पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’(101 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

Posted On: 28 MAY 2023 11:41AM by PIB Mumbai

 

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार!

मन की बातकार्यक्रमात पुन्हा एकदा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. मन की बातचा हा भाग म्हणजे या कार्यक्रमाच्या द्विशतकाचा प्रारंभ आहे. गेल्या महिन्यात आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा शतक महोत्सव साजरा केला आहे. तुम्हा सर्वांचा सहभाग, हेच या कार्यक्रमाचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. शंभराव्या भागाच्या प्रसारणाच्या वेळेला, एक प्रकारे संपूर्ण देश एका धाग्यात बांधला गेला होता. आपले स्वच्छता कर्मचारी बंधू-भगिनी असोत किंवा विविध क्षेत्रातील नामवंत, ‘मन की बातने सर्वांना एकत्र आणण्याचे काम केले आहे. तुम्ही सर्वांनीच या कार्यक्रमाप्रती जी आत्मीयता आणि जिव्हाळा व्यक्त केला आहे, तो केवळ अभूतपूर्व आहे, भावुक करणारा आहे. जेव्हा मन की बातचे प्रसारण सुरु होते तेव्हा जगाच्या विविध भागांमध्ये असणाऱ्या देशांमध्ये, विविध टाईम झोन मध्ये, काही ठिकाणी संध्याकाळ होत होती, तर काही ठिकाणी रात्र उलटून गेली होती, असे असूनही, तिथल्या लोकांनी 100 वा भाग ऐकण्यासाठी वेळ काढला. आपल्यापासून हजारो मैल दूर असलेल्या न्यूझीलंड देशातला एक व्हिडीओ मी पाहिला, तिथल्या शंभर वर्ष वयाच्या एक मातोश्री आपल्याला आशीर्वाद देत होत्या. 'मन की बातकार्यक्रमाबद्दल देश विदेशातील लोकांनी त्यांची मते मांडली आहेत.अनेक जणांनी या कार्यक्रमाचे संरचनात्मक विश्लेषण देखील केले आहे. मन की बात' या कार्यक्रमात केवळ देश आणि देशवासीयांचे कर्तुत्व यांचीच चर्चा होते, याचे लोकांनी कौतुक केले आहे. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या पाठींब्यासाठी आदरसहित धन्यवाद देतो.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या काही दिवसांत आपण मन की बातमध्ये 'काशी-तमिळ संगम' बद्दल बोललो, 'सौराष्ट्र-तमिळ संगम'ची देखील चर्चा केली. काही काळापूर्वी, वाराणसी येथे, 'काशी-तेलुगु संगम' सुद्धा झाला. एक भारत, श्रेष्ठ भारतया संकल्पनेला बळ देणारा असाच आणखी एक प्रयत्न देशात झाला आहे, हा प्रयत्न आहे, 'युवा संगम'चा. मी असा विचार केला की, या अनोख्या प्रयत्नांमध्ये जे लोक सहभागी झाले होते त्यांनाच यासंदर्भातील तपशील विचारुया. त्यासाठी आत्ता माझ्यासोबत फोनच्या माध्यमातून दोघे तरुण जोडले गेले आहेत त्यातील एक आहे अरुणाचल प्रदेशातील ग्यामर न्योकुमजी आणि दुसरी आहे बिहारची कन्या विशाखा सिंह. चला आपण सर्वप्रथम ग्यामर न्योकुम यांच्याशी बोलूया.

पंतप्रधान :   ग्यामर जी, नमस्ते !

ग्यामर जी :  नमस्ते मोदी जी !

पंतप्रधान : अच्छा, ग्यामर जी, सर्वप्रथम मी तुमच्याविषयी जाणून घेऊ इच्छितो.

ग्यामर जी –    मोदीजी, सर्वात आधी तुम्ही माझ्याशी बोलण्यासाठी तुमचा बहुमूल्य वेळ खर्च केल्याबद्दल मी तुमचे आणि भारत सरकारचे खूप खूप आभार मानतो. मी अरुणाचल प्रदेशातील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत मेकॅनिकल अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत आहे.

पंतप्रधान: आणि कुटुंबात कोण कोण काय करतात, वडील काय करतात.

ग्यामर जी : माझे वडील लहान-मोठा व्यापार करतात आणि त्यानंतर थोडी शेती करतात.

पंतप्रधान: युवा संगमविषयी तुम्हाला कुठून माहिती मिळाली, युवा संगमसाठी कसे, कोठे गेला?

