गृह मंत्रालय
येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर व्यवस्थापनाच्या संपूर्ण तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रातले प्रयत्न,आपत्तीच्या काळात होणारी जीवित आणि वित्त हानी कमी राखण्यासाठी सहाय्यकारक
पूर व्यवस्थापनात आणखी सुधारणा करण्याच्या दृष्टीने, भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि केंद्रीय जल आयोगाद्वारे सध्या दिला जाणारा 5 दिवसांचा पाऊस/पूराचा अंदाज आगामी पावसाळ्यापर्यंत 7 दिवसांपर्यंत वाढवला जाईल - केंद्रीय गृहमंत्री
देशातील प्रमुख पाणलोट क्षेत्र/परिसरामध्ये पूर आणि पाण्याच्या पातळीत वाढ होण्याच्या अंदाजासाठी स्थायी व्यवस्था ठेवण्यासाठी केंद्र आणि राज्य संस्थांमधील समन्वय बळकट करण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
भारतीय हवामानशास्त्र विभागाने विकसित केलेल्या 'उमंग', 'रेन अलार्म' आणि 'दामिनी' या हवामान अंदाजाशी संबंधित विविध मोबाईल ॲप्सना जास्तीत जास्त प्रसिद्धी दिली जावी, जेणेकरून त्यांचे फायदे संबंधित लोकांपर्यंत पोहोचतील - अमित शहा
Posted On:
02 JUN 2023 10:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जून 2023
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर व्यवस्थापनाच्या सर्वसमावेशक तयारीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली.देशातील पूर समस्या कमी करण्यासाठी सर्वसमावेशक आणि व्यापक धोरण तयार करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचाही गृहमंत्र्यांनी आढावा घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात, आपत्तीच्या काळात होणारी जीवित आणि वित्तहानी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. पूर व्यवस्थापनात आणखी सुधारणा करण्याच्या दृष्टीने, भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि केंद्रीय जल आयोगाद्वारे सध्या दिला जाणारा 5 दिवसांचा पाऊस/पूराचा अंदाज आगामी पावसाळ्यापर्यंत 7 दिवसांपर्यंत वाढवला जाईल असे ते म्हणाले. शासनाच्या आपदा मित्र योजनेत गावातील पारंपरिक पाणबुड्यांनाही आपत्ती बचाव प्रशिक्षण देण्यात यावे असेही शहा यांनी सांगितले.
देशातील प्रमुख पाणलोट क्षेत्र/परिसरामध्ये पूर आणि पाण्याच्या पातळीत वाढ होण्याच्या अंदाजाकरिता कायमस्वरूपी यंत्रणेसाठी केंद्र आणि राज्य संस्थांमधील समन्वय बळकट करण्यासाठीचे प्रयत्न जारी ठेवण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
गृहमंत्र्यांनी या बैठकीत भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी ) आणि केंद्रीय जल आयोग (सीडब्ल्यूसी ) सारख्या विशेष संस्थांना अधिक अचूक हवामान आणि पुराच्या अंदाजासाठी त्यांचे तंत्रज्ञान अद्यतनित करणे सुरू ठेवण्याचा सल्ला दिला.
एसएमएस, टीव्ही, एफएम रेडिओ आणि इतर माध्यमांद्वारे लोकांपर्यंत वीज कोसळण्यासंदर्भातील आयएमडीचा इशारा वेळेवर प्रसारित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. आयएमडीने विकसित केलेल्या 'उमंग', 'रेन अलार्म' आणि 'दामिनी' यांसारख्या हवामान अंदाजाशी संबंधित विविध मोबाईल ॲप्सना जास्तीत जास्त प्रसिद्धी दिली जावी, जेणेकरून त्यांचे फायदे लक्ष्यित लोकांपर्यंत पोहोचतील, असे अमित शहा यांनी सांगितले. दामिनी अॅप वीज पडण्यासंदर्भात तीन तास अगोदर इशारा देते यामुळे जीवित आणि वित्त हानी कमी होण्यास मदत होते.2 जून 2022 रोजी झालेल्या गेल्या पूर आढावा बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करून, माहितीच्या सुलभ प्रसारासाठी हे अॅप आता 15 भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.
N.Chitale/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1929534)
Visitor Counter : 167