मेष आणि उपाय तसेच आरोग्यसुविधांच्या वितरणामध्ये सुधारणा यांच्यासह, औषधनिर्मिती क्षेत्रात सहकार्याला बळकटी याचा देखील प्राधान्यक्रमात समावेश असेल. या प्राधान्यक्रमांच्या अनुषंगाने मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल, आऱोग्यावर हवामान बदलाचा प्रभाव, आणि आजच्या काळात पारंपरिक औषधांचे उपयोजन आणि उपयुक्तता यांसारख्या आरोग्य क्षेत्रात उदयाला येणाऱ्या नव्या मुद्यांवर भर देणाऱ्या आरोग्य कार्य गटाच्या प्रत्येक बैठकीच्या जोडीने सहयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. सहयोगी कार्यक्रमांमध्ये आरोग्य कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीत संशोधन आणि विकास आणि नवोन्मेष यावर भर दिला जाईल.

या आगामी आरोग्य कार्यगटाच्या बैठकीविषयी माहिती देताना लव अग्रवाल म्हणाले की या बैठकीत 180 सदस्य, 10 निमंत्रित देश आणि 22 आंतरराष्ट्रीय संघटना सहभागी होत आहेत. या मुख्य कार्यक्रमाव्यतिरिक्त जगभरात उपलब्धतेला चालना देणारे संशोधन विकास आणि नवोन्मेषाकरता चौकटी यावर सहयोगी कार्यक्रमात भर दिला जाणार आहे. त्याव्यतिरिक्त जिनोम व्हॅलीला भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल.

***

N.Chitale/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1929647) Visitor Counter : 107