ग्यामर जी: माझा अनुभव मस्त होता, फारच छान होता. मोदी जी, युवा संगमची माहिती मला माझ्या एनआयटी या शिक्षणसंस्थेत मिळाली. त्यांनी सांगितले की, तुम्ही युवा संगम मध्ये सहभागी होऊ शकता. मी इंटरनेटवर थोडी शोधाशोध केली तर मला समजले की, हा अत्यंत उत्तम कार्यक्रम आहे. याच्या माध्यमातून मी एक भारत,श्रेष्ठ भारत संकल्पनेत देखील योगदान देऊ शकतो. तसेच मला काही नव्या गोष्टींची माहिती मिळवण्याची संधी देखील यातून मिळेल. मग, मी लगेचच जाऊन नोंदणी केली.

पंतप्रधान: तुम्हाला काही पर्याय निवडावे लागले का?

ग्यामर जी :  मोदीजी, जेव्हा त्यांच्या संकेतस्थळावर गेलो तेव्हा अरुणाचल प्रदेशातील लोकांसाठी दोन पर्याय होते, पहिला होता आंध्रप्रदेश ज्यात आयआयटी तिरुपती होते आणि दुसरा पर्याय होता राजस्थानचे केंद्रीय विद्यापीठ, म्हणून मी राजस्थानला पहिला पर्याय म्हणून निवडले आणि आयआयटी तिरुपती हा माझा दुसरा पसंतीचा पर्याय होता. राजस्थानसाठी माझी निवड झाली.त्यानंतर मी राजस्थानला गेलो.

पंतप्रधान: तुमची राजस्थान यात्रा कशी झाली? तुम्ही प्रथमच राजस्थानला जात होतात.

ग्यामर जी : खरंय, मी तेव्हा पहिल्यांदाच अरुणाचल प्रदेशाच्या बाहेर पाय ठेवला होता. मी राजस्थानला आलो तेव्हा तेथील किल्ले इत्यादी गोष्टी मी केवळ चित्रपटात आणि फोनमध्ये पाहिल्या होत्या, त्या प्रत्यक्ष बघायला मी गेलो. हा माझा पहिला अनुभव फारच चांगला ठरला. तेथील लोक स्वभावाने खूपच चांगले आहेत, त्यांनी मला अत्यंत उत्तम पद्धतीची वागणूक दिली. तेथे आम्हाला अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या, राजस्थानातील मोठमोठ्या तलावांबाबत माहिती मिळाली. तिथले लोक ज्या पद्धतीने पर्जन्य जल संधारण करतात, त्याविषयी नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आधी या गोष्टी मला माहितच नव्हत्या, म्हणून राजस्थान भेटीचा हा कार्यक्रम फारच उत्तम वाटला.

पंतप्रधान: हे पहा, तुम्हाला तर सर्वाधिक लाभ झाला झाला आहे. अरुणाचल ही जशी वीरांची भूमी आहे तशीच राजस्थान देखील वीरांची भूमी आहे. राजस्थानातील खूप लोक सेनादलात कार्यरत आहेत आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर जे सैनिक तैनात आहेत त्यामध्ये जेव्हा तुम्ही राजस्थानच्या लोक भेटतील तेव्हा तुम्ही त्यांच्याशी नक्की  बोला, त्यांना सांगा की कसे तुम्ही राजस्थानला गेला होतात आणि तुम्हाला तिथे फार चांगला अनुभव आला. याबद्दल ऐकल्यानंतर त्या सैनिकांशी तुमची जवळीक वाढेल, तुम्ही एकदम जवळचे व्हाल. आणखी एक म्हणजे राजस्थानमध्ये तुम्हाला काही ओळखीच्या गोष्टी देखील दिसल्या असतील, तुम्हाला असे वाटले असेल की, अरे, अरुणाचल मध्ये देखील असे होते की.

ग्यामर जी : मोदी जी, मला एक समानता जाणवली ती अशी की जे देशप्रेम आहे आणि एक भारत, श्रेष्ठ भारत संकल्पनेची जी दूरदृष्टी आहे आणि भावना आहे ती दोन्हीकडे समान आहे. अरुणाचल प्रदेशातील जनता भारतीय असल्याचा अभिमान बाळगतात तशाच प्रकारे राजस्थानातील लोकांना सुद्धा स्वतःच्या मातृभूमीचा मोठा अभिमान आहे, ही गोष्ट मला फार जाणवली. मी तेथील खूप युवकांशी संवाद साधला तेव्हा मला आणखी समानता जाणवली आणि ती म्हणजे विशेष करून दोन्ही राज्यांतील युवा वर्ग भारतासाठी काहीतरी करू इच्छितात, हे जे देशाप्रती प्रेम आहे ते दोन्हीकडे समान आहे.

पंतप्रधान: तिकडे जे स्नेही झाले त्यांच्याशी ओळख वाढवली की इकडे आल्यावर त्यांना विसरून गेलात?

ग्यामर जी : नाही. नाही, मी त्यांच्याशी ओळख वाढवली.

पंतप्रधान: अच्छा, तुम्ही समाज माध्यमांवर सक्रीय आहात?

ग्यामर जी : हो मोदी जी, मी सक्रीय आहे.

पंतप्रधान: मग तुम्ही ब्लॉग लिहायला हवा. तुमचा युवा संगमचा अनुभव कसा होता, तुम्ही त्यात नोंदणी कशी केली, राजस्थानला गेल्यावर कसे अनुभव आले हे लिहायला हवे, जेणेकरून देशभरातील युवकांना एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेची अधिक माहिती मिळेल, ही कोणती योजना आहे आणि युवकांना त्याचा लाभ कसा करून घेता येईल ते समजेल. तुम्ही तुमच्या अनुभवांचे वर्णन करणारा ब्लॉग लिहायला हवा, तो वाचून अनेक लोकांना फायदा होईल. 

ग्यामर जी : हो, मी नक्की हे काम करीन.

पंतप्रधान: ग्यामर जी, तुमच्याशी गप्पा मारून छान वाटले. तुम्ही सर्व युवक देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहात, कारण आगामी 25 वर्षे अत्यंत महत्त्वाची आहेत- देशासाठी देखील आणि तुमच्या स्वतःसाठी देखील. तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.

ग्यामर जी : तुम्हालाही धन्यवाद मोदी जी,

पंतप्रधान: नमस्कार मित्रा.

मित्रांनो, अरुणाचलातील लोकांमध्ये इतकी आत्मीयता असते की, त्यांच्याशी बोलून मला फार आनंद वाटतो. युवा संगममधील ग्यामर जी यांचा अनुभव तर अत्यंत उत्तम होता. चला आपण बिहारची कन्या विशाखा सिंह हिच्याशी बातचीत करूया.

पंतप्रधान: विशाखा जी, नमस्कार |

विशाखा जी : सर्वप्रथम, भारताच्या माननीय पंतप्रधांनांना माझा नमस्कार आणि माझ्यासह सर्व प्रतिनिधींकडून तुम्हाला वंदन

पंतप्रधान: अच्छा, विशाखा जी, आधी स्वतःबद्दल काहीतरी सांगा, मग मला युवा संगमबद्दल देखील जाणून घायचे आहे.

विशाखा जी : मी बिहारच्या सासाराम नामक शहराची रहिवासी आहे आणि माझ्या महाविद्यालयाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आलेल्या संदेशाच्या माध्यमातून मला युवा संगम बद्दल माहिती मिळाली. त्यानंतर मी अजून चौकशी केली, तपशील शोधले की हे काय आहे, तेव्हा मला समजले की हा एक भारत श्रेष्ठ भारत योजनेच्या माध्यमातून सुरु असलेला युवा संगम उपक्रम आहे. त्यानंतर मी अर्ज केला. यात सहभागी होण्यासाठी मी खूप उत्सुक होते. मात्र, नंतर जेव्हा मी तामिळनाडूला जाऊन आले त्यातून मला जे अनुभव मिळाले त्यानंतर या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मला खूपच अभिमान वाटतो आहे. या कार्यक्रमात भाग घेऊन मला खूप आनंद झाला आहे आणि मी अगदी मनापासून तुमचे आभार मानते की तुम्ही आमच्यासारख्या तरुणांसाठी असा सर्वोत्कृष्ट उपक्रम सुरु केला. या उपक्रमाच्या माध्यमातून आपण भारताच्या विविध भागांतील संस्कृतींची माहिती करून घेऊ शकतो.

पंतप्रधान: विशाखा जी, तुम्ही कोणते शिक्षण घेता आहात?

विशाखा जी : मी संगणक शास्त्र अभियांत्रिकी अभ्यासक्रमात दुसऱ्या वर्षात शिकते आहे.

पंतप्रधान: अच्छा, विशाखा जी, तुम्ही कोणत्या राज्यात जायचे आहे, कोठे संपर्क करायचा आहे हा निर्णय  कसा घेतलात?

विशाखा जी : जेव्हा मी युवा संगम बद्दल गुगल वर शोध सुरु केला तेव्हा मला समजले की बिहारच्या प्रतिनिधींना तामिळनाडूच्या प्रतिनिधींसोबत अदलाबदल करायची आहे. तामिळनाडू हे आपल्या देशातील सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत समृध्द राज्य आहे त्यामुळे मला जेव्हा  हे समजले की बिहारमधील विद्यार्थ्यांना तामिळनाडूला पाठवले जाणार आहे तेव्हा मला निर्णय घेण्यात मदत झाली. मला वाटले की मी अर्ज भरून तेथे जायला हवे. त्यावेळी मी या उपक्रमात सहभागी झाली याबद्दल मला आज खूप अभिमान वाटतो आहे.

पंतप्रधान: तुम्ही पहिल्यांदाच तामिळनाडूला गेलात का?

विशाखा जी: हो, मी प्रथमच तेथे गेले होते.

पंतप्रधान: अच्छा, तुम्हाला काही विशिष्ट आठवणीत राहिलेली गोष्ट सांगायची असेल तर काय सांगाल? देशातील युवक तुमचे बोलणे ऐकत आहेत.

विशाखा जी : खरे सांगायचे तर हा संपूर्ण प्रवासच माझ्यासाठी अत्यंत उत्कृष्ट ठरला. प्रत्येक ठिकाणी आम्ही खूप चांगल्या गोष्टी शिकलो आहोत. मी तामिळनाडूला जाऊन खूप उत्तम मित्र मिळवले. तेथील संस्कृती शिकून घेतली, तेथील लोकांना भेटले. तेथे घडलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे इतर लोकांना जिथे जाणे अवघड असते, त्या इस्रोच्या केंद्रात जाण्याची संधी आम्हा प्रतिनिधींना देण्यात आली. दुसरी चांगली गोष्ट म्हणजे आम्ही राजभवनामध्ये जाऊन तामिळनाडूच्या राज्यपालांची भेट घेतली. या दोन घटना माझ्यासाठी अत्यंत विशेष ठरल्या. आणि आत्ता आम्ही ज्या वयात आहोत त्या वयातील मुलांना अशी संधी मिळत नाही ती आम्हाला युवा संगमच्या माध्यमातून मिळू शकली. हा माझ्यासाठी सर्वात अविस्मरणीय क्षण होता.

पंतप्रधान: बिहारमधील खाण्यापिण्याच्या पद्धती आणि तामिळनाडूमधील खाण्यापिण्याच्या पद्धती एकदम वेगवेगळ्या आहेत,

विशाखा जी : होय.

पंतप्रधान: मग त्या बाबतीत तुम्हाला समस्या नाही आली?

विशाखा जी : आम्ही जेव्हा तेथे गेलो, तेव्हा लक्षात आले, तामिळनाडूमध्ये दक्षिण भारतीय पद्धतीचे अन्न मिळते. आम्ही तेथे गेल्यावर आम्हाला डोसा, इडली, सांबार, उत्तपा, वडा, उपमा यांसारख्या पाककृती वाढण्यात आल्या होत्या, तर पहिल्यांदा जेव्हा आम्ही पहिल्यांदा चाखलं, तेव्हा तो अत्यंत सुंदर होता. तेथील जेवण अत्यंत आरोग्यसंपन्न होतं आणि वास्तवात अतिशय चविष्ट आहे. आमच्या उत्तरेतील खाद्यपदार्थापासून खूपच वेगळं आहे आणि तरी मला तेथले खाद्यपदार्थही खूप चांगले वाटले आणि तेथील लोकही खूप भले वाटले.

प्रधानमंत्री जीः तर आता खूप मित्रही झाले असतील तामिळनाडूत?

विशाखा जीः हो. आम्ही तेथे उतरलो होतो त्या एनआयटी त्रिचीमध्ये, नंतर आयआयटी मद्रासमध्ये तर दोन्ही ठिकाणच्या विद्यार्थ्यांशी माझी चांगली मैत्री झाली आहे. शिवाय मध्ये सीआयआयचा स्वागत समारंभ होता, तर तेथे आजूबाजूच्या  महाविद्यालयांतील खूप सारे विद्यार्थी आले होते. तेथे आम्ही त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्या लोकांना भेटून मला इतकं छान वाटलं. त्यातील अनेक लोक माझे मित्र सुद्धा झाले आहेत. आणि काही प्रतिनिधीही मला भेटले जे तामिळनाडूचे प्रतिनिधी बिहारमध्ये आले होते. त्यांच्याशी आमची चर्चाही झाली होती आणि आताही आम्ही जेव्हा आपसात गप्पा मारतो तेव्हा मला खूप छान वाटतं.

प्रधानमंत्री जीः तर विशाखा जी, आपण एक ब्लॉग लिहा आणि समाजमाध्यमांवर हा आपला संपूर्ण अनुभव सांगा. एक भारत श्रेष्ठ भारत चा युवा संगम आणि मग तामिळनाडूत आपल्याला जी आपुलकी मिळाली, जो आपला स्वागत सत्कार समारंभ झाला, तमिळ लोकांचंही आपल्याला खूप प्रेम मिळालं, त्याबद्दलही लिहून या साऱ्या गोष्टी देशाला सांगा आपण. तर लिहाल आपण?

विशाखा जीः हो, अवश्य.

प्रधानमंत्री जीः तर माझ्यावतीनं आपल्याला खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद.

विशाखा जीः जी धन्यवाद. नमस्कार.

ग्यामर आणि विशाखा, आपल्याला माझ्या खूप शुभेच्छा. युवा संगममध्ये आपण जे शिकलात, ते जीवनभर आपल्याबरोबर रहावं, ही माझी आपल्याप्रति शुभेच्छा आहे.

मित्रांनो, भारताची ताकद त्याच्या विविधतेत आहे. आमच्या देशात पहाण्यासारखं खूप काही आहे, हे लक्षात घेऊनच, शिक्षण मंत्रालयानं युवासंगम नावाचा एक उत्तम पुढाकार आयोजित केला. या  पुढाकाराचा उद्देष्य नागरिकांमध्ये परस्पर संबंध वाढवण्याबरोबरच देशातील  युवकांना आपसात मिळून मिसळून रहाण्याची संधी देणं हाही होता. वेगवेगळ्या राज्यांच्या उच्चशिक्षण देणाऱ्या संस्थांना यात जोडण्यात आलं आहे. युवासंगम मध्ये युवक दुसऱ्या राज्यांच्या शहरे आणि गावांमध्ये जातात, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना भेटण्याची संधी मिळते. युवा संगमच्या पहिल्या फेरीत जवळपास १२०० युवकांनी देशाच्या २२ राज्यांचा दौरा केला आहे. जे युवक याचा भाग बनले आहेत, ते  आपल्यासमवेत अशा स्मृती घेऊन आले आहेत की ज्या स्मृती जीवनभर त्यांच्या ह्रदयात कायम रहातील. आम्ही पाहिलं आहे की, अनेक मोठ्या कंपन्यांचे सीईओ, व्यावसायिक नेते यांनी बॅगपॅकर्सप्रमाणे भारतात वास्तव्य केलं आहे. मी जेव्हा दुसऱ्या देशांच्या नेत्यांना भेटतो, तेव्हा अनेकदा तेही सांगतात की, ते तरूण असताना भारतात फिरण्यासाठी आले होते. आमच्या भारतात इतकं काही पहाण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी आहे की आपली उत्सुकता प्रत्येक वेळा वाढतच जाते. मला आशा आहे की या रोमांचक अनुभवांना जाणून घेऊन आपल्यालाही देशाच्या वेगवेगळ्या भागांचा दौरा करण्यासाठी अवश्य प्रेरणा मिळेल.

माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवस अगोदर मी जपानच्या हिरोशिमामध्ये होतो. तेथे मला हिरोशिमा पीस मेमोरियल संग्रहालयात जाण्याची संधी मिळाली. तो एक भावविवश करणारा अनुभव होता. जेव्हा आम्ही इतिहासातील स्मृती जपून सुरक्षित ठेवतो, तेव्हा येणाऱ्या पिढ्यांसाठी अत्यंत सहाय्यकारी असतं ते. अनेकदा संग्रहालयात आम्हाला नवीन धडे मिळतात तर अनेकदा काही शिकायला मिळतं. काही दिवसांपूर्वी भारतात आंतरराष्ट्रीय म्युझियम प्रदर्शनाचं आयोजन केलं गेलं होतं. त्यात जगातील १२०० हून अधिक  वस्तुसंग्रहालयांच्या वैशिष्टयांचं प्रदर्शन केलं होतं. आमल्याकडे भारतात वेगवेगळ्या प्रकारचे संग्रहालये आहेत, जे आमच्या भूतकाळाशी जोडल्या गेलेल्या अनेक पैलुंचं  प्रदर्शन  करत असतात. जसे की गुरूग्राममध्ये एक आगळंवेगळं वस्तुसंग्रहालय आहे. म्युसिओ कॅमेरा ज्यात १८६० नंतरच्या ८ हजाराहूंन अधिक कॅमेऱ्यांचं संकलन केलं आहे. तामिळनाडूच्या म्युझियम ऑफ पॉसिबिलिटीजची रचना आमच्या दिव्यांगजनांना समोर ठेवून केली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालय एक असंच संग्रहालय आहे ज्यात ७० हजाराहून अधिक वस्तु सुरक्षित ठेवल्या आहेत. सन २०१० मध्ये स्थापन करण्यात आलेल्या इंडियन मेमरी प्रोजेक्ट म्हणजे भारतीय स्मृती प्रकल्प म्हणजे एक प्रकारचं ऑनलाईन संग्रहालय आहे. जगभरातून  पाठवण्यात आलेली छायाचित्रं आणि कथांच्या माध्यमातून भारताच्या गौरवशाली इतिहासाचे दुवे जोडण्याचं त्याचं कार्य सुरू आहे. देशाच्या फाळणीमुळे झालेल्या जखमांशी जोडलेल्या स्मृतींना समोर आणण्याचे प्रयत्न केले गेले आहेत. गेल्या काही वर्षात आम्ही भारतात नवनवीन प्रकारचे संग्रहालये आणि स्मारकं बनत असताना  पाहिले आहेत. स्वातंत्र्य संग्रामात आदिवासी बंधु आणि भगिनींच्या योगदानाला समर्पित नवीन संग्रहालये उभारली जात आहेत. कोलकताच्या व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये बिप्लोबी दालन असो की मग जालियनवाला बाग मेमोरियलचा जीर्णोद्धार, देशाच्या सर्व माजी पंतप्रधानांना समर्पित असं पीएम संग्रहालय आज दिल्लीच्या शोभेत भर घालत आहे.  दिल्लीमध्येच राष्ट्रीय युद्ध स्मारक संग्रहालय आमि पोलिस स्मारक असून तेथे रोज अनेक लोक हुतात्मा झालेल्यांना वंदन करण्यासाठी येत असतात. ऐतिहासिक दांडी यात्रेला समर्पित दांडी स्मारक असो की एकतेचा पुतळा स्टॅच्यु ऑफ युनिटी स्मारक असो, पण मला इथंच थांबावं लागेल कारण देशभरातील संग्रहालयांची यादी खूप मोठी आहे आणि प्रथमच देशातील सर्व संग्रहालयातील माहिती एकत्र संकलित करण्यात आली आहे. संग्रहालय कोणत्या संकल्पनेवर आधारित आहे, तेथे कोणत्या प्रकारच्या वस्तु ठेवल्या आहेत, तेथील संपर्काचा तपशील काय आहे- हे सारे काही एक ऑनलाईन डिरेक्टरीमध्ये समाविष्ट केले आहे. माझा आपल्याला आग्रह आहे की आपल्याला जेव्हा संधी मिळेल, तेव्हा आपण देशातील ही स संग्रहालये पहाण्यासाठी जरूर यावं. तेथे आपण आकर्षक छायाचित्रांना हॅशटॅग म्युझियम मेमरीज करून सामायिक करायलाही विसरू नका. यामुळे या वैभवशाली संस्कृतीच्या बरोबर आम्हा भारतीयांचे असलेले संबंध आणखी मजबूत होतील.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आम्ही सर्वांनी एक म्हण अनेकदा ऐकली असेल,. अनेकवार ऐकली असेल. बिन पानी सब सून. म्हणजे पाण्याविना जीवनात संकट कायम असतेच, व्यक्ती आणि देशाचा विकास ठप्प होत असतो. भविष्यातील हे आव्हान लक्षात घेता, आज देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात ७५ अमृत सरोवरांचे निर्माण केले जात आहे. आमचे अमृत सरोवर, यासाठी विशेष आहे की, हे स्वातंत्र्याच्या अमृतकाळात तयार केले जात आहे आणि यात लोकांचे अमृत प्रयत्न लागले आहेत. आपल्याला हे जाणून आनंद होईल की आतापर्यंत देशात ५० हजाराहून अधिक अमृत सरोवरांची निर्मिती झाली आहे. जल संरक्षणाच्या दिशेने हे एक खूप मोठं पाऊल आहे.

मित्रांनो, प्रत्येक उन्हाळ्यात आम्ही पाण्याच्या टंचाईच्या आव्हानाशी जोडलेल्या गोष्टींबाबत चर्चा करत असतो. याही वर्षी आम्ही या विषयाला घेऊ पण यावेळी जल संरक्षणाशी संबंधित स्टार्ट अपबाबत चर्चा करू. एक स्टार्ट अप आहे फ्लक्सजेन. हा स्टार्ट अप आयओटी समर्थित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जल व्यवस्थापनाचे पर्याय देत असतो. हे तंत्रज्ञान पाण्याच्या वापराच्या पॅटर्न सांगून पाण्याच्या प्रभावी वापरासंबंधी सहाय्य करेल. आणखी एक स्टार्ट अप आहे LivNSense. ते कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंगवर आधारित असून असा मंच आहे. याच्या सहाय्यानं जल वितरणावर प्रभावी पद्धतीनं देखरेख  केली जाऊ शकते. यातून कुठे किती पाणी वाया जात आहे, याचीही माहिती समजू शकते. आणखी एक स्टार्ट अप आहे कुंभी कागज. हा कुंभी कागज असा विषय आहे की आपल्यालाही खूप आवडेल असा मला पक्का विश्वास आहे. कुंभी कागज स्टार्ट अपने एक विशेष काम सुरू केलं आहे. त्यानं जलकुंभीपासून कागद बनवण्याचं काम सुरू केलं आहे, म्हणडे जी जलकुंभी कधी जलस्त्रोतांसाठी एक समस्या समजली जात होती, त्यापासून आता कागद बनवण्यात येत आहे.

मित्रांनो, अनेक युवक नाविन्यपूर्ण संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काम करत आहेत, तर काही युवक असे आहेत की जे समाजाला जागरूक करण्याच्या मोहिमेत सहभागी झाले आहेत जसे की छत्तीसगढच्या बालोद जिल्ह्यातील युवक आहेत.  इथल्या युवकांनी पाणी वाचवण्यासाठी एक मोहीम सुरू केली आहे. हे युवक घरोघरी जाऊन लोकांना पाणी वाचवण्याविषयक जागरूक करतात. जेथे कुठे  विवाह समारंभांचं आयोजन केंलं जातं, तिथं या युवकांचा गट जाऊन पाण्याचा दुरूपयोग कसा रोखला जाऊ शकतो, यावर त्यांना माहिती देतात. पाण्याच्या सदुपयोगाशी जोडलेला एक प्रेरणादायक प्रयत्न झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातही होत आहे. खुंटीच्या नागरिकांनी पाणी संकटापासून वाचण्यासाठी बोरी बांधचा मार्ग काढला आहे, ज्याचा उपयोग गावातून वाहणाऱ्या  नाल्यांवर बांध घातला जातो. या बांधांवर पाणी एकत्र आल्यानं तिथं भाजीपालाही तयार होऊ लागला आहे. त्यामुळे लोकांचं उत्पन्न वाढत आहे आणि प्रदेशाच्या गरजांचीही पूर्तता होत आहे. लोकसहभागाचा कोणताही प्रयत्न कसा अनेक परिवर्तन  घडवू शकतो, याचं खुंटी एक आकर्षक उदाहरण बनला आहे. मी तिथल्या लोकांना त्यांच्या प्रयत्नांबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो, १९६५ च्या युद्धाच्या वेळेस, आमचे  माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला होता. नंतर अटलजींनी त्याला जय विज्ञानही जोडलं होतं. काही वर्षांपूर्वी देशाच्या वैज्ञानिकांशी चर्चा करताना मी जन संशोधनचा उल्लेख केला होता. मन की बात मध्ये आज एका अशा व्यक्तीबद्दल, एक अशा संस्थेबद्दल जी जय जवान जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान या चारहींचे प्रतिबिंह आहे. हे गृहस्थ आहेत महाराष्ट्रातील श्रीमान शिवाजी श्मामराव डोलेजी. शिवाजी डोले नाशिक जिल्हयातील एका लहान गावचे रहिवासी आहेत. ते गरीब आदिवासी शेतकरी परिवारातील असून माजी सैनिकही आहेत. सैन्यात असताना त्यांनी आपलं जीवन देशाच्या सेवेसाठी वाहून टाकलं. निवृत्त झाल्यावर त्यांनी काही नवीन शिकण्याचं ठरवलं आणि कृषीमध्ये पदविका घेतली. म्हणजे ते जय जवानपासून  जय किसान कडे मार्गक्रमण करत चालले होते. आता सातत्यानं त्यांचा हाच प्रयत्न असतो की कृषी क्षेत्राला जास्तीत जास्त कसे योगदान दिलं जावं. आपल्या या मोहिमेत शिवाजो डोले यांनी २० लोकांची असं एक पथक  बनवलं आणि काही माजी सैनिकांनाही त्यात सामिल करून घेतलं. त्यानंतर त्यांच्या या पथकानं वेंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड अग्रो प्रोसेसिंग लिमिटेड नावाची एक सहकारी संस्थेचं व्यवस्थापन आपल्या हातात घेतलं. ही सहकारी संस्था निष्क्रीय पडून होती. तिचं पुनरूज्जीवन करण्याचा विडा त्यांनी उचलला. आज पहाता पहाता वेकंटेश्वरा को ऑपरेटिव्हचा विस्तार अनेक जिल्ह्यात झाला आहे. आज हे पथक महाराष्ट्र आणि कर्नाटकात काम करत आहे. तिच्याशी जवळपास १८ हजार लोक जोडले गेले आहेत आणि त्यात मोठ्या संख्येंनं आमचे पूर्व सैनिकही आहेत. नाशिकच्या मालेगावमध्ये पथकाचे सदस्य ५०० एकर जमिनीत कृषी शेती करत आहेत. हे पथक जलसंरक्षणासाठी अनेक तलाव तयार करण्याच्या कामात व्यस्त आहे. खास गोष्ट तर ही आहे की, यांनी सेंद्रिय शेती आणि डेअरीही सुरू केली आहे.  आता त्यांनी लागवड केलेली द्राक्षं युरोपातही निर्यात केली जात आहेत. या पथकाची जी दोन प्रमुख वैशिष्ट्यं आहेत, त्यात माझं लक्ष ज्यांनी वेधून घेतली ती आहेत जय विज्ञान आणि जय अनुसंधान. याचे सदस्य तंत्रज्ञान आणि आधुनिक शेती पद्धतींचा अधिकाधिक उपयोग करत आहेत. दुसरं वैशिष्ट्य हे आहे की निर्यातीसाठी आवश्यक प्रमाणीकरणावरही ते लक्ष केंद्रीत करत आहेत. सहकारातून समृद्धीच्या भावनेतून काम करणाऱ्या पथकातील लोकांची मी प्रशंसा करतो. या प्रयत्नामुळे केवळ मोठ्या संख्येनं लोकांचं सबलीकरण झालं नाही तर उपजीविकेसाठी अनेक साधनंही तयार झाली आहेत. मला आशा आहे की हा प्रयत्न प्रत्येक श्रोत्याला प्रेरित निश्चित करेल.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आज २८ मे महान स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकरजी यांची जयंती आहे. त्यांचा त्याग, धाडस आणि संकल्पशक्तीशी जोडलेली अनेक कथा आजही आम्हाला प्रेरित करत असतात. मी तो दिवस विसरू शकत नाही की जेव्हा मी अंदमानातील त्यांच्या कोठडीत गेलो होतो जिथं वीर सावरकरांनी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली. वीर सावरकर यांचं व्यक्तिमत्व दृढता आणि विशालतेनं संपूर्ण युक्त होतं. त्यांच्या निर्भीड आणि स्वाभिमानी स्वभावाला गुलामीची मानसिकता अजिबात पंसत नव्हती. स्वातंत्र्य आंदोलनातच नव्हे तर सामाजिक समानता आणि सामाजिक न्यायासाठीही वीर सावरकर यांनी जितकं केलं, त्याच्या आठवणी आजही काढल्या जातात.

मित्रांनो, काही दिवसांनी ४ जूनला संत कबीरदास यांची जयंती आहे. कबीरदास यांनी जो मार्ग आम्हाला दाखवला आहे, तो आजही तितकाच उपयुक्त आहे. कबीरदास जी म्हणत असत,

कबीरा कुआं एक है, पानी भरे अनेक

बर्तन मेंही भेद है, पानी सब में एक

म्हणजे विहिरीवर वेगवेगळ्या प्रकारचे लोक पाणी भरण्यासाठी आले तरीही विहीर कुणात भेदाभेद करत नाही. पाणी तर सर्व भांड्यांमध्ये एकच असतं. संत कबीरांनी समाजात विभाजन करणाऱ्या प्रत्येक वाईट चालीरितीला विरोध केला. समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. आज जेव्हा देश विकसित होण्याच्य संकल्पासह वाटचाल करत आहे, तेव्हा आम्हाला संत कबीरदास यांच्यापासून प्रेरणा घेऊन समाजाला मजबूत करण्यासाठीचे प्रयत्न आणखी वाढवले पाहिजेत.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आता देशातील एका अशा महान व्यक्तीमत्वाबद्दल चर्चा करणार आहे ज्यांनी राजकारण आणि चित्रपट जगतावर अद्भुत प्रतिभेच्या जोरावर अमीट ठसा उमटवला आहे. या महान व्यक्तीचं नाव आहे एन टी रामाराव ज्यांना आम्ही एनटीआर म्हणूनही ओळखतो. आज एनटीआर यांची शंभरावी जयंती आहे. आपल्या बहुसंचारी प्रतिभेच्या जोरावर त्यांनी केवळ तेलगु चित्रपटाचे महानायक बनले एवढेच नव्हे तर त्यांनी कोट्यवधी लोकांचं मनही जिंकलं होतं.  आपल्याला हे माहीत आहे का त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटातून अभियन केला होता? त्यांनी अनेक ऐतिहासिक पात्रांना आपल्या अभिनयाच्या जोरावर पुन्हा जिवंत केलं होतं. भगवान कृष्ण, राम आणि अशा अनेक भूमिकांमध्ये  एनटीआर यांचा अभिनय लोकांना इतका आवडला की आजही लोक त्यांची आठवण काढतात. एनटीआर यांनी चित्रपट जगतासह राजकारणातही आपली वेगळीच ओळख स्थापित केली होती. इथंही त्यांना लोकांचं भरपूर प्रेम आणि आशिर्वाद मिळाला. देश आणि दुनियेतील लाखो लोकांच्या मनांवर अधिराज्य गाजवणारे एनटी रामाराव जींना मी श्रद्धांजली अर्पण करतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बात मध्ये यावेळी इतकंच. पुढच्या वेळेस काही नव्या विषयांसह आपल्याकडे येईन तेव्हा काही प्रदेशांत उष्मा आणखी वाढलेला असेल. कुठे कुठे पाऊसही सुरू होईल. आपल्याला हवामानाच्या प्रत्येक स्थितीत आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यायचं आहे. २१ जूनला आम्ही जागतिक योगा दिन साजरा करू. त्याचीही देश आणि परदेशातही तयारी सुरू आहे. आपण या तयारीबाबत मला आपल्या मन की बातमध्ये मला लिहीत रहा. अन्य एखादा विषय किंवा माहिती मिळाली तर मला ही सांगा. जास्तीत जास्त सूचना 'मन की बात'मध्ये घेण्याचा माझा प्रयत्न राहील. पुन्हा एकदा आपल्याला  खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू या. तोपर्यंत आता निरोप द्या. नमस्कार.

***

S.Pophale/AIR/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1927841) Visitor Counter : 